Monday, May 13, 2024
Homeनिवडणूक २०२४Devendra Fadnavis : २५ वर्षात मुंबईच्या विकासासाठी केलेले एक तरी काम दाखवा

Devendra Fadnavis : २५ वर्षात मुंबईच्या विकासासाठी केलेले एक तरी काम दाखवा

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे उबाठा गटाला जाहीर आव्हान

मुंबई : उद्धव ठाकरेंकडे २५ वर्षे मुंबई महापालिका होती. त्यांनी मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी केलेले एक तरी काम दाखवावे, असे जाहीर आव्हान भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. उत्तर मुंबईचे भाजपा उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी एका सभेला फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संबोधित केले. या सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तर राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत करत कौतुक केले.

राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशाचा विकास पंतप्रधान मोदीच करु शकतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे यांचे आभार मानतो की, देशाला काय हवे आहे, त्याची नाडी त्यांना कळली म्हणून त्यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा दिला, या शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार पियूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यानंतर गोयल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. गोयल यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्म भूषण राम नाईक, आ. प्रवीण दरेकर, आ. विजय गिरकर, आ. योगेश सागर, आ. अतुल भातखळकर, आ. सुनील राणे, आ. मनीषा चौधरी, आ. प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, आरपीआयचे उत्तर मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने मुंबईतील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. मुंबईमध्ये विविध विकास कार्यांचा धडाका लावत प्रत्येक वर्गातील माणसाचे जीवन सुकर करण्याचा विडा केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने उचलला आहे. यंदाची निवडणूक ही सामान्य माणसाच्या विकासासाठीची निवडणूक आहे. सामान्य माणसाच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी मोदी सरकार गेल्या १० वर्षांपासून अथक कार्य करत आहे. यापुढे पाच वर्षे विकासाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी देशाची सूत्रे मोदी सरकारच्याच हाती द्यायला हवी. महायुती म्हणजे सर्वसामान्य सर्वांना सामावून घेत सर्वांगीण विकास करणारी रेल्वे आहे. अशा रेल्वे मध्ये आपल्याला बसायचे आहे की विरोधकांच्या वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या इंजिनच्या रेल्वेत बसायचे आहे हे सूज्ञ मतदारांनी ठरवायचे आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. या सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तर राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत करत कौतुक केले.

मुंबईकरांना आवाहन करतो की, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससमोरचे बटण दाबाल तर ते मत पंतप्रधान मोदींना मिळेल. पंतप्रधान मोदींनी १० वर्षात जे परिवर्तन केले, मजबूत भारत तयार केला. काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट हवी तशी वक्तव्ये करतात ती पाहून मला आश्चर्य वाटते. उद्धव ठाकरेंचे नेते कोण, तर राहुल गांधी. कांग्रेसचे नेते कोण तर राहुल गांधी. आमच्यासह महायुतीचे नेते कोण तर नरेंद्र मोदी. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदींचं इंजिन आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. पण इंडिया आघाडी तयार झाली आहे, त्यात प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजतो. आम्ही मोदींच्या नेतृत्वात काम करतो आहोत. विकासाची ट्रेन पुढे घेऊन जातो आहोत. मुंबईकरांनी विचार करायचा आहे की, नरेंद्र मोदींच्या ट्रेनमध्ये बसायचे की राहुल गांधींच्या न चालणाऱ्या इंजिनमध्ये, या शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशाणा साधला.

दरम्यान, गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी जो विकास केला, तो फक्त ट्रेलर होता. येत्या ५ वर्षांत मुंबईसह देशाचा विकास नरेंद्र मोदी करणार आहेत. पियूष गोयल हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी उत्तर मुंबईतून निवडून येतील, हे माहिती असल्यानेच काँग्रेसला इथे उमेदवार मिळत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा संकल्प महायुतीच्या साथीने प्रामाणिकपणे पूर्ण करेन असे महायुतीचे उमेदवार गोयल यांनी सर्वांना आश्वस्त केले. मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाचे भविष्य उज्वल केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वशक्ती बनवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.

भाजपा मुंबई अध्यक्ष आ. शेलार यांनी उत्तर मुंबईच्या प्रत्येक गल्लीत ‘मोदी है तो मुमकिन है’ चा गजर सुरू असल्याने विरोधकांचे धाबे दणाणल्यामुळेच ठाकरे गटाने तर येथून पळच काढला अशी खिल्लीही त्यांनी उडवली. गोयल हे ५ लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होणार आणि मुंबईतील सर्वच्या सर्व ६ जागा महायुतीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -