श्रीमती द्रौपदी मुर्मू-राष्ट्रपती
महाप्रभू जगन्नाथांची भजने गाताना मला खूपच आनंद व्हायचा. महाप्रभू आपल्या अत्यंत जवळ असल्याचे मला जाणवायचे. सध्या मी भजने गात नाही, पण रोज महाप्रभूंचे स्मरण करते आणि त्यांची भजने गुणगुणते. श्री जगन्नाथांना वंदन करणाऱ्या अनेक प्रार्थना आणि स्तोत्रे माझ्या बालपणापासूनच माझ्या स्मरणात आहेत. शाळा आणि महाविद्यालयात शिकत असताना महाप्रभू जगन्नाथांची भजने गाताना मला खूपच आनंद व्हायचा. महाप्रभू आपल्या अत्यंत जवळ असल्याचे मला जाणवायचे. सध्याच्या काळात मी भजने गात नाही, पण मी रोज महाप्रभूंचे स्मरण करते आणि त्यांची भजने गुणगुणते. मला नेहमीच माझ्या जवळ महाप्रभूंच्या अस्तित्वाची जाणीव होते. कठीण काळात ते मला आधार देतात. आजही, भक्त कवी मधुसूदन राव यांनी रचलेले गीत मी गुणगुणते, ज्याच्या ओळी आहेत: 'महाप्रभू रात्रंदिवस माझ्या सोबत आहेत; याच स्मरणाने, मी नेहमीच मनापासून त्यांची उपासना करेन'.ज्यावेळी मला आपल्या वास्तविक जीवनातील आजूबाजूच्या घडामोडींचे काही प्रमाणात आकलन होऊ लागले त्यावेळी मला महाप्रभू जगन्नाथांच्या महानतेची जाणीव झाली होती. घरी महाप्रभू जगन्नाथांबद्दल वारंवार चर्चा व्हायची. आमच्या गावातही अशा चर्चा अनेकदा होत असत. मी जेव्हा गावच्या शाळेत शिकत होते, तेव्हा भक्त सालबेग यांनी लिहिलेली 'आहे नील शैल' ही प्रार्थना नियमितपणे म्हटली जायची. आमचे शिक्षक आम्हाला महाप्रभू जगन्नाथांबद्दल खूप काही सांगायचे: पुरीमध्ये एक अवाढव्य मंदिर आहे आणि इतके भव्य मंदिर दुसरे कोणतेही नाही!
या मंदिरात महाप्रभू श्री जगन्नाथांची, त्यांची बहीण सुभद्रा आणि मोठे भाऊ बलभद्र यांच्यासोबत पूजा केली जाते. महाप्रभू जगन्नाथांचा रंग सावळा आणि डोळे गोल आहेत. सुभद्रेचा वर्ण पिवळा आहे आणि बलभद्र हे चांदण्यातील फुलासारखे पांढरे शुभ्र आहेत. एकदा तुम्ही या देवांचे दर्शन घेतले की, त्यांना कधीही विसरू शकत नाही. आमचे शिक्षक असेही सांगायचे की, जगन्नाथ हे 'महाप्रभू' आहेत, त्यांचा प्रसाद हा 'महाप्रसाद' आहे, त्यांचे मंदिर हे 'बडा देऊळ' म्हणजेच मोठे मंदिर आहे, त्यांचा मार्ग हा 'बडा दांडा' म्हणजेच विशाल पथ आहे आणि त्यांचा समुद्र हा 'महोदधी' म्हणजेच महासागर आहे. पुरुषोत्तम क्षेत्र, पुरी हे मयूरभंज जिल्ह्यातील माझ्या उपलबेडा या मूळ गावापासून खूप दूर होते. मला पुरीला जाण्याची संधी कशी मिळणार? मी मोठी झाल्यावर भुवनेश्वरला गेले आणि युनिट-२ गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेतला. मी तिथे वसतिगृहामध्ये राहू लागले. त्यानंतर मला पुरी, भुवनेश्वर आणि कोणार्कला भेट देण्याची संधी मिळाली. महाप्रभू जगन्नाथांच्या माझ्या पहिल्या दर्शनाची आठवण आजही माझ्या स्मरणात आहे, ही आठवण अगदी ताजी आहे. किती ते प्रभावी मंदिर, किती भव्य त्या मूर्ती! हे कधी तरी विसरता येणे शक्य आहे का?
महाप्रभू जगन्नाथांची रथयात्रा कोणी विसरू शकेल का? श्री-क्षेत्रामध्ये वर्षाच्या १२ महिन्यांत १३ सण साजरे केले जातात असे म्हटले जाते. पण रथयात्रेचे वैभव काही आगळेवेगळेच असते. महाप्रभूंच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मंदिरात गर्दी करतात. पण वर्षातून एकदा, महाप्रभू स्वतः मंदिरातून बाहेर पडतात आणि विशाल पथावरून आपल्या भक्तांना दर्शन देत गुंडीचा मंदिराकडे मार्गस्थ होतात. ३ भव्य रथांवर स्वार होऊन, चक्रराज सुदर्शनांसह तीनही देव गुंडीचा मंदिराला भेट देतात. ते तिथे ७ दिवस मुक्काम करतात आणि नंतर परततात. महाप्रभूंचा हा भव्य उत्सव अतुलनीय आहे.
माझ्या बालपणापासूनच मी महाप्रभू जगन्नाथांची भक्त आहे. ते नेहमीच माझे सर्वात पूजनीय दैवत राहिले आहेत. माझ्या आयुष्यातील चढ-उतार तेच नियंत्रित करतात. तेच माझ्या सुख-दुःखाचा मुख्य स्रोत आहेत. मी माझ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे आणि महाप्रभूंनी नेहमीच मला त्या सर्व संकटांतून बाहेर काढले आहे. शेवटी, मी त्यांचीच कन्या आहे. जेव्हा भारताच्या राष्ट्रपती पदासाठी माझ्या उमेदवारीची घोषणा झाली, तेव्हा मी आदरपूर्वक महाप्रभूंचे स्मरण केले. मी महाप्रभूंना प्रार्थना केली, 'तुम्ही मला इतक्या उत्तुंग उंचीवर घेऊन जात आहात. मी तुम्हाला विनवणी करते की, मला प्रत्येक पाऊल उचलताना मार्गदर्शन करा आणि नेहमी माझ्या पाठीशी राहा.' त्यांनी माझी प्रार्थना ऐकली. ते नेहमीच माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद देतात. जेव्हा मला राष्ट्रपती पदाची उमेदवार म्हणून दिल्लीत राहावे लागले, तेव्हाच रथयात्रा उत्सव साजरा होणार होता. त्यामुळे माझ्यासाठी पुरीला जाणे शक्य नव्हते. रथयात्रेच्या दिवशी अगदी पहाटे मी हौझ खास, दिल्ली येथील श्री जगन्नाथ मंदिरात गेले आणि महाप्रभूंचे दर्शन घेतले. माझे मन आनंदाने भरून आले. त्यांनी माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव केला. पूर्ण आत्मविश्वासाने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. मी अत्यंत उत्साहाने निवडणूक प्रचारात भाग घेतला. २५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यासाठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहाकडे जात असताना मी महाप्रभू जगन्नाथांची प्रार्थना करत होते. त्यांच्या आशीर्वादाने तो सोहळा अतिशय उत्तम प्रकारे पार पडला. राष्ट्रपती म्हणून माझ्या उद्घाटनाच्या भाषणावेळी, ते अगदी माझ्यासोबतच तिथे असल्यासारखे मला जाणवत होते. मात्र, महाप्रभूंच्या दर्शनासाठी पुरीला जाण्याची माझ्या मनाची ओढ कायम होती. दिवस पुढे सरकत होते, पण मला पुरीला जाता येत नव्हते. माझ्या मनात विचार आला; जोपर्यंत ते स्वतः परवानगी देत नाहीत, तोपर्यंत त्यांचे दर्शन कोणाला कसे मिळू शकेल! मी मनातल्या मनात त्यांची प्रार्थना केली, ‘महाप्रभू, माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा! पण कृपया मला पुरीला बोलवा, मला आपले दर्शन द्या.’ ते ‘भावाचे’ म्हणजेच भावनांचे महाप्रभू आहेत. त्यांना माझ्या भावना कशा समजणार नाहीत? लवकरच, पुरी दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला. ती तारीख होती १० नोव्हेंबर २०२२. पुरीत पोहोचल्यानंतर, गाड्यांचा ताफा श्री मंदिराकडे मार्गस्थ झाला. जसा गाड्यांचा ताफा पुरीच्या बडा दांडावर पोहोचला, तशी मला एक विलक्षण अनुभूती आली. बडा दांडा हा श्री जगन्नाथांचा आहे. येथे कोणत्याही राजशिष्टाचाराची गरज आहे का? पुरी हे सर्व तीर्थक्षेत्रांचा राजा म्हणजेच 'क्षेत्रराज' म्हणून प्रसिद्ध आहे. महाप्रभू हे देवांचे देव आहेत. कोणताही विचार न करता मी माझी गाडी थांबवायला सांगितली. माझी गाडी थांबताच पाठीमागून येणाऱ्या इतर सर्व गाड्याही थांबल्या. काय घडत आहे हे कोणाला समजण्यापूर्वीच, मी बडा दांडावरून अनवाणी चालण्यास सुरुवात केली होती. श्री मंदिर तिथून सुमारे २ किलोमीटर अंतरावर होते. मंदिराच्या नील-चक्रावर आणि शिखरावरील पवित्र पतित पावन ध्वजावर माझे डोळे केंद्रित करून मी पुढे पुढे चालत राहिले.
मी चालत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जमलेल्या लहान मुलांचे, महिलांचे, तरुणांचे आणि वृद्धांचेही अभिवादन करत होते. माझे संपूर्ण लक्ष महाप्रभूंवर केंद्रित होते. ज्या क्षणी मी मंदिराच्या सिंहद्वाराजवळ पोहोचले, त्या क्षणी मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. तोपर्यंत मी स्वतःला विसरून गेले होते. बडा दांडा या पवित्र मार्गाच्या धुळीमध्ये साष्टांग दंडवत घालत मी महाप्रभूंना माझे विनम्र प्रणाम अर्पण केले. त्यानंतर मी मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यात पोहोचून चारही देवांचे दर्शन घेतल्यावर मी एका दिव्य आनंदाने भारावून गेले. महाप्रभू हे विश्वाचे रक्षक आहेत. ज्यांना सर्वांनी नाकारले आहे, त्यांचे ते तारणहार आहेत. संपूर्ण जगातील लोकांचे दुःख दूर करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. म्हणूनच त्यांच्या गोल डोळ्यांच्या पापण्या कधीही मिटत नाहीत. त्यांच्यासाठी उच्च आणि नीच असा कोणताही भेद नाही. त्यांच्या नजरेत सर्व समान आहेत आणि सर्वांची समानता हाच त्यांचा मंत्र आहे. त्यांच्या करुणेचा आशीर्वाद मिळाल्यामुळे, मी स्वतःला समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्या गोल डोळ्यांच्या महाप्रभू जगन्नाथांकडे पाहत मी आदराने हात जोडले आणि प्रार्थना केली, ‘हे महाबाहू! लोकांच्या सेवेप्रती असलेल्या माझ्या समर्पणाच्या भावनेला तुमचे आशीर्वाद सदैव बळ देवोत! हे कृपानिधी, आमच्या देशाचे आणि संपूर्ण जगाचे तुमच्या कृपेने रक्षण करा.’ असे म्हणताना मी स्वतः भक्तिभावात तल्लीन झाले.






