Thursday, July 9, 2026

विचारांचे सामर्थ्य

विचारांचे सामर्थ्य
जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै  

तुम्ही कुठेही जा तुमच्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १. विचार २. जीभ ३. प्राण. विचारांचा संबंध मनाशी येतो, जिभेचा संबंध उच्चारांशी येतो. प्राणाचा संबंध आचारांशी येतो. आपण सध्या विचार पाहूया. हा विचार डोळ्यांना दिसत नाही. डोळ्यांना दिसला नाही तरी तो आपल्या अनुभवाला येतोच. म्हणून मी नेहमी सांगतो. जे डोळ्यांना दिसत नाही ते सर्वात महत्त्वाचे असते. अदृश्य जगत !!

विचार जगत् व दृश्य जगत् असे जगाचे दोन प्रकार आहेत आणि दृश्य जगतापेक्षा विचार जगत् हे जास्त प्रभावी आहे. कारण दृश्य जगत हे विचार जगतातूनच निर्माण होते. अभियंते घर बांधतात तेव्हा ते पहिला विचार करतात, नंतर नकाशा काढतात व नंतर घर बांधतात. तसे विचार हे आपल्याला दिसले नाही तरी फार सामर्थ्यवान आहेत. गुरुत्वाकर्षण शक्ती ही डोळ्यांना दिसली नाही तरी ती अत्यंत शक्तिशाली आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती जर नाही तर सगळे जग अक्षरशः कोलमडेल, अधांतरी होईल. हवा नसेल तर साऱ्या जगाची व्यवस्था ढासळेल. तसा देव हा ही डोळ्यांना दिसत नाही, तो दिसणार नाही. तो कुणाला दिसत नाही कारण तो दिसायचा विषय नाही. पण तो सर्वांत आहे. कारण त्याच्याकडून हे सर्व निर्माण आहे, होते आहे. "मी मज व्यालो " म्हणून देव डोळ्यांना दिसत नाही म्हणजे तो नाही म्हणू नका. तो आहे, पण तुम्ही समजता तसा तो प्रत्यक्षात नाही. एक नामधारक मला म्हणाले, तुमचे प्रवचन ऐकेपर्यंत माझी अशी समजूत होती की देव माझ्या समोर येऊन उभा राहील व "वरं बृही" असे म्हणेल. म्हणून त्याने खूप तीर्थ यात्रा केल्या, व्रतवैकल्य केली. मात्र आता त्याला योग्य ते ज्ञान मिळाले. सांगायचा मुद्दा, देव डोळ्यांना दिसत नाही पण जे दिसत नाही ते जे दिसते त्यापेक्षाही प्रबळ असते. म्हणून विचार हा किती सामर्थ्यशाली असेल? तुमचे जीवन जे चाललेले आहे ते विचारांवर चाललेले आहे. हा विचारांचा प्रवाह सतत चालू असतो. विचारांचा प्रवाह म्हणजे जाणिवेचा प्रवाह सतत चाललेला असतो. जसा सूर्याकडून प्रकाशाचा प्रवाह सतत चाललेला असतो तो कधी बंद झालेला आहे का? तो कधीही बंद झालेला नाही. हा प्रवाह सतत चाललेला आहे. तो सूर्य आहे तसा आपल्या ठिकाणी आत्मसूर्य आहे. ह्या आत्मसूर्याकडून विचारांचा प्रवाह सतत चाललेला आहे. म्हणून विचारांचा हा प्रवाह महत्त्वाचा आहे. कारण विचार आपल्या जीवनाला आकार देतात. ह्या विचारांचे महत्त्व किती आहे. ज्याप्रमाणे पाणी ज्या नळीतून वाहते तिचा आकार धारण करते, त्याचप्रमाणे तुमच्या विचारांच्या स्वरूपानुसार जीवनशक्ती तुमच्यामधून प्रवाहित होते.किती सुंदर सांगितलेले आहे. जीवनशक्ती ज्याला म्हणतात ती आकार घेते कशाप्रकारे? विचारांप्रमाणे! नळीतून पाणी वाहते व त्या नळीप्रमाणे आकार घेते. नळातून पाणी वाहते ते नळाप्रमाणे आकार घेते. मध्यम आकाराची नळी असेल तर पाण्याला त्याप्रमाणे आकार प्राप्त होतो. ज्या पाईपमधून ते पाणी वाहते त्या पाईपप्रमाणे ते पाणी आकार घेते. त्याप्रमाणे आपले विचार हे पाईप आहेत. ह्याच्या आकाराप्रमाणे ते Life Principal आकार घेते म्हणून विचार करताना विचार करा. विचार जीवनाला आकार देतात. जशी मनस्थिती तशी परिस्थिती. म्हणून विचारांच्या ठिकाणी सावध ! किती सावध? मनांत एकही अनिष्ट विचार येऊ द्यायचा नाही ! आता अनिष्ट विचार येऊ द्यायचा की इष्ट विचार येऊ द्यायचा हे तू ठरव म्हणून "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा