Sunday, August 30, 2026

योग्यवेळी परतफेड

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे

आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या कारकिर्दीतील हा प्रसंग त्याचे उत्तम उदाहरण आहे.

आपण केलेल्या त्यागाचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळतेच. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते राकेश रोशन यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले होते. मात्र, त्यासाठी योग्य वेळी संयमाने वागणे आणि समोरच्या व्यक्तीला सहकार्य करणे अत्यंत आवश्यक असते. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रोशन (रोशन लाल नागरथ) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राकेश रोशन यांना दाक्षिणात्य चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी यांनी आपल्या ‘घर घर की कहानी’ या चित्रपटात नायकाची भूमिका करण्याची संधी दिली. या चित्रपटासाठी पार्श्वगायक किशोर कुमार यांनी गायिलेले “समा है सुहाना सुहाना, नशे में जहाँ है” हे गीत अतिशय लोकप्रिय झाले होते. या गीताचे बोल राकेश रोशन यांच्यासाठीच लिहिले गेले होते; मात्र, चित्रपटातील प्रसंगानुसार ते गीत अभिनेते जलाल आगा यांच्यावर चित्रित करण्यात आले. अशा प्रकारे इतक्या सुंदर गीतावर अभिनय करण्यापासून राकेश रोशन वंचित राहिले. मात्र, भविष्यात अन्य एखाद्या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायिलेल्या गीतावर अभिनय करण्याची संधी मिळेल, अशी आशा त्यांना होती. या चित्रपटानंतर राकेश यांना आणखी एक-दोन नवे चित्रपट मिळाले. त्यापैकी दिग्दर्शक वीरेंद्र सिन्हा यांचा ‘बुनियाद’ हा चित्रपट होता. या चित्रपटात राकेश यांच्याबरोबर अभिनेत्री योगिता बाली यांना घेण्यात आले होते. याशिवाय फरीदा जलाल, बिंदू, प्राण आणि शत्रुघ्न सिन्हा हे कलावंत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये होते. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी राकेश रोशन आणि योगिता बाली या जोडीसाठी “पुकारो मुझे पुकारो” हे युगुलगीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले होते. त्या गीताची चाल ऐकून राकेश रोशन सुखावले होते. आपल्या अभिनय कारकिर्दीला पुढे नेण्यात या गीताचा मोठा हातभार लागेल, असे त्यांना वाटले होते. पण सगळे आपल्या मनासारखेच घडते असे थोडेच आहे? त्या चित्रपटात त्यांचे सहकलावंत असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी ते गीत स्वतःवर चित्रित केले जावे, असा आग्रह धरला. राकेश रोशन यांच्या जागी अन्य कोणी अभिनेता असता, तर त्याने या मागणीला आक्षेप घेतला असता. किशोर कुमार यांनी गायिलेल्या गीतावर अभिनय करण्याची संधी त्याने दुसऱ्यांदा गमावली नसती. परंतु राकेश रोशन यांनी संयम बाळगला. ते स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, “हे गीत आपण आणि फरीदा जलाल यांच्यावरच चित्रित केले जाणार आहे.” राकेश रोशन यांनी दाखविलेल्या या सहकार्याची शत्रुघ्न सिन्हा यांनी मनापासून दखल घेतली. त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली. कालांतराने राकेश रोशन यांनी स्वतः चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची योजना आखली. जितेंद्र आणि रजनीकांत या कलावंतांना घेऊन एक चित्रपट निर्माण करण्याचा त्यांचा विचार होता. या दोन कलावंतांना घेऊन त्यांनी निर्माता म्हणून ‘भगवान दादा’ हा चित्रपट निर्माण केलेला होता. यानंतर राकेश रोशन यांनी रजनीकांत यांना दोन नायकांची एक कथा ऐकविली. त्यातील एक नायक उत्तर भारतातील, तर दुसरा दक्षिण भारतातील असतो. उत्तर भारतीय व्यक्तिरेखेसाठी जितेंद्र आणि दक्षिणात्य व्यक्तिरेखेसाठी रजनीकांत यांना घेण्याची योजना होती. मात्र, रजनीकांत यांनी विषय ऐकताच त्या चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला. त्यावेळी ते अशाच प्रकारच्या विषयावर आधारित ‘उत्तर दक्षिण’ या चित्रपटात अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासमवेत काम करीत होते. त्यामुळे त्यांना विषयाची पुनरावृत्ती नको होती. रजनीकांत यांचे म्हणणे राकेश रोशन यांनाही पटले. त्याच दिवसांत राकेश रोशन यांची शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी भेट झाली. राकेश यांच्या चित्रपटात भूमिका करण्यास रजनीकांत यांनी नकार दिल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांना समजले. तेव्हा त्यांनी राकेश यांना एक महत्त्वाची सूचना केली. चित्रपटाच्या कथेतील दक्षिणात्य व्यक्तिरेखा बदलून ती बिहारी व्यक्तिरेखा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, “या बदलामुळे तुमच्या चित्रपटाची कथा ‘उत्तर दक्षिण’ या चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळ्या स्वरूपात पडद्यावर येईल.” राकेश रोशन यांनी ही सूचना शिरसावंद्य मानली. पटकथेत त्याप्रमाणे बदल केला आणि ‘खुदगर्ज’ या चित्रपटाची कथा तयार झाली. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारचेच असल्याने ती भूमिका त्यांनाच देण्यात आली. शत्रुघ्न सिन्हा यांनीही या भूमिकेसाठी नाममात्र मानधन स्वीकारले आणि बिहारी बाबूची भूमिका उत्तम प्रकारे साकारली. अशा प्रकारे शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘बुनियाद’ या चित्रपटातील गीत स्वतःसाठी मागितले असताना राकेश रोशन यांनी केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवून योग्य वेळी त्याची परतफेड केली. ‘खुदगर्ज’ हा चित्रपट शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रभावी भूमिकेमुळे यशस्वी ठरला आणि राकेश रोशन एक दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले. त्यानंतर त्यांनी निर्माण आणि दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट यशस्वी आणि लोकप्रिय ठरले. नंतरच्या काळात त्यांनी आपला पुत्र हृतिक रोशन यालाही ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे एका मोठ्या अभिनेत्याच्या रूपात प्रस्थापित केले. राकेश रोशन यांच्या या प्रवासातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते - आपण केलेल्या सहकार्याची परतफेड नेहमी त्याच क्षणी होत नाही; मात्र, चांगुलपणाची आणि सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळ आल्यावर ते ऋण नक्की फेडतात. म्हणूनच आयुष्यात एखाद्याला मिळालेली संधी, केलेले सहकार्य किंवा दिलेला आधार कधीही विसरू नये. कारण माणसाने माणसासाठी केलेली छोटीशी मदतही भविष्यात मोठ्या रूपाने परत येऊ शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा