Tuesday, July 21, 2026

स्वप्ननगरीतील असुरक्षित प्रवास

स्वप्ननगरीतील असुरक्षित प्रवास

मुंबईची ओळख ही सुरक्षित, वेगवान आणि कधीही न थांबणाऱ्या शहराची आहे. मात्र बेस्ट बस अपघात आणि लोकलमधील वाढत्या हिंसक घटनांमुळे सुरक्षित प्रवासाचा नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर तातडीने उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि लाखो लोकांच्या रोजच्या जगण्याचा आधार आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी बेस्ट बस, लोकल, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून आपल्या कामावर जातात. एकेकाळी ‘मुंबई कधीच थांबत नाही’ आणि सुरक्षित शहर ही ओळख अभिमानाने सांगितली जात होती. मात्र अलीकडच्या काळात घडणाऱ्या घटना पाहता हा अभिमान आता भीतीमध्ये बदलू लागला आहे. घरातून सकाळी कामासाठी बाहेर पडणारा माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परत येईल का, हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाला सतावू लागला आहे. अलीकडेच मुंबईतील रस्त्यांवर बेस्ट बसचे अनेक गंभीर अपघात घडले. काही ठिकाणी निष्पाप पादचाऱ्यांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. बस ही सामान्य नागरिकांची सर्वात विश्वासार्ह वाहतूक सेवा मानली जाते. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार मोठ्या प्रमाणावर तिच्यावर अवलंबून असतात; परंतु त्याच बस जेव्हा अपघातांचे कारण बनू लागतात, तेव्हा नागरिकांचा विश्वास डळमळीत होणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेची परिस्थितीही चिंताजनक आहे. दररोज लाखो प्रवासी जीव धोक्यात घालून गर्दीतून प्रवास करतात. यामध्ये आता प्रवाशांमधील किरकोळ वादातून होणारे जीवघेणे हल्ले, धक्काबुक्की, मारहाण आणि चाकू हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत हिंसक स्वरूप धारण करतो आणि एखाद्याचा जीव जातो. ही परिस्थिती केवळ कायदा-सुव्यवस्थेची नव्हे, तर समाजाच्या मानसिकतेचाही प्रश्न निर्माण करते. प्रवास हा सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा विषय असतो. मात्र आज अनेक प्रवासी घराबाहेर पडताना मनात भीती घेऊनच निघतात. रस्ता ओलांडताना वेगाने येणाऱ्या बसची धास्ती, बसमध्ये बसल्यानंतर अपघाताची चिंता आणि लोकलमध्ये चढल्यानंतर गर्दीबरोबरच भांडण किंवा हल्ल्याची भीती हा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे. यासाठी केवळ चालक किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला दोष देऊन चालणार नाही.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अनेक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे लागेल. कंत्राटीकरण असल्याने नोकरीची शाश्वती नाही, चालकांवर असलेला कामाचा ताण, दीर्घ कामाचे तास, अपुरी विश्रांती, वाहनांची वेळेवर देखभालीचा अभाव, रस्त्यांवरील वाढती वाहतूक, नियमांचे उल्लंघन आणि काही ठिकाणी अपुरी पायाभूत सुविधा या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम अपघातांमध्ये दिसून येतो. प्रत्येक अपघातानंतर चौकशीची घोषणा होते; परंतु त्याचे निष्कर्ष आणि त्यानंतर झालेली सुधारणा चर्चेत येते ती दुसरा अपघात होईपर्यंत. लोकल रेल्वेतील हिंसाचाराच्या घटनांमुळे आणखी एक प्रश्न समोर येतो. गर्दी वाढत आहे, परंतु सुरक्षा व्यवस्था त्याच वेगाने मजबूत होताना दिसत नाही. प्रत्येक महत्त्वाच्या स्थानकावर आणि गाड्यांमध्ये प्रभावी सुरक्षा, अधिक गस्त, सीसीटीव्हीचे काटेकोर निरीक्षण आणि तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रवाशांनीही संयम आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे तितकेच आवश्यक आहे. मुंबईकर कर भरतात, तिकीट काढून प्रवास करतात आणि सार्वजनिक सेवांवर विश्वास ठेवतात. त्या बदल्यात त्यांना सुरक्षित प्रवास मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. अपघात झाल्यानंतर केवळ नुकसानभरपाई जाहीर करून किंवा चौकशी समिती नेमून जबाबदारी संपत नाही. नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पारदर्शक चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे.

प्रत्येक मोठ्या अपघातानंतर काही दिवस चर्चा होते, निवेदने दिली जातात आणि नंतर सर्व काही पूर्ववत होते. पण ज्या कुटुंबाचा आधारवड गमावला जातो. त्यांच्यासाठी ती घटना आयुष्यभराची जखम ठरते. या मानवी वेदनेची किंमत कोणत्याही आकडेवारीत मोजता येत नाही. त्यामुळे बेस्ट बस चालकांचे नियमित प्रशिक्षण, मानसिक आरोग्य आणि थकवा व्यवस्थापन, वाहनांची आधुनिक तांत्रिक तपासणी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुरक्षा प्रणाली, धोकादायक चौकांवर विशेष नियंत्रण, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि लोकल रेल्वेत अधिक सक्षम सुरक्षा व्यवस्था यावर तातडीने काम होणे आवश्यक आहे. प्रत्येक अपघाताचे स्वतंत्र विश्लेषण करून त्यातून शिकण्याची सवय प्रशासनाने लावली पाहिजे. आज प्रत्येक मुंबईकराच्या मनात एकच प्रश्न आहे सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परत येईल याची खात्री कोण देणार? हा प्रश्न केवळ भावनिक नाही, तर प्रशासन, वाहतूक यंत्रणा आणि समाज या तिघांसमोर उभे असलेले कठोर वास्तव आहे. या प्रश्नाचे उत्तर तातडीच्या आणि परिणामकारक कृतीतूनच मिळू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा