Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीShree krishna and Arjuna : अर्जुन-आरसा

Shree krishna and Arjuna : अर्जुन-आरसा

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

श्रीकृष्ण देव म्हणून, तर अर्जुन भक्त म्हणून उंच पातळीवरचे! त्यामुळे त्यांच्यात देणं-घेणं नाही. अर्जुनाच्या एकनिष्ठ भक्तीमुळे, ज्ञानाच्या जिज्ञासेमुळे तो जणू देवाशी एक झाला आहे. त्यांच्यासाठी ज्ञानदेव सार्थ असा आरशाचा दाखला देतात.

श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील नातं हा ज्ञानेश्वरीतील अगदी खास भाग! श्रीकृष्ण हे साक्षात भगवान, तर अर्जुन हा त्याचा परमभक्त! पण त्यांच्यातील नात्याला अजून कितीतरी पैलू आहेत – मित्र, मार्गदर्शक, सखा, प्रियकर इ. ज्ञानदेव ते आपल्यापुढे अशा बहारीने मांडतात की आपण त्यात रंगून जातो, रमून जातो.

जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला पुन्हा एकदा हे ‘आत्मज्ञान’ देण्यास तयार होतात, तेव्हाच्या अठराव्या अध्यायातील या ओव्या पाहाव्यात! श्रीकृष्ण अर्जुनाला किती आपला मानतात, नव्हे ‘आपणच’ मानतात, याचं वर्णन ज्ञानदेव करतात.

‘अर्जुना, आरशाला वारंवार स्वच्छ करून, पुसायचे ते आरशाकरिता नसून, स्व-स्वरूपाचं सुख भोगण्याकरिता आपण ते करतो.

त्याप्रमाणे पार्था, तुझे उगीच निमित्त करून मी आपल्याचकरिता बोलतो, तुझ्या आणि आमच्यामध्ये काही दुजेपणा आहे काय?

आरिसाचिया देखिलया। गोमटें कीजे धनंजया।
तें तया नोहे आपणया। लागीं जैसें। ओवी क्र. १३४७

तैंसे पार्था तुझेनि मिषें। मी बोलें आपणयाचि उद्देशें।
माझ्या तुझ्या ठांई असे। मीतूंपण गा? ओवी क्र. १३४८

‘गोमटें’ शब्दाचा इथे अर्थ ‘स्वच्छ’ तर ‘मिषे’ म्हणजे निमित्ताने.

श्रीकृष्णांचं किती प्रेम आहे अर्जुनावर! ते ज्ञानदेव रेखाटतात. म्हणून त्यांनी श्रीकृष्णांच्या तोंडी संवाद घातला, “अर्जुना, तुझ्या व माझ्यात काही वेगळेपणा आहे का?”

प्रेमाची ही परमोच्च पातळी ज्ञानदेव दाखवतात. पुढच्याही संवादात ती दिसते, “पार्था, तुझं निमित्त करून मी आपल्याचकरिता बोलतो.”

हे ‘आत्मज्ञान’ घेण्याची ओढ अर्जुनाला लागली आहे; तर श्रीकृष्णांना निकड वाटते ते ज्ञान देण्याची. ही झाली नेहमीची ज्ञान देण्या-घेण्याची क्रिया, व्यवहार! पण श्रीकृष्ण देव म्हणून, तर अर्जुन भक्त म्हणून उंच पातळीवरचे! त्यामुळे त्यांच्यात देणं-घेणं नाही. अर्जुनाच्या एकनिष्ठ भक्तीमुळे, ज्ञानाच्या जिज्ञासेमुळे तो जणू देवाशी एक झाला आहे.

इथे ज्ञानदेव दाखला योजतात तो अगदी अचूक! आरशाचा! किती सार्थ! आरसा स्वच्छ असतो. मग त्यावर मळ जमा होऊ लागतो. तेव्हा तो वारंवार पुसून स्वच्छ ठेवावा लागतो. अशा आरशात आपण आपलं स्वरूप नीट पाहू शकतो.

त्याप्रमाणे इथे अर्जुन हा जणू आरसा आहे. त्यावर ‘मी युद्ध कसं करू?’ हा अविचाराचा मळ जमा झाला. श्रीकृष्णांनी ज्ञान देऊन तो स्वच्छ केला. पण अर्जुनाच्या मनात पुन्हा एकवार हे आत्मज्ञान घ्यावं अशी इच्छा निर्माण झाली. त्याने न सांगता श्रीकृष्णांनी ती ओळखली. म्हणजे हा आरसा अधिक स्वच्छ करण्यास भगवान तयार झाले. ‘तुझं निमित्त करून मी आपल्याचकरिता बोलतो’ या संवादातून अजून एक सूचित होतं – अर्जुन हे केवळ निमित्त आहे. श्रीकृष्ण जणू स्वतःचं ज्ञान या निमित्ताने अधिक स्पष्ट करून घेत आहेत. या अर्थाने हा संवाद नसून जणू श्रीकृष्णांचं मनोगत आहे. कारण श्रीकृष्ण आणि अर्जुन एकरूप झाले आहेत. ज्ञानेश्वर ते किती प्रभावी पद्धतीने मांडतात!

या मार्मिक दाखल्यातून श्रीकृष्ण-अर्जुन प्रेमाची पराकोटी, श्रीकृष्णांचं वात्सल्य, अर्जुनाची ज्ञानाची ओढ किती उत्कटपणे जाणवते!
म्हणूनच –
वंदन करूया श्रीकृष्णांना!
वंदन करूया श्रीज्ञानेश्वरांना!

(manisharaorane196@gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -