Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजShree Ganesh : श्रीगणेश

Shree Ganesh : श्रीगणेश

  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

बुद्धीचा देवता असलेल्या श्रीगणेशाची कोणत्याही कामाच्या सुरुवातीला पूजा केली जाते. भगवान श्रीगणेश हे हिंदूंचे आराध्यदैवत! गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव महाराष्ट्रातच नव्हे, तर जगात सर्वत्र आनंदी वातावरणात साजरा केला जातो.

भाद्रपद शुल्क चतुर्थी हा श्रीगणेशाचा जन्मदिवस, गणेश चतुर्थी म्हणून ओळखला जातो. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. भगवान श्रीगणेश हे हिंदूंचे आराध्यदैवत! हा श्रीगणेश विघ्नहर्ता, कला-विज्ञान-शिक्षणाचा संरक्षक, नशीब आणणारा आणि बुद्धीचा देवताही असल्याने आदराने सर्वत्र पूजला जातो. प्रथम पूज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगणेशाची कोणत्याही कामाच्या सुरुवातीला पूजा केली जाते किंवा सर्व समारंभाच्या आधी श्रीगणेशाला प्रथम सन्मानित केले जाते. मानवी धडावर हत्तीच्या डोक्यामुळे श्रीगणेश लगेच ओळखला जातो.

गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव महाराष्ट्रात नव्हे जगात सर्वत्र आनंदी वातावरणात साजरा केला जातो. श्रीगणेशाला प्रसन्न करून अनंत चतुर्थीला होणाऱ्या विसर्जनात श्रीगणेश लोकांचे विघ्न घेऊन जातो नि सर्वत्र सुखसमृद्धी देतो.

श्रीगणेशाला वक्रतुंड, गजानन, विघ्नहर्ता, विनायक अशी अनेक नावे असून प्रत्येक नावातून बोध मिळतो. श्रीगणेश किंवा गणपती म्हणजे गणांचा स्वामी म्हणजे ईश वा प्रभू. गण म्हणजे सामान्य लोक/समुदाय/शिवपार्वतीचे सेवक! गणांचा अाधिपती, गणाधिपती हे नाव प्रचलित आहे.

गणरायाचे संपूर्ण शरीर आपल्याला एक शिकवण देत असते.
गणपतीचे भलं मोठं डोकं : विचारशीलतेचे प्रतीक, चौकटीबाहेर जाऊन विचार करा. मस्तक : गणाचं रक्षण करण्यासाठी. बारीक डोळे : समोर जे दिसते त्यापलीकडे पाहण्यासाठी. कान सुपासारखे : लक्षपूर्वक ऐका नि फक्त सार घ्या. गणपतीच्या दोन सुळ्यांपैकी मोठा दात श्रद्धेचा आणि छोटा बुद्धिमत्तेचा. वळणदार लांब सोंड : शक्तीचे प्रतीक. मोठे पोट : गणांच्या काही गोष्टी पोटातच ठेवाव्या लागतात. गणपतीचे चार हात : एका हातात अंकुश – संयमाचा. दुसऱ्या हातात पाश – नियंत्रणाचा, जीवन संतुलित असावं. तिसऱ्या हातात मोदक – आनंद देणारा. चौथा हात आशीर्वादचा-नकारात्मकता दूर करा. श्रीगणेशाचे वाहन मूषक, एकदम छोटं : कुठल्याही गल्लीबोळातील छोट्या घरात जाण्यासाठी. श्रीगणेशाच्या प्रतीकांचा अर्थ समजून घेऊन पूजा करूया. श्रीगणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या; परंतु जेथे स्वयंभू प्राचीन गणेश मूर्ती सापडल्या, अशा स्थळांना विशेष महत्त्व, मान, प्रतिष्ठा आहे. हीच अष्टविनायकांची मंदिरे. प्रत्येक देवळाचा स्वतंत्र्य इतिहास आहे. असंख्य भाविक तेथे भेट देतात. त्याचा थोडक्यात आढावा –

१. मोरेगावचा मोरेश्वर/मयूरेश्वर : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगावी असलेले गणपतीचे मोरेश्वर मंदिर. या मोरेश्वराचे दर्शन घेत असतानाच समर्थ रामदासांनी सुखकर्ता-दुःखहर्ता ही आरती रचली. मोरया गोसावी महाराजांची मयूरेश्वरांवरील प्रचंड भक्तीने मोरेश्वराने प्रसन्न होऊन वरदान दिले, भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील. तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रसिद्ध झाला.

२. थेऊरचा श्री चिंतामणी : पुणे-सोलापूर महामार्गावरील मुळा-मुठा-भीमा या नद्यांच्या संगमावर थेऊरचा श्री चिंतामणी हा भव्य, पूर्वाभिमुख, मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराजांनी हे मंदिर बांधले. कुलदैवत असलेल्या माधवराव पेशव्यांनी देवालयाची शोभा नि भव्यता वाढविली. येथे चिमाजी अप्पानी आणलेली वसईची विशाल घंटा आणि प्रागंणात भव्य कदंब वृक्ष आहे.

३. सिद्धटेकचा सिद्धिविनायक : हा अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदापासून ४८ किलोमीटरवर भीमा नदीच्या काठी आहे. हा एकमेव उजव्या सोंडेचा, दगडी सिंहासनावर बसलेला, उत्तराभिमुख सिद्धिविनायक आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले असून गणपतीची मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेसाठी ५ किलोमीटर चालावे लागते.

४. रांजणगावचा महागणपती : हा पुणे-अहमदनगर मार्गावर श्रीक्षेत्र शिरूरच्या अलीकडे आहे. कमळाच्या आसनावर बसलेला, रुंद कपाळ, अतिशय रेखीव व प्रसन्न मूर्ती असून या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्यकिरण मूर्तीवर पडते.

५. ओझरचा विघ्नेश्वर : हा जुन्नर तालुक्यातील लेण्याद्रीपासून १४ किलोमीटर कुकडी नदीतीरावरील जागृत देवस्थान. या श्रीमंत श्रीच्या डोळ्यांत माणिक, कपाळावर, नाभीवर हिरे, शिखर व कळस सोनेरी असून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चार द्वारपाल आहेत. पूर्वाभिमुख देवळाच्या भिंतीवर सुंदर चित्रे, शिल्पे आहेत. भक्तांना बसण्यासाठी ओवऱ्याही आहेत. सुरक्षितेसाठी बाजूने भक्कम दगडी भिंत आहे.

६. लेण्याद्रीचा गिरिजात्मज : हा गणपती, जुन्नर तालुक्यातील, कुकडी नदीच्या तीरावर, लेण्याद्री गावातील डोंगरावर असलेल्या लेण्यातील सातव्या गुहेत लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झाला होता. हे दक्षिणाभिमुख मंदिर कोणत्याही आधाराशिवाय पूर्णपणे दगडात कोरलेले असून गणपतीची मूर्ती उत्तराभिमुख एकाच पाषाणात आहे. गिरी म्हणजे पर्वताच्या सान्निध्यात असलेल्या या गिरिजात्मज मंदिराकडे येण्यासाठी अंदाजे ३०० पायऱ्या चढाव्या लागतात.

७. महडचा वरदविनायक : हा रायगड जिल्ह्यांत महड गावी आहे. सर्वांची इच्छा पूर्ण करणारा, समृद्धी, यश देणारा हा वरदविनायक दगडी मंदिरात सिंहासनारूढ आहे. हे मंदिर बाहेरून साधे कौलारू घुमटाकार, तर आत उत्कृष्ट कोरीव नक्षीकाम पाहतो. या मंदिराचे वैशिष्ट्य, फक्त या एकाच मंदिरात, सकाळी भाविक स्वहस्ते पूजा करू शकतात. तसेच या मंदिरात १८९२ पासून अखंड नंदादीप तेवत आहे.

८. पालीचा बल्लाळेश्वर : हे रायगड जिल्ह्यातील पाली गावी भक्ताच्या (बल्लाळ) नावाने प्रसिद्ध असलेले अष्टविनायकातील एकमेव मंदिर. ते दगडी चिरेबंदी आहे. मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणे पूर्णपणे दगडाची गणपतीची मूर्ती दगडी सिंहासनावरच पूर्वाभिमुख असल्याने सूर्योदयाची किरणे मूर्तीवर पडतात.

‘गणपती बाप्पा मोरया’ या शब्दामागची कथा – १३७५ मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे परमभक्त होते. प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड (पुणे) पासून ७५ किलोमीटर असलेल्या अष्टविनायकातील मोरगावच्या मयूरेश्वर मंदिरात जात होते. वय वर्षे ११७ नंतर त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून ते दु:खी होते. एके दिवशी भगवान श्रीगणेशाने त्यांना स्वप्नांत दर्शन दिले. दुसऱ्या दिवशी नदीत स्नानाच्या वेळी मिळालेली श्रीगणेशाची छोटी मूर्ती मोरया गोसावीने मंदिरात स्थापन केली. ते मोरया गोसावी मंदिर आजही ओळखले जाते. भक्त गणपतीसोबत मोरया गोसावीचे नाव सहजतेने जोडताना गणपती बाप्पा मोरया बोलू लागले.

अशा या श्रीगणेशाला प्रेमाने आपण बाप्पा म्हणतो. हा श्रीगणेश मूळ भारतीय असून बाप्पाचा अर्थ युनिव्हर्सल फादर आहे. अशा या जगाच्या बाप्पाला माझा साष्टांग नमसकार. गणपती बाप्पा मोरया…!

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -