Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपोलिसांच्या निवासस्थानाचे १० वर्षांपासून भिजत घोंगडे

पोलिसांच्या निवासस्थानाचे १० वर्षांपासून भिजत घोंगडे

दोन एकर जागेवर निवासस्थान बांधण्याची गरज

  • वाड्यात ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पडझड 
  • खोल्यांमध्ये उंदीर, घुशींचा वावर

वाडा (वार्ताहर) : वाड्यातील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या १० वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. येथील सर्वच पोलिसांवर महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. वाडा पोलीस ठाण्यालगत पोलीस ठाण्याच्या मालकीची दोन एकरहून अधिक जागा आहे. या जागेवर ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची पडझड झाली आहे. सध्या या जागेला जंगलाचे स्वरूप आले आहे. राहण्यासारखी एकही खोली सुस्थितीत नसल्याने या जागेचा उपयोग गुन्हेकामात पकडलेल्या गाड्या ठेवण्यासाठी केला जात आहे.

या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे निवासस्थान व २७हून अधिक खोल्यांची पडझड झाली आहे. उंदीर, घुशी, साप, डुकरे तसेच मोकाट जनावरे व कुत्री यांचा येथे वावर आहे. निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने येथे एकही पोलीस कुटुंब राहत नाही. ही निवासस्थाने सोडून येथील सर्व पोलिसांवर महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या घरभाड्याच्या तिप्पट रक्कम खासगी निवासासाठी देण्याची वेळ येथील ९५ पोलीस, ५ पोलीस अधिकाऱ्यांवर आली आहे.

वाडा पोलीस ठाण्यालगतच दोन एकर जागेत ६० वर्षांपूर्वी पोलिसांसाठी २७ खोल्या बांधलेली चाळ होती. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अनेकदा दुरुस्त्या केल्याने या ठिकाणी गेल्या १० वर्षांपूर्वी काही पोलीस राहत होते. पण आता येथील सर्वच निवासस्थानांची पडझड झाली आहे.

ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पोलिसांना आपल्या पगारात घरभाडे म्हणून अवघे १५०० ते १७०० रुपये, तर पोलीस अधिकारी यांना २३०० ते २८०० रुपये मिळतात. या पोलिसांना दरमहा घरभाड्यासाठी ४००० ते ६००० हजार रुपये द्यावे लागत आहेत.

पोलिसांच्या नावे जागा

वाडा येथे पोलिसांच्या निवासासाठी दोन एकर क्षेत्र असलेली जागा उपलब्ध आहे. ही जागा पोलीस ठाण्याच्या नावावर आहे. या जागेची साफसफाई करून या ठिकाणी भव्य निवासस्थान बांधले, तर सर्वच पोलिसांसाठी निवासाची व्यवस्था होऊ शकते तसेच ही जागा पोलीस ठाण्यालगतच असल्याने पोलिसांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -