Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअसाही पैलू...

असाही पैलू…

अनुराधा दीक्षित

काही माणसांचे नमुने पाहून खरंच थक्क व्हायला होतं. वाटतं, कसं जमतं यांना असं वागायला? गोड गोड बोलून, थापा मारून आपला मतलब काढून घेतात.

माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव ती सांगत होती. तिला त्या व्यक्तीच्या… आपण तिला सुमा म्हणू… या पैलूची अजिबातच माहिती नव्हती. माझ्या मैत्रिणीला ओळखणारी सुमा अनपेक्षितपणे एकदा तिच्याकडे आली. ती भयंकर बडबडी होती. आपल्याकडचे खरे-खोटे किस्से सांगून ती एखाद्याला गुंगवून टाकायची. ऐकणारे रंगून जात. मैत्रीण म्हणायची, “ही जर सिनेमा-नाटकात गेली ना, तर नक्की नाव काढील! तिच्याकडे ना बोलण्याची जी काही हातोटी आहे, त्यामुळे आपल्या नजरेसमोर कसं सारं उभं राहतं! ती घरी आली ना की, सारं घर तिच्याभोवती गोळा होतं. काय जादू आहे तिच्यात कळत नाही!” असं ती सुमाचं कौतुक करत असे.

माझी मैत्रीण आणि तिच्या घरचे तिच्यावर खूश असत. मैत्रिणीची मुलगी सुमी मावशीला आपला मेकअप करून द्यायला सांगायची. मग छान नटवून सुमी तिला आरशात चेहरा दाखवायची. ओठांना लिपस्टिक लावल्यावर तिला मज्जा वाटायची. सुमीकडे नेहमी एखादी वस्तू तरी नावीन्यपूर्ण किंवा हटके दिसायची. कधी तिच्या केसांना लावलेला चाप असेल, तर कधी फॅशनेबल चप्पल, कधी कानातले इअररिंग्ज वगैरे… तिच्या या चॉइसचं मैत्रिणीला नेहमी कौतुक वाटायचं. सुमीचा नवरा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. घरचं नीट चालेल एवढा पगार होता. सुमी मात्र गृहिणी होती. मुलगी मामाकडे राहून पुण्यात शिक्षण घेत होती. त्यामुळे घरात राजा-राणीचा संसार होता. सुमीच्या अनेक ओळखीपाळखी होत्या. त्यामुळे तिला जायला-यायला अनेक घरं होती. तशीच ही माझी मैत्रीण!

मी मात्र आमची बदली झाल्याने बाहेरगावी होते. आमची दोघींची प्रत्यक्ष भेट होत नव्हती. पण फोनवर तर
भेटतच होतो. त्यामुळे तिच्याकडची खबरबात फोनवरूनच कळायची. सुमाचा तिच्या घरातला वावर अगदी मुक्तपणे चालायचा.

एकदा मैत्रिणीने कुठल्या तरी लग्नाला जायचं म्हणून अहेराची पाकिटं तयार करून तिच्या बेडरूममध्ये बेडवरच्या पर्समध्ये ठेवली होती. सुमी तिला हाका मारत बेडरूममध्ये आली. तिथे मैत्रीण उद्या लग्नाला जायचं म्हणून सगळ्यांचे कपडे वॉर्डरोबमधून काढत हँगरला लावून ठेवत होती. तिथेही सुमी तिला कपडे निवडून हँगरला लावायला मदत करीत होती. आपल्या अशा वागण्याने ती दुसऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करायची. बाहेरच्या खोलीत लँडलाइन वाजत होता म्हणून मैत्रीण पटकन बाहेर गेली. फोन करून ती बेडरूममध्ये आली. सुमीने सगळे कपडे नीट हँगरला लावून ठेवले. आता बराच उशीर झाला म्हणून सुमी जायला निघाली. हसत हसत तिने मैत्रिणीचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरचा मुहूर्त म्हणून मैत्रिणीने भराभर सर्वांचं आवरून घेतलं. पर्समध्ये अहेराची पाकिटं ठेवली होती, त्यावरची नावं ती वाचत होती. त्यात एक पाकीट कमी दिसत होतं. तिने पुन्हा एकदा पर्सचे सगळे कप्पे तपासले. पण नवऱ्या मुलाच्या नावाचं पाचशे रुपयांचे पाकीट दिसत नव्हतं. तिने आठवून पाहिलं, कपाटात शोधलं. पण कुठेच शोध लागला नाही. तिची छोटी मुलगी पिंकी आईला, “बाबा तुझी वाट बघतायत” असं सांगत होती. पण आई काहीतरी शोधतेय म्हटल्यावर तिने विचारलं, “काय शोधतेस?” मैत्रीण म्हणाली, “अगं पर्समधील अहेराचं एक पाकीट सापडत नाहिये.”

पिंकी म्हणाली, “अगं तू फोन घ्यायला गेलीस ना, तेव्हा सुमीमावशी तुझी पर्स उघडून बघत होती. म्हणाली, ‘किती सुंदर पर्स आहे तुझ्या आईची? कुठे घेतली विचारते आता तिला!’ पण ती उशीर झाला म्हणून मग निघून गेली.” मैत्रीण मुलीचं बोलणं ऐकून अवाक् झाली. घरात ती तिघंच होती. बेडरूममध्ये तर ती आणि सुमीशिवाय कुणीही नव्हतं. मग अहेराचं एक पाकीट सुमीनं… तिला सुमीकडचे केसांचे चाप, चप्पल, सुंदर सुंदर इअरिंग्ज… या सर्वांचा उलगडा झाला. माझ्या मैत्रिणीला स्वप्नातही हे खरं वाटलं नसतं. पण तेच खरं होतं. सुमीचं हे रूप पाहून तिला खरंच चीड आली होती. तिने तडक फोन उचलला नि सुमीला लावून बाकी काही न बोलता निक्षून म्हणाली, “यापुढे माझ्याकडे कधीही यायचं नाहीस…!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -