Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीSamyukta Kisan Morcha : संयुक्त किसान मोर्चाचे आज मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन

Samyukta Kisan Morcha : संयुक्त किसान मोर्चाचे आज मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन

शेतीवर अवलंबून असणार्‍या सर्व घटकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा

मुंबई : राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील शेतकर्‍यांची (Farmers) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाण्यावाचून पिके करपून चालली आहेत. त्यातच कांदा निर्यातीवर कर लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे बळीराजा पिळवटून निघत आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज माफीची आश्वासनं पाळली जात नाहीत. या व अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत (Mumbai) संयुक्त किसान मोर्चाचे (Samyukta Kisan Morcha) राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार्‍या या अधिवेशनात शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छीमार या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा होणार आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या स्थापना दिनानिमित्त हे अधिवेशन होणार आहे. स्थापना संमेलनाच्या निमित्ताने या अधिवेशनात जोरदार राज्यव्यापी कृती कार्यक्रम देणारा एक जाहीरनामा घोषित केला जाणार आहे. त्याआधारे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला मोठी चालना देण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनात संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते उपस्थित रहाणार असून त्यात कॉ. राजाराम सिंग, श्री. डॉ. दर्शनपाल, कॉ अतुल कुमार अंजान, कॉ. डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, डॉ. सुनिलम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात महाराष्ट्रातील २७ किसान संघटना एकत्र येणार आहेत.

केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० ते ११ डिसेंबर २०२१ असा वर्षभर संघर्ष केला होता. या आंदोलनाआधी ऑक्टोवर महिन्यात दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. दिल्लीत वर्षभर झालेल्या किसान आंदोलनाने देशभरातल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद दिली होती. या आंदोलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या संघटनांच्या पुढाकारातून राज्य शाखा स्थापनेचे हे अधिवेशन घेण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातील प्रमुख ११ किसान संघटनांसह विविध २७ संघटना सहभागी होत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -