Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमोदींच्या संकल्प यात्रेतून देशवासीयांशी सफल संवाद

मोदींच्या संकल्प यात्रेतून देशवासीयांशी सफल संवाद

केंद्र सरकार असो वा राज्य सरकार. ते जनतेसाठी विविध योजना जाहीर करतात; परंतु या योजनांची तळागाळातील जनतेला अनेकदा माहिती नसते. त्यामुळे लालफितीतील योजनांचा कारभार हा सरकारी बाबूंचा कागदी खेळ राहतो. त्याचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळतो का? याचे कधी मूल्यमापन होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतून जनतेमध्ये सरकारी योजनांबाबत जागरूकता पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाली. तेव्हापासून पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधला आहे. ३० नोव्हेंबर, ९ डिसेंबर, १६ डिसेंबर आणि २७ डिसेंबर अशा चार दिवशी पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हा संवाद साधला होता. तसेच गेल्या महिन्यातील वाराणसी भेटीच्या दरम्यान पंतप्रधानांनी १७ आणि १८ डिसेंबर या दिवशी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून चर्चा केली. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनांच्या लाभांची माहिती कालबद्ध पद्धतीने सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. सुमारे ११ कोटी सहभागींचा टप्पा पार करून ५ जानेवारी २०२४ रोजी विकसित भारत संकल्प यात्रेने महत्त्वाचा टप्पा पार केला, ही कौतुकास्पद बाब आहे. ही यात्रा सुरू झाल्यापासून ५० दिवसांत कोट्यवधींचा आकडा ही आश्चर्यकारक संख्या विकसित भारताचे सामायिक स्वप्न साकार करण्यास मदत करणार आहे. तसेच या यात्रेच्या मोठ्या प्रभावामुळे आणि अतुलनीय क्षमतेमुळे लोकांना एकत्र आणण्याचा उद्देश सफल होत असल्याचे दिसून येत आहे.

कोणत्याही पात्र लाभार्थ्याला सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित न ठेवण्याचे विकसित भारत संकल्प यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यात्रेचा प्रारंभ झाल्यापासून, सुरक्षा वीमा योजना, जीवन ज्योती योजना, पीएम स्वनिधीसाठी लाखो अर्जांसह उज्ज्वला कनेक्शनसाठी १२ लाख नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यात एक कोटी लोकांची क्षयरोग तपासणी आणि २२ लाख लोकांच्या सिकल सेल तपासणीचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की, आज गरीब, दलित, वंचित आणि आदिवासींच्या दारापर्यंत डॉक्टर पोहोचत आहेत जे पूर्वीच्या सरकारांनी आव्हान मानले होते. त्यांनी आयुष्मान योजनेवरही प्रकाश टाकला, जी पाच लाख रुपयांचा आरोग्य वीमा, गरिबांसाठी मोफत डायलिसिस आणि जनऔषधी केंद्रांवर कमी किमतीची औषधे उपलब्ध करून देते. देशभरात बांधलेली आयुष्मान आरोग्य मंदिरे ही गावे आणि गरिबांसाठी मोठी आरोग्य केंद्रे बनली आहेत.

मोदींच्या हमीची गाडी देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचत आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आयुष्य वेचणाऱ्या गरीब लोकांमध्ये आज अर्थपूर्ण बदल होताना दिसत आहे. सरकार लाभार्थ्यांच्या दारापर्यंत येत असून, त्याचा सक्रियपणे लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे जे सरकारी बाबू यांना भेटण्यासाठी जनतेला त्यांच्या कार्यालयात जावे लागत होते ते मोदींच्या हमीच्या गाडीसोबतच सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा हा केवळ सरकारचा प्रवास नसून देशाचा प्रवास बनला आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या कार्यकाळात, शेतकऱ्यांसमोर दररोज उभ्या राहणाऱ्या आव्हानांकडे दुर्लक्ष करून, कृषीविषयक धोरणांशी संबंधित चर्चांची व्याप्ती केवळ उत्पादन आणि विक्री एवढ्यापर्यंतच सीमित ठेवण्यात आली होती.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला किमान ३० हजार रुपयांची मदत, पीएसीज, एफपीओ यांसारख्या संघटनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात सहकाराला प्रोत्साहन, साठवण क्षमतेमध्ये वाढ तसेच अन्न प्रकिया उद्योगाला चालना यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी या यात्रेदरम्यान केला आहे. आमच्या सरकारने, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, असे मोदी यांचे म्हणणे आहे. ‘मोदींची हमी’ हा जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. हमीची रूपरेषा आणि मिशन मोडमध्ये लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या तर्कावर केंद्र सरकारकडून बारीक लक्ष असून, विकसित भारतचा संकल्प आणि योजनेचा तो दुवा आहे. पंतप्रधान मोदींनी गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकला.

आधीच्या पिढीने जे जीवन जगले ते आताच्या आणि भावी पिढ्यांना जगावे लागू नये, अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. देशाच्या मोठ्या लोकसंख्येला छोट्या-छोट्या दैनंदिन गरजांच्या संघर्षातून बाहेर काढायचे आहे, त्यामुळे आम्ही गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. आमच्यासाठी या देशातील चार मोठ्या जाती आहेत. जेव्हा गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम होतील, तेव्हा देश सामर्थ्यवान होईल, असे लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्प यात्रा ही केवळ सरकारचीच नाही, तर देशाची यात्रा बनली आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी मोदी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम झाल्यावरच देश सामर्थ्यवान होण्यास मदत होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -