Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त!

पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त!

अनेक ठिकाणी नाकाबंदी, तर एसओपी यंत्रणा कार्यान्वित

पालघर (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथल्या समुद्रात बेवारस अवस्थेतील बोटीत सापडलेल्या हत्याराने सर्व सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. त्यामुळे १२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला पालघर जिल्हासुद्धा सावध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे डहाणू येथे असलेल्या तटरक्षक दलाकडूनही सतर्कता बाळगण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पालघर जिल्ह्यात सुमारे १२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथल्या समुद्रात बेवारस अवस्थेतील बोटीमध्ये हत्यारे सापडली होती. त्यामुळे समुद्र किनारपट्टी ठिकाणी कुठलाही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये याकरिता सावधानतेच्या सूचना पालघर पोलिसांकडून जिल्ह्यातील आठ सागरी पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. तर रायगड मधल्या या घटनेनंतर सर्व ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीत बंदोबस्त ठेवून (एसओपी) कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे. सुमारे शंभर ते दीडशे पोलीस समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवून असल्याचेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता मच्छीमार सोसायटी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना समुद्रात काही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) कार्यान्वित करण्यात आल्या असून मच्छीमार वस्त्यांमध्ये असलेली लहान मोठे गट जे समुद्रावर देखरेख ठेवण्याची काम करतात त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आला असून समुद्रकिनाऱ्यावरून बाहेर पडणारे मार्ग म्हणजे जेटी बंदर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी टॉवर्स आहेत. तिथे टेहळणी पथके लक्ष ठेवून आहेत. स्थानिक पातळीवर संपर्क साधण्यात येत असून तटरक्षक दलाशी ही संपर्क साधण्यात आला आहे, असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले फोर्स वनच्या धरतीवर जलद प्रतिक्रिया पथक तयार असून काही प्रसंग घडल्यावर त्याला सडेतोड जवाब देण्यासाठी टीम तयार ठेवण्यात आली आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारे उपलब्ध असून त्यांना अतिमहत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

अशा घटना राज्यात कुठेही घडल्यावर मच्छीमार सतर्कता बाळगतात व कुठेही संशयास्पद हालचाल दिसल्यावर त्वरित पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबतची खबर पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. – राजन मेहेर, चेअरमन सातपाटी मच्छीमार सोसायटी

मुंबई किनारे आणि आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर आम्ही विशेष लक्ष दिले आहे. सागर रक्षक दलाचे जवान यांना सतर्क केले आहे. त्यांची नजर असणार आहे. कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती संशयास्पद वाटली तर ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त, मीरा-भायंदर पोलीस मुख्यालय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -