Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजत्वचा आरोग्य

त्वचा आरोग्य

शरीराचे स्वास्थ्य प्रतिबिंबित करणारा आरसा म्हणजे त्वचा होय. “त्वचा” हा शब्द कसा आला, तर त्वचति संवृणोति इति। म्हणजे शरीरात असणारे मेद, रक्त सर्व गोष्टींना आवरण घालणारी ती त्वचा होय. पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीराचे सर्वांत मोठे हे इंद्रिय आहे. एवढेच नव्हे तर स्पर्शनेंद्रिय म्हणून आयुर्वेद शास्त्रात त्वचेची गणना ज्ञानेंद्रियात केली आहे. जिवंत माणसाला जाणवणारा स्पर्श हा त्वचा निरोगी असेल, तर योग्य प्रकारे होतो. शरीराचे तापमान नियमित करणे, संवेदनांची जाणीव करणे आणि रोगांचा प्रतिकार करणे ही त्वचेची कार्ये आहेत. त्वचा शरीराचे वेगवेगळ्या प्रकारे संरक्षण करते. तिच्यामुळे जीवाणू आणि रसायनांना शरीरात शिरण्यास रोखले जाते आणि रोगांपासून बचाव होतो. शरीरातील पेशीचे सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण होते आणि शरीराचे तापमान सामान्य राखले जाते. त्वचेमार्फतच आपल्याला थंड, उष्ण तसेच वेदना, दाब आणि स्पर्शाची जाणीव होते.

त्वचेमध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी असतात; वसामय (तेल) ग्रंथी आणि घर्म ग्रंथी. वसामय ग्रंथी केशपुटकामध्ये उघडतात. या ग्रंथीपासून ‘सेबम’ हा तेलकट पदार्थ स्त्रवतो. त्यामुळे त्वचा आणि केस यांना वंगण मिळून त्याला चमक येते. घर्म ग्रंथीद्वारे स्त्रवणाऱ्या घामामुळे शरीर थंड राहते. या ग्रंथी शरीराच्या सर्व भागात असतात; परंतु कपाळ, तळहात आणि तळपाय इ. भागांत या ग्रंथी अधिक संख्येने असतात. यांपैकी काही ग्रंथी सतत स्त्रवतात, तर काही फक्त शारीरिक किंवा भावनिक ताण पडल्यावर स्त्रवतात. घर्म ग्रंथी बहुतकरून काखेत आणि जांघेत असतात. मात्र त्वचेच्या पृष्ठभागावरील जीवाणूंद्वारे या द्रवावर क्रिया होऊन घामाला विशिष्ट वास येतो.

त्वचेचा रंग लोकसमूह व वैयक्तिकरीत्या वेगवेगळा असतो. त्वचेचा रंग प्रामुख्याने त्वचेमध्ये तयार होणाऱ्या मेलॅनिन (कृष्णरंजक) या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. सर्व लोकांमध्ये मेलॅनिन पेशींची संख्या जवळपाससारखी असते. मात्र सावळ्या वर्णाच्या लोकांमध्ये, गोऱ्या वर्णाच्या लोकांच्या तुलनेत अधिक मेलॅनिन तयार होते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील मेलॅनिनचे प्रमाण आनुवंशिकतेनुसार ठरते. मात्र सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिल्यास मेलॅनिन अधिक प्रमाणात तयार होऊन त्वचा काळवंडते. काही वेळा मेलॅनिन लहान-लहान ठिपक्यांत साचले जाते. बहुधा असे ठिपके चेहऱ्यावर किंवा हातावर दिसतात. व्यक्तीचे वय जसे वाढते तसे मेलॅनिन पेशी असमान दराने मेलॅनिनची निर्मिती करतात. त्यामुळे त्वचेचा काही भाग फिकट, तर काही भाग गडद दिसतो. वयानुसार त्वचा जाड व शुष्क होते आणि सुरकुत्या पडून खपल्या पडू लागतात. मनुष्याच्या आतील त्वचेतील कोलॅजेनचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा ढिली पडते व त्वचेला सुरकुत्या पडतात. वृद्धत्वात त्वचेला पडणाऱ्या सुरकुत्या याच कारणास्तव पडतात. वृद्ध माणसाची त्वचा खरबरीत होते आणि तिला इजाही सहज होते. जखम भरून यायला वेळ लागतो.

वेगवेगळ्या कारणांमुळे त्वचेचे काही विकार होतात. उदा. – त्वचादाह, संसर्ग, भाजणे, अर्बुद आणि अन्य विकार. इसब हा रोग त्वचादाहाचे सामान्य कारण असून त्यामुळे त्वचेला खाज सुटते आणि त्वचा लाल होते. आग, रसायने, विजेचा धक्का किंवा तीव्र सूर्यप्रकाशात अधिक काळ राहिल्यास त्वचा भाजते. यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन उपायययोजना करावी.

त्वचेची निगा :  योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि विश्रांती यांची त्वचा निरोगी ठेवण्याकरिता गरज असते. नित्य अभ्यंग ही गोष्ट सदृढ त्वचेसाठी खूप महत्त्वाची आहे. याशिवाय त्वचा स्वच्छ ठेवण्याची गरजही असते. कारण बाह्य परिसरातील धूळ, सूक्ष्म जंतू इ. हानिकारक गोष्टी तिच्या सतत सान्निध्यात येत असतात. त्वचेची उपांगे म्हणजे केस व नखे सतत वाढत असतात आणि त्यांची योग्य काळजी घेणे जरुरीचे असते. मोकळी थंड हवा व मंद सूर्यप्रकाश त्वचा उत्तेजित करतात, परिणामी त्वचेचे व सबंध शरीराचे स्वास्थ्य टिकविण्यास मदत होते. यासाठी उटणे म्हणून लोध्र, नागरमोथा, मसूर, डाळीचे पीठ वापरावे. अंगावरील कपडे योग्य असावेत. त्यामध्ये व पायमोजामध्ये नायलॉनासारख्या सूक्ष्मग्राही धाग्यांपासून बनविलेले कपडे नसावेत. नायलॉनाचे कपडे उष्ण कटिबंधातील प्रदेशात अयोग्य असतात, कारण घामाच्या शोषणात आणि बाष्पीभवनात ते अडथळा उत्पन्न करतात. याशिवाय त्या घामामध्ये रसायने विरघळून ती स्पर्शजन्य त्वचाशोथास कारणीभूत होतात. त्वचेशी संपर्क येणाऱ्या चष्म्याची चौकट, गळ्यातील कृत्रिम अलंकार, घड्याळाचे पट्टे, रबरी किंवा प्लास्टिक पादत्राणे इत्यादींच्या बाबतींतही योग्य ती काळजी घेणे जरूर असते.
थोडक्यात, त्वचारूपी आरसा कायम नितळ राहावा यासाठी वरील सर्व बाबी लक्षात घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकेल.

-डॉ. लीना राजवाडे

leena_rajwade@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -