आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. जवळपास एक तास या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर, आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दरबारी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
- संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मंत्री नितेश राणेंकडून समाचार मुंबई : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुख्यमंत्री ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असे जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. इस्लामपूर (ईश्वरपूर) नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा विषय हा नगरविकास खात्याच्या अखत्यारित येतो. हे खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने पाटील यांनी त्यांना दूरध्वनी केला होता; मात्र शिंदे हे त्यावेळी दिल्ली दौऱ्यावर असल्याने ही भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आजची ही भेट प्रामुख्याने याच विषयावर चर्चा करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जनतेने बहाल केलेल्या महात्मा या सर्वोच्च पदवीचा ऐतिहासिक सन्मान ...
नगराध्यक्ष अपात्रतेच्या या प्रशासकीय विषयात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून एकटे जयंत पाटील येणे अपेक्षित असताना, त्यांच्यासोबत पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित राहिल्याने या बैठकीचे गांभीर्य अधिक वाढले आहे. हा स्थानिक नगरपालिकेचा विषय आहे की याव्यतिरिक्त राज्यातील आगामी निवडणुका किंवा इतर काही गुप्त राजकीय समीकरणांवर या बैठकीत पडद्यामागे चर्चा झाली, याविषयी राजकीय वर्तुळात तर्क लढवले जात आहेत.
मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी ...
मंगळवारच्या 'वर्षा'वरील बैठकीचा संदर्भ
१४ जुलैच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर महायुतीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी एकत्र गुप्त बैठक घेतल्याच्या चर्चा रंगवल्या जात होत्या. त्यावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडत, "माझा आणि तटकरे-पटेल यांच्या भेटीचा काडीचाही संबंध नाही. आम्ही सर्व जण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी पूर्णपणे एकसंघ आहोत," असे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांनी केवळ ५ ते १० मिनिटे वेळ देऊन माझे गाऱ्हाणे ऐकले आणि लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्या भेटीनंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या या दीर्घ बैठकीमुळे विरोधी छावणीतील नेत्यांच्या सत्ताधाऱ्यांसोबतच्या या भेटीगाठी सध्या राजकीय वर्तुळात कळीच्या ठरत आहेत.






