Monday, May 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा, ८२ टक्के जनतेचेही तेच मत

शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा, ८२ टक्के जनतेचेही तेच मत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात येत आहेत. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात, असा दावाच संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २ डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते.

याआधी राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडाचे समर्थन केले होते. तर, उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत गेल्यावरुन टीकाही केली होती. आता, राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ‘वर्षा’वर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकाने आणि आस्थापनावरील मराठी भाषेतील पाट्या, टोलनाके, धारावी झोपडपट्टी पुनर्विकास आदी मुद्यांसह सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, मनसेने स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसे असेल, याचा अभ्यास महायुतीकडून केला जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे. मात्र, संजय शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

”राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकारणातील मोठा बॉम्बस्फोट असेल. राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या काही चर्चा नाही. निवडणुकीत प्रत्येकाला प्रत्येकाची आवश्यकता भासते. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंद आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी शिवसेना-मनसे एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. ६ जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांत ते भेटी देऊन जाहीर सभा घेणार आहेत. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आणि उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -