Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सजिद्दी अजितचा स्मृती जागर

जिद्दी अजितचा स्मृती जागर

  • कर्टन प्लीज : नंदकुमार पाटील

अजित भगत म्हणजे भिडस्त, स्पष्ट, शिस्तीचा बडगा, मुडी, रात्र म्हणजे मित्रांचा गोतावळा. अशी काहीशी कुजबूज प्रायोगिक, हौशी, स्पर्धात्मक नाटकात ऐकायला मिळत होती. गेल्या महिन्यात अजित यांचे निधन झाले आणि आता समाजमाध्यमांवर काही रंगकर्मी मन व्यक्त करायला लागले होते. मला त्यांनीच घडवले, जे ठरवले ते झाले पाहिजे अशा वृत्तीचे ते होते. अजितसर आयुष्यभर प्रायोगिक नाटकासाठी जगले. त्यांच्या कल्पक, चातुर्य, जागृतीमुळे नाट्य स्पर्धा खऱ्या अर्थाने विस्तारली. ज्या कठीण विषयाला कोणी स्पर्श करत नाही, त्यात त्यांनी आपले दिग्दर्शन कौशल्य दाखवले आहे. त्यामुळे अजित हे बहुआयामी दिग्दर्शक होते. समाजमाध्यमावरच्या या प्रतिक्रिया अजित यांच्या चाहत्यांना एकसंध बांधण्यासाठी पुरेसे ठरले. व्यावसायिक शेफ म्हणून ओळखले जाणारे चेतक घेगडमल हे मनाने पूर्णपणे नाट्यकर्मी आहेत. छान लेखनही ते करतात. त्यामुळे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हौशी, प्रयत्नशील रंगकर्मींना एकत्र आणले. अजितवर भरून प्रेम करणाऱ्या समस्त रंगकर्मीच्या ग्रुपला त्यांनी नाव दिले ‘अजित फॅन क्लब’. दत्ता मोरे हे पोलीस सेवेतून निवृत्त झालेले सच्चे कार्यकर्ते आहेत. पण नाट्यकलेला सलाम ठोकणे त्यांचे काही थांबलेले नाही. गेल्या दोन वर्षांत अजितने त्यांच्या ‘विघ्नहर्ता’ या संस्थेला मार्गदर्शन करून संस्थेच्या ओंजळीत प्रतिष्ठेचे पुरस्कार बहाल केले होते. हुंदका आवरता येत नाही म्हणताना त्यांनी छोटेखानी शोकसभा आयोजित केली होती. सान्निध्यात आलेल्या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता एक शोकसभा झाली आहे म्हणताना दुसरी कशाला हवी? असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला नाही. कारण एक सभा शब्द व्यक्त करणारी होती आणि दुसरी अजित यांचा दिग्दर्शन कसे दाखवणारी होती. एकंदरीत काय तर तो जिद्दी अजित यांचा स्मृती जागर होता.

अजित भगत हे तसे प्रेक्षकांच्या गर्दीपासून लांब राहाणे पसंत करत होते. नाटकात, चित्रपटात ते दिसले; परंतु गर्दीत मिरवणे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बसत नव्हते‌. दादरला आले की, त्यांना छबिलदासची गल्ली महत्त्वाची वाटत होती. पण फॅन क्लबने आयोजित केलेला जागर हा कार्यक्रम हाऊसफुल्ल प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला होता. नाटक, संगीत यांचे सादरीकरण आणि सोबतीला प्रज्ञावंतांचे विचार मंथन असे त्याचे स्वरूप होते. त्यासाठी दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक प्रेमानंद गज्वी, अभिनेते प्रमोद पवार, दिग्दर्शक गिरीश पतके यांना निमंत्रित केले होते. ‘दिग्दर्शक म्हणून मी आता परिचयाचा झालो असलो तरी अजित यांनी माझ्यातल्या अभिनेत्याला हेरले होते. त्यामुळे नाट्य क्षेत्रात वावरणे सोपे झाले. दिशा ठरवता आली’. अशी प्रतिक्रिया केंकरे यांनी यावेळी दिली. ‘जय जय रघुवीर समर्थ’ या नाटकाचे प्रयोग करीत असताना, त्याला विरोध करणारे संत, महंत सज्जनगडावरून नाटकाच्या प्रयोगाला आले होते. ‘नाटक बंद करा’ असे त्यांचे सांगणे होते. अजित हे ठामपणे उभे राहिले. त्यामुळे पुढचे प्रयोग करणे शक्य झाले. नाटकाच्या निर्मितीत दिग्दर्शनाबरोबर आर्थिक भार त्यांनी उचलला होता. हे विशेष म्हणावे लागेल.’ अशी प्रतिक्रिया गज्वी यांनी आपल्या मनोगतात सांगितली. ‘माणूस आणि तोही कलाकार म्हटल्यानंतर चांगल्या, वाईट गोष्टी या असतातच; परंतु अजित यांच्याबाबतीत सोबतच्या काही कलाकारांनी, दुरून गंमत पाहणाऱ्या व्यक्तींनी वाईट गोष्टीचा प्रचार अधिक केला. असे निरलस, निष्टेने बऱ्याच काम करणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत होते. आपण सर्वांनी ते टाळले पाहिजे’. अशी विनंती पडते यांनी केली. प्रमोद पवार हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अजित त्यांच्या सच्या मित्राचे दाखलेही ते देत होते.

अजित भगत यांनी ज्या नाटकाचे दिग्दर्शन केले त्या गाजलेल्या नाटकांचा अाविष्कार येथे सादर करण्यात आला होता. नेपथ्य विरहित सादर करणे असले तरी सहभागी कलाकारांनी, निर्मिती संस्थांनी रंगभूषा, वेशभूषा, संगीत याची गल्लत होणार नाही याची काळजी घेतली होती. संस्था, कलाकार यांनी नाट्यसंहिता सादर करण्यासाठी तत्परता दाखवणे म्हणजे अजित यांच्यावरचे प्रेम, आदर व्यक्त करणे म्हणावे लागेल. निनाद म्हैसाळकर यांनी सहकारी वादकांसोबत काही गाणी सादर केली अर्थात ती अजित यांच्या आवडीची आणि सहभागाची होती. ‘विघ्नहर्ता’ या संस्थेने ‘दि मिशन व्हिटरी’ या नाटकाचा काही भाग सादर केला. अजित यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक होते. राज्य, कामगार नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत या नाटकाचा समावेश होता. ‘एलेगोरीया दि लेडी ऑर दि टायगर’ हे अमर हिंद मंडळाचे नाटक सादर करण्यासाठी मंडळाच्या अमित सोळंकी, इशिता वरळीकर, आदित्य आंब्रे या कलाकारांनी पुढाकार घेतला होता. ‘तीर्थ मे सब पानी हैं’ हे नाटक सादर करण्यासाठी दीपाली जाधव, प्रदीप डोईफोडे हे पुढे आले होते. आतापर्यंत सादर केलेली अजित यांची ही नाटके आठवणीला उजाळा देणारी होती. पण ज्या नाटकामुळे अजित हे पुरस्काराचे साक्षीदार झाले. ती दोन नाटके म्हणजे ‘इन्शअल्ला’ आणि ‘द डेथ ऑफ काँकरर’ हे नाटक सांगता येईल. ‘अविष्कार’ आणि ‘सूर प्रवाह’ यांनी हे नाटक सादर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सुशील इनामदार आणि त्यांच्यासोबत मृणाल वराडकर आणि डॉ. देवश्री साने यांचा हा या नाटकात सहभाग होता. ‘लोक महाभारत अर्थात जांभूळ आख्यान’ ही लोकनाट्य प्रकारातली नाट्यकृती यातील लोकगीत सादर करण्यासाठी गायक नंदेश उमप यांना निमंत्रित केले होते. या भावपूर्ण कार्यक्रमाला अिजत भगत यांची पत्नी चित्रा भगत आणि भाचा देवेंद्र राऊत उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -