Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेनेचा गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवण्याचा प्लान

शिवसेनेचा गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवण्याचा प्लान

मुंबई : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याची प्रचिती शनिवारी पुण्यात आली. शिवसैनिकांनी आज सकाळी पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करत याठिकाणी तोडफोड केली.

तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील काचा आणि इतर सामानाची नासधूस करण्यात आली. यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी या कृत्याचे समर्थन केले आहे. आता शिवसेना अशाचप्रकारे गद्दारांना ‘वेचून वेचून धडा शिकवणार’ असा इशाराही दानवे यांनी दिला.

शिवसैनिकांनी या आमदारांना रक्ताचे पाणी करून निवडून दिले होते. पण त्यांच्याशी कोणताही विचारविनिमय न करता अशा पद्धतीने आमदार पक्षाच्याविरोधात जात असतील, बंडखोरी करणार असतील तर शिवसैनिकांच्या भावना कोणीही दाबून ठेऊ शकत नाही. येणाऱ्या काळात शिवसैनिक हे आणखी आक्रमक होतील, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.

शिवसेना आमदार परत येतील, या आशेने चार दिवस शिवसैनिक संयम बाळगून होते. अंबादास दानवे यांनीही कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आज बंडाच्या पाचव्या दिवशी शिवसैनिक आक्रमक झाले आहे. अंबादास दानवे यांनीही ‘जशास तसं उत्तर देऊ’, अशा आशयाची फेसबुक पोस्ट काल टाकली होती. आता त्यांनी पुण्यातील शिवसैनिकांच्या कृत्याचे पूर्णपणे समर्थनही केले आहे. आमच्या पक्षप्रमुखाला दु:ख देता, मग तुम्हाला काय सुखात राहून देऊ का आम्ही? आता बंडखोरांना अशाच पद्धतीने उत्तर मिळेल, असेही दानवे यांनी म्हटले.

मात्र, अंबादास दानवे यांनी शिवसैनिक सर्वच बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक होणार नाहीत, असेही सांगितले. आम्ही निवडून-निवडून एकएकाला लक्ष्य करत आहोत. कोण पक्षात पुन्हा येऊ शकतं आणि कोण नाही, हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आता आम्ही वेचून वेचून बंडखोरांमधील गद्दारांना धडा शिकवायला सुरुवात केली आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तळ ठोकून असलेल्या एकनाथ शिंदे गटाने पुढील राजकीय वाटचालीसाठी आपले नाव निश्चित केले आहे. आता हा गट ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ या नावाने ओळखला जाईल. आमचा गट कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, असेही बंडखोर गटाकडून सांगण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या गोटात सध्या शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या गटाकडून आता ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला जाऊ शकतो. लवकरच एकनाथ शिंदे राज्यपालांना तसे पत्र देण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -