Share
  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

नूतनताई या ठाणे महानगरपालिका, शिक्षण विभाग येथे गेली ३३ वर्षे वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.संवेदनशील लेखिका, माणुसकीचे गुण, सामाजिक जाण ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. आपल्या कार्यामधून भावी पिढीवर संस्काररूपी ‘बी’ रुजवून त्याचा ‘अंकुर’ बनविण्याचे चेतनादायी काम नूतनताई करत आहेत.

‘किलबिल किलबिल पक्षी बोलती,
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले बहरती,
फुलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई…’

खरोखर, आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नात कधी ना कधी असे गाव आले असेल; परंतु प्रत्यक्षात असे गाव तयार करण्यात किती कष्टं असू शकतात हे त्या व्यक्तीलाच ठाऊक असते, जिने त्यासाठी प्रयास केला आहे. असेच एक काहीसे आगळे-वेगळे स्वप्नं साकार करण्याचा प्रयत्न नूतनताई बांदेकर यांनी आपल्या कृतीतून केला आहे.

नूतनताई या ठाणे महानगरपालिका, शिक्षण विभाग येथे गेली ३३ वर्षे वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत पंचवीसपेक्षा अधिक शिक्षक प्रशिक्षणांमध्ये त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. संवेदनशील लेखिका, माणुसकीचे गुण, सामाजिक जाण ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांनी आपुलकीचे बंध निर्माण केले आहेत आणि त्यामुळे आपण करत असलेल्या कामात त्या समाधानी आहेत. आपल्या शाळेत त्या विविध कामांचे आयोजन करतात. आजवर नूतनताई यांनी बोलक्या भिंती, मातीविरहित टेरेस गार्डन, वारली पेंटिंग्ज, पर्यावरणस्नेही राखी बनविणे, वृक्षबंधन, बर्ड फीडर, इको-फ्रेंडली गणपती, पर्यावरणस्नेही होळी (नैसर्गिक रंग तयार करणे) असे पर्यावरणस्नेही उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले आहेत.

शालेय वयातील विद्यार्थी निरीक्षणप्रिय असतात, म्हणूनच योग्य वयात त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. खासकरून मोठ्यांच्या सवयी ते निरीक्षणातून उचलतात. तंबाखू, सिगारेट, दारू सेवन अशी व्यसने त्यांना लागू शकतात. या बाबींमधील धोके जाणून नूतनताईंनी तंबाखूमुक्तीसाठी शाळेत निरनिराळे उपक्रम घेतले. चार लेखांची मालिका दै. ठाणे वैभवला प्रकाशित करून जनजागृतीसाठी प्रयत्न केले. त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील ‘व्यसनमुक्त भारत’ या पुस्तकामध्ये ‘तंबाखूमुक्त शाळा’ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला आहे.

सतत उद्यमशीलता हे नूतनताईंचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी शाळेच्या आवारात मोकळी जागा नसल्याने त्यावर तोडगा म्हणून शाळेच्या टेरेसचे रूपांतर सुंदर अशा बागेत करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार त्यांनी ‘हिरवे स्वप्न’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांना बागकामाचे धडे देण्यास सुरुवात केली. आधी तीस ते चाळीस कुंड्यांमध्ये असलेली बाग मागील वर्षी ३३० कुंड्यांपर्यंत पोहोचली. या उपक्रमातून बागकामाबरोबरच घरातील ओला-सुका कचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती, प्लास्टिकचा पुनर्वापर असे पर्यावरण शिक्षण मुले घेत आहेत. सुका पालापाचोळा व कंपोस्ट खत यावर बहरलेली ही बाग म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग आहे.

ठाणे (मनपा) शाळेतील विद्यार्थांनी शिक्षिका नूतनताईंच्या सहकार्याने संपूर्ण टेरेसच्या भिंती, जमीन यावर पर्यावरणपूरक संदेश देणारी तसेच वारली चित्रशैलीतील चित्रे रेखाटून टेरेसचे एका सुंदर बागेत रूपांतर केले आहे. काही मोठ्या बाॅक्समध्ये मेथी, पालक, मोहरी, घेवडा, कारले, वांगी, मिरची, मटार, गाजर, बीट, कांदे, बटाटे, टोमॅटो, अळू, आले, लसूण, हळद अशा भाज्यांची लागवड केली आहे. इतर काही कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. त्यामध्ये शतावरी, शंखपुष्पी, ओडोमाॅस, लाजाळू, वेखंड, ब्राह्मी, पुदिना, शमी, अडुळसा इ. वनस्पतींची लागवड केली आहे. टेरेसवर काही कुंड्या फुलझाडांनी सजल्या. त्यात जास्वंदी, गुलाब, अबोली, हळदीकुंकू, सोनटक्का, मोगरा, रातराणी, सदाफुली, पिवळी बेलफ्लाॅवर्स अशी अनेक प्रकारची फुलझाडे तिथे लावली गेली. मागील जून महिन्यात मुलांनी आंबा, सीताफळ, पपई, जांभूळ, बदाम यांच्या बिया जमवून फळझाडांची रोपे तयार केली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘वातावरण कृती प्रकल्प-२०२३’ या जागतिक व्यासपीठावर सहभागी होऊन ठाणे महापालिका शाळेचे नाव जागतिक पातळीवर नेले. हा पर्यावरणविषयक उपक्रम जगातील १५३ देशांपर्यंत पोहोचवला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात इतर देशांतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी मुलांना मिळाली. या विद्यार्थ्यांनी युक्रेन, स्पेन, सर्बिया, नायजेरिया, युनायटेड अरब इमिरेट्स, श्रीलंका अशा विविध देशांतील शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नूतनताई म्हणतात, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व शाळांना आपल्या देशातील, आपल्या स्थानिक वातावरण बदलाची कारणे व त्याचे होत असलेले परिणाम, ते कमी करण्यासाठी शोधलेले उपाय याविषयी माहिती दोन्ही देशातील विद्यार्थी एकमेकांना देत असतात. त्यामुळे माहितीची देवाण-घेवाण होते.”

नूतनताईंनी तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आताची अवस्था याविषयी माहिती देणारी संशोधनपर लेख मालिका लिहून त्यांनी ‘मुक्काम पोस्ट तलाव’ नावाचा लेखसंग्रह प्रकाशित केला आहे. शिलाहारकालीन एकूण ६० पेक्षा अधिक असलेल्या तलावांपैकी आजच्या घडीला अस्तित्वात असलेले ४२ तलाव त्यांनी शोधून काढले आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. आलेल्या ‘माझा तलाव’ मोहिमेच्या माध्यमातून त्या तलाव संवर्धनासाठी जनजागृतीचे काम करीत आहेत. या मोहिमेअंतर्गत शाळेच्या परिसरातील तलावांची ओळख मुलांना करून देणे हे काम चालते. त्यामुळे पर्यावरणाविषयी सजगता निर्माण होणे, तलावांची स्वच्छता या आवश्यक बाबी मुलांच्या मनात रुजण्यास मदत होते. आपल्या देशाचे भावी नागरिक ही मुले आहेत. त्यामुळे आपला परिसर, शाळा, सभोवतालचे वातावरण याविषयी आत्मभान जागरूक करणे या गोष्टी लहानपणापासून मनावर ठसविणे आवश्यक ठरते, जेणेकरून भविष्यकाळात भावी पिढीला अशा गोष्टींची जाणीव व्हावी.

जल प्रदूषणाची कारणे अनेक आहेत, यात औद्योगिक कचरा, शेतीविषयक कामे, घरगुती सांडपाणी, तेल गळती, सागरी डम्पिंग इ. याबाबत मुलांचे समुपदेशन केले जाते. यात उपायांमध्ये प्रामुख्याने कचरा कमी करणे, रसायनांची योग्य विल्हेवाट लावणे, पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया अशा विविध गोष्टींबाबत मुलांचे समुपदेशन केले जाते.

नूतनताई व त्यांच्या शिक्षकवर्गाने त्यांच्या शाळेच्या आझाद नगर, स्वस्तिक पार्क, तुरफापाडा, धर्माचा पाडा येथील शंभर गरजू विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना कोरोना काळात ‘उडान वेल्फेअर फाऊंडेशन’ या संस्थेकडून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळवून त्याचे वाटप केले. कष्टकरी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला पौष्टिक आहार म्हणून गूळ-शेंगदाणे, चणे व राजगिरा चिक्की असा पौष्टिक खाऊ ‘उडान’कडून मिळवून देण्याचे काम नूतनताई मे २०२० ते ऑक्टोबर २०२० पर्यंत सतत करत होत्या. या सर्व कुटुंबांना त्यांनी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे वाटप केले. त्याचबरोबर अनेक भयग्रस्त पालकांना समुपदेशन केले.

कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांनी सहा कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले. कोविड-१९ महामारी दरम्यान स्वखर्चाने आणि मित्रमंडळींकडून निधी घेऊन २७५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे सातत्याने वाटप केले. “अन्नदान, ज्ञानदान आणि जनजागृती या माध्यमातून आपल्याला आपले सामाजिक ऋण फेडता येते.” हे नूतनताईंनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

नूतनताईंच्या कोरोना वैश्विक महामारीच्या काळात, त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ ठाणे पॅराडाईजकडून ‘डाॅक्टर्स डे’चे औचित्य साधत, त्यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार, ठाणे गौरव प्रतिष्ठानचा ठाणे गौरव पुरस्कार, पुढारी सन्मान पुरस्कार २०२३, सर्वद फाऊंडेशनचा स्टार पुरस्कार अशा मानाच्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नूतनताईंनी ठाणे वैभव दैनिक वर्तमानपत्रात सलग ८ वर्षे, तर पुढारीमध्ये सलग २ वर्षे साप्ताहिक सदर लेखन केले आहे. त्यातून त्यांचे ४ ललित लेख संग्रह प्रकाशित झाले आहेत.

‘आपण फार काही करत नसून हे आपलं कर्तव्यच आहे’, अशा भावनेतून नूतनताई आपले कार्य पुढे चालवित आहेत व शालेय आणि सामाजिक माध्यमातून भावी पिढीवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बालकांमध्ये संस्काररूपी ‘बी’ रुजवून त्याचा ‘अंकुर’ बनविण्याचे चेतनादायी काम नूतनताई आपल्या कार्यामधून करत आहेत.

शक्य असल्यास ठाणे (मनपा) शाळेला भेट देऊन नूतनताई, शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांचे काम जरूर पाहा. ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Recent Posts

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

6 mins ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

1 hour ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

15 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

15 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

16 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

16 hours ago