Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनप्रयागराजमधील शूटआऊट

प्रयागराजमधील शूटआऊट

  • स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

बंदुकीचा धाक दाखवून दहशत, हत्या, अपहरण, कोटी-कोटींची खंडणी, जमिनीचे हस्तांतर चालू होते, तेव्हा अखिलेश, मायावती आणि ओवेसी कुठे होते?

उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या विरोधात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी झिरो टॉलरन्स धोरण राबवले आहे. हात वर करून, गुडघे टेकून शरण या किंवा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जा.… योगी आदित्यनाथ यांच्या कठोर भूमिकेमुळे वर्षानुवर्षे उत्तर प्रदेशात गुन्हेगारी विश्वात साम्राज्य गाजविणाऱ्या अनेक डॉन-माफियांना पळताभुई थोडी झाली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, अपहरण, खंडणी, जमिनीवर बळजबरीने कब्जा असा हैदोस घालणाऱ्या अनेक गुंडांना योगींच्या राज्यात जेलमध्ये जावे लागले आहे किंवा थेट यमराजाकडे त्यांची रवानगी होते आहे. गुन्हेगार आणि दंगलखोरांना योगींच्या राज्यात फार सावध राहावे लागत आहे, दंगली घडविण्यापूर्वी किंवा गुन्हे करण्यापूर्वी माफियांना शंभर वेळा विचार करावा लागेल, अशी परिस्थिती उत्तर प्रदेशात आहे.

राम नवमीच्या पवित्र दिवशी पश्चिम बंगाल, बिहार व अन्य काही राज्यांत दंगली आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. पण ज्या राज्यात भव्य रामजन्मभूमी मंदिराची उभारणी चालू आहे, या उत्तर प्रदेशात राम नवमीला एकही अनुचित घटना घडली नाही. योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीने माफिया आणि गँगस्टर म्हणून वावरणाऱ्या गुन्हेगारांवर मोठा वचक बसला आहे. “इस हाऊसमें मै कह रहाँ हूँ, इस माफिया को मिट्टी में मिला देंगे…”, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २५ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत दिला होता. राजू पाल हत्या प्रकरणातील साक्षीदार उमेश पाल याच्या झालेल्या हत्येनंतर योगींनी हा इशारा अतिक अहमदचे नाव न घेता दिला होता.

जन्मठेपेची शिक्षा झालेला व पोलिसांच्या कस्टडीत असलेला कुविख्यात डॉन अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ याची प्रयागराजमधील इस्पितळाच्या आवारात रात्री साडेदहाच्या सुमारास हत्या झाली, यावरून देशभर काहूर निर्माण झाले. तिघा तरुण हल्लेखोरांकडून त्याच्यावर गोळ्या घातल्या जात असताना देशातील कोट्यवधी जनतेने टीव्हीच्या पडद्यावर पाहिले. अतिक व अशरफ या दोघा खतरनाक माफियांना रात्री १० वाजता पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात नेणे योग्य होते का? ते दोघे व्यवस्थित चालताना दिसले, मग त्यांची प्रकृती तपासण्याची रात्री घाई होती का? शंभरहून ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत व ज्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, त्याला भेटण्यासाठी व त्यांची मुलाखत घेण्यासाठी टीव्हीचे पत्रकार, कॅमेरामन यांना कोणी परवानगी दिली? उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे तिघे तरुण मारेकरी हे अतिक व अशरफ यांची हत्या करण्यासाठी एकत्र कसे आले? मारेकऱ्यांकडे विदेशी बनावटीची सात-सात लाख रुपये किमतीची महागडी पिस्तुले मिळाली, ती त्यांना कोणी पुरवली? स्वयंचलित आधुनिक पिस्तुले चालविण्याचे त्यांना प्रशिक्षण कोणी दिले? अतिक व अशरफ यांची हत्या केल्यावर व ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर त्यांनी आपली शस्त्रे खाली टाकली व ते पोलिसांना हात वर करून शरण आले, हे दृश्य सर्व देशाने बघितले. पण त्यांच्यापैकी एकाचाही तिथे सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या पोलिसाने एन्काऊंटर केला नाही हे कसे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत.

उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यानंतर गेल्या सहा वर्षांत १०,७१३ एन्काऊंटर झाले आहेत. त्यात १८३ गुन्हेगार व १५ पोलिसांचा बळी गेला आहे. योगी सरकारच्या काळात झालेल्या एन्काऊंटरमध्ये आजपर्यंत ४९११ गुन्हेगार व १४२४ पोलीस जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या लोकांची संख्या अशी…सन २०१७ – २८, २०१८ – ४१, २०१९ – ३४, २०२०- २६, २०२१ – २६, २०२२ – १४, २०२३ (दि. १३ एप्रिलपर्यंत) – १४. अतिक अहमद जेलमध्ये असतानाच त्याचा मुलगा असद व त्याच्या टोळीतील शूटर गुलाम याचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्यावर अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी यांनी थयथयाट केला. विशिष्ट जाती-धर्माचे लोक एन्काऊंटरमध्ये मारले जातात, असा त्यांनी राग आळवायला सुरुवात केली. जाती व धर्म यांचा व्होट बँक म्हणून राजकीय पक्ष उपयोग करतात. पण गुन्हेगार आणि माफियांना जातीधर्माच्या चष्म्यातून बघणे हे धोक्याचे नाही का? हत्या आणि हिंसाचार घडविणाऱ्या गँगस्टरला अगोदर त्याचा धर्म विचारून मग पोलिसांनी बंदूक रोखायची का? प्रयागराजचे बसपाचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पालची फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हत्या झाल्यावर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले.

उत्तर प्रदेश माफियामुक्त करणार, असे योगीबाबा सांगत आहेत आणि राज्यात खुलेआम हत्या व एन्काऊंटर चालू आहे, असा आक्रोश सपा, बसपाने सुरू केला. माफिया अतिक हा स्वत: जेलमध्ये असूनही बाहेर रस्त्यावर खुलेआम हत्या घडवत आहे, असे आरोप झाले. उमेश पालला संरक्षण म्हणून दिलेल्या बंदूकधारी पोलिसाचीही हत्या झाली, हे आणखी गंभीर. ‘बेकायदा बांधकामांवर बुलडोझर आणि गुन्हेगारमुक्त उत्तर प्रदेश’ अशा योगी सरकारच्या धोरणाचा गुन्हेगारी जगताने धसका घेतला आहे. माफियांना मातीत गाडून टाकू, असा निर्धार योगीबाबांनी जाहीर केल्यावर माफियांवर वेगाने कारवाई सुरू होताच धर्म व जातीचे कार्ड विरोधी पक्षांनी खेळायला सुरुवात केली.

उमेश पालच्या हत्येनंतर सरकारला दोष देणारे अतिक व अशरफच्या एन्काऊंटरनंतरही सरकारलाच दोष देत आहेत. एन्काऊंटरमध्ये ठार करून कायमचे संपवले जाणार असेल, तर न्यायालये, न्यायाधीश व संविधानाची गरजच काय, असा प्रश्न ओवेसींनी विचारला आहे. एन्काऊंटर म्हणजे न्याय नव्हे, अशी टीका योगी सरकारवर होत आहे. एन्काऊंटर बनावट आहेत, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. योगीजींनी उत्तर प्रदेशला एन्काऊंटर प्रदेश बनवला आहे, अशी टीका अखिलेश व ओवेसी करीत आहेत. उत्तर प्रदेशात चाळीस वर्षे अतिक अहमद व त्याच्या टोळीचा धुमाकूळ चालू होता. बंदुकीचा धाक दाखवून दहशत, हत्या, अपहरण, कोटी-कोटींची खंडणी, जमिनीचे हस्तांतर चालू होते, तेव्हा अखिलेश, मायावती आणि ओवेसी कुठे होते? राजू पालची हत्या झाली, तेव्हा हे नेते का मूग गिळून बसले होते? अतिकचे संबंध गँगस्टर अबू सालेम, पाकिस्तानची आयएसआय व लष्कर ए तोयबाशी होते, असे आता उघडकीस येत आहे. त्यासंबंधी इतके वर्षे कुणी ‘ब्र’ही काढला नाही?

पाच वेळा आमदार आणि एकदा खासदार झालेला अतिक हा राजकारणीतील गुन्हेकरणाचे ज्वलंत उदाहरण आहे. ज्याने शेकडो निरपराध लोकांचे बळी घेतले, त्यांची घरे-दारे उद्ध्वस्त केली, ज्यांच्या जमिनी व मालमत्ता बंदुकीचा धाक दाखवून हडप केल्या, त्या अतिकबद्दल कोणाला सहानुभूती वाटण्याचे मुळीच कारण नाही. उत्तर प्रदेशमधील प्रत्येक मतदारसंघ हा अतिक, अशरफ किंवा मुख्तार अन्सारी अशा माफियांनी वेढलेला आहे. वर्षानुवर्षे त्यांचे साम्राज्य होते. त्याला हादरा देण्याचे काम योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून सुरू केले आहे. अतिकला फाशी झालेली नाही, तर त्याची एन्काऊंटर हत्या झाली म्हणून सपा, बसपाला त्याच्याविषयी कळवळा येतो आहे.

या राजकीय पक्षांचे त्याच्याशी नेमके नाते काय? हे एसआयटीने शोधून काढावे. महिलांनासुद्धा दिवसा-ढवळ्या गोळ्या घालून ठार मारणाऱ्या या माफियाला सपा-बसपाने आमदार, खासदार करून प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. आमदार-खासदार असताना अतिकच्या मर्जीप्रमाणे स्थानिक जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक होत असे. सपाचे सरकार असताना अतिकची चलती होती. अतिकवरचे गुन्हे काढून घेण्याचाही प्रयत्न झाला. पण १०३ गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर शेवटपर्यंत कायम राहिले. अतिकची पत्नी शाइस्त परबीन ही उमेश पालची हत्या झाल्यापासून फरार आहे. अतिक गँगचा हस्तक गुड्डू मुस्लीम व अन्य दोन साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच लाखांचे इनाम लावले आहे. ‘माफिया को मिट्टी में मिला देंगे’ या मुख्यमंत्री योगीबाबांच्या घोषणेने अतिक-अशरफच्या एन्काऊंटरनंतर माफिया लॉबीला जबर हादरा बसला आहे.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -