Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजTeacher student : कधी काळी शिक्षकसुद्धा विद्यार्थी असतो...

Teacher student : कधी काळी शिक्षकसुद्धा विद्यार्थी असतो…

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

मुलांच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत की, अभ्यासाव्यतिरिक्त कोणती पुस्तके वाचणे हे त्यांच्यासाठी आजकाल शक्य होत नाही. अभ्यासक्रम वाढलेला आहे. अभ्यासक्रमातील काठिण्य पातळी वाढली आहे.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच फरक असतो…
कधी काळी शिक्षक सुद्धा
विद्यार्थी असतो!”
आज या लेखाच्या निमित्ताने मला माझ्याच कवितेच्या वरील दोन ओळी आठवल्या.

अनेक वर्ष ‘शिक्षक’ या नात्याने विद्यार्थ्यांमध्ये राहिल्यामुळे मी कायम मनाने तरुणच राहिले. मुलांच्या गोष्टींमध्ये रमले. त्यांच्याबरोबर अनेक सहली केल्या. त्यांच्या गमतीजमती आणि आनंद हा खूप वेगळ्या प्रकारचा असतो, तो अनुभवला. विद्यार्थ्यांवरचा अभ्यासाचा वाढता ताण आणि पालकांचा धाक अनुभवला. त्यांच्याविषयी तक्रारी घेऊन येणारे पालक आणि त्याचा मुलांना होणारा त्रास आणि अभ्यासाचा ताण या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना पालकांच्या बाजूने समजून घेणे. त्यांच्या पालकांचे काय म्हणणं आहे, ते समजावून सांगणं आणि त्याचबरोबर मुलांना जे वाटतं तेही फार चुकीचं नाही, असा त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे. दोन्ही बाजूंच्या या तणावाच्या पातळीवर पुढाकार घेऊन सुधारणा करणे, या सगळ्यात माझे पूर्ण आयुष्य गेले.

मुलांच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत की, अभ्यासाव्यतिरिक्त कोणती पुस्तके वाचणे हे त्यांच्यासाठी आजकाल शक्य होत नाही. अभ्यासक्रम वाढलेला आहे. अभ्यासक्रमातील काठिण्य पातळी वाढली आहे. याचबरोबर प्रत्येकाला ट्युशन क्लासेसला पाठवले जाते. कला किंवा क्रीडा यासाठीही त्यांना वेळ द्यावा लागतो, हे पालकांना समजावून सांगावे लागते. घोडा पाण्याकडे जात नसेल, तर पाणीच घोड्याकडे न्यावे, आणखी काय? अशा तऱ्हेने मी शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यापासून आजतागत कलेचे महत्त्व सांगणे, खेळाचे महत्त्व सांगणे, क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त पुस्तकांची मुलांना माहिती देणे, ती वाचण्याची गरज समजावून सांगणे, त्यांना घरातली पुस्तके आणून देणे, जेणेकरून ते खूप काळ स्वतःकडे ठेवू शकतात. त्यांनी काही चांगले काम केले तर… उदाहरणार्थ मी शास्त्र शिकवते त्यामुळे खूप चांगली प्रयोगवही लिहिली, एखाद्याने कोणत्याही स्पर्धेत फक्त निव्वळ भाग घेतला, भाग घेऊन ज्यात पारितोषिके मिळवले, तर त्यांना आवर्जून पुस्तकं भेट देते. हे सगळे करत असताना मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात.

आमच्या शाळेत एक चौकोनी लोखंडी पेटी असायची ज्याच्या पुस्तक असायची. दर शनिवारी अर्धा दिवस झाल्यावर ती पेटी वर्गात यायची आणि आम्हा सर्व मुलांची झुंबड त्याच्यावर पडायची. त्या गोष्टीचे पुस्तक आठवडाभरासाठी आमच्या नावावर असायचे. संपूर्ण आठवडाभर आम्ही ते पुस्तक वाचायचो. घरात आलेली पुस्तके कुतूहलाने आजी-आजोबा आई-वडील आणि भावंडसुद्धा वाचायची. घरात येणारे मित्रमंडळीही वाचायची. मला आठवतंय त्या पेटीतल्या पुस्तकांची अक्षरशः चाळण झालेली असायची. चित्रं आवडायची की आशय, हे आठवत नाही; परंतु पुस्तकं हाताळावीशी वाटायची, इतके मात्र नक्की.

खरं तर शालेय विद्यार्थ्यांसाठी मी एक कविता लिहिली त्यात त्यांना काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातील काही ओळी या लेखात उद्धृत करते –
हाती त्यांच्या मोबाइल नि डोळ्यांसमोर टीव्ही…
बघताबघता खंगली पिढी जणू झाला टीबी…
घरामध्ये खेळणी-खाऊ-माणसे आणि
शाळेत बाई…
कोणालाही कोणासाठी थोडासाही
वेळ नाही.?

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -