Monday, July 13, 2026

Jalgaon News : भरघोस नफ्याचे आमिष अन् ९.३५ लाखांचा गंडा; जळगावातील व्यावसायिकाची सायबर फसवणूक

Jalgaon News : भरघोस नफ्याचे आमिष अन् ९.३५ लाखांचा गंडा; जळगावातील व्यावसायिकाची सायबर फसवणूक

Jalgaon News : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीमध्ये (Cyber crime) मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील व्यापारी असाच सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकला अन त्याला लाखो रुपयांचा गंडा बसला आहे. स्टॉक मार्केट (stock market) आणि आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगावातील व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे.

व्यावसायिकाची तब्बल ९ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या घडलेल्या प्रकाराने पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारीचा वाढता धोखा अधोरेखित झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारे ४२ वर्षीय व्यावसायिक गोपाल टिकमदास पोपटानी (Gopal Tikmadas Poptani) यांना ३ जून रोजी व्हॉट्सअॅपवर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचा संदेश आला. त्यानंतर एका लिंकद्वारे अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. भामट्यांनी सुरुवातीला विविध माहिती मागितली आणि विश्वास संपादन केल्यानंतर पोपटानी (Gopal Tikmadas Poptani) यांनी २४ जून रोजी १ लाख २५ हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली. अॅपमध्ये ८० हजार रुपयांचा नफा दिसत असल्याने त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ९ लाख ३५ हजार रुपये गुंतवले.

सायबर पोलिसांकडे तक्रार

मात्र, अॅपमधून १० लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर रक्कम खात्यात जमा झाली नाही. याबाबत विचारणा केली असता, आयपीओ मिळाला असून पैसे काढण्यासाठी आणखी ३२ लाख ९५ हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोपटानी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >