Thursday, July 9, 2026

नेटीझन्सकडून उथळपणाचा कळस

नेटीझन्सकडून उथळपणाचा कळस

नाशिक जिल्ह्यावर ओढवू शकणारे संभाव्य ढगफुटीचे संकट टळल्याने मोठ्या अनर्थापासून संपूर्ण जिल्ह्याचा बचाव झाला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. संभाव्य संकटाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य नियोजन आणि समन्वय साधत आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. मात्र, या गंभीर परिस्थितीत समाजमाध्यमांवर काही नेटीझन्सनी केलेल्या उथळ प्रतिक्रिया, विनोद आणि मीम्समुळे अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत ढगफुटीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले. सुदैवाने प्रत्यक्ष ढगफुटी झाली नाही; मात्र ज्या भागांसाठी इशारा देण्यात आला होता, त्या भागांत मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली, जनजीवनावर परिणाम झाला आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. जर प्रत्यक्ष ढगफुटी झाली असती, तर त्याचे परिणाम किती भीषण झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपही रंगले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या आंदोलनाकडून लक्ष विचलित करण्यासाठी ढगफुटीचा बनाव करण्यात आल्याचा आरोप राज्य सरकारवर केला. त्यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही त्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले. मात्र, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ढगफुटीचा इशारा हा भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाच्या आधारे देण्यात आला होता. संभाव्य नैसर्गिक संकटाच्या काळात राजकीय वादांपेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अधिक आवश्यक असते.

दुर्दैवाची बाब म्हणजे काही समाजमाध्यम वापरकर्त्यांनी हवामानाचा इशारा, ज्योतिषीय अंदाज आणि विविध अफवांच्या आधारे मीम्स, विनोद आणि हलक्या-फुलक्या प्रतिक्रिया प्रसारित केल्या. नैसर्गिक आपत्तीची शक्यता असताना अशा प्रकारचे वर्तन समाजातील संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारे आहे. संकटाच्या प्रसंगी अफवा, खिल्ली किंवा लोकप्रियतेसाठी केलेले विनोद यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणूनच समाजमाध्यमे ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जबाबदारीचे व्यासपीठ असल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

निसर्गाच्या कोपापुढे कोणतीही यंत्रणा सर्वशक्तिमान नसते. सरकार, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आपले काम करत असतात; परंतु त्याचबरोबर प्रत्येक नागरिकानेही स्वयंशिस्त, जबाबदारी आणि अधिकृत सूचनांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा वेळी अफवा पसरविण्याऐवजी, प्रशासनाच्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि गरजूंची मदत करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी ठरते. दरम्यान, घाटमाथ्यासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. रस्ते पाण्याखाली गेले, काही पर्यायी पूल वाहून गेले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सातवीपर्यंतच्या शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच घाट परिसर, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स आणि पूरप्रवण पर्यटनस्थळे १३ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी (दि. ८) दिवसभरात २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती; मात्र रात्री पावसाचा जोर वाढत जिल्ह्यात ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अशा प्रकारे मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण १२० मिलिमीटर पाऊस झाला. परिणामी अनेक भागांत पाणी साचले, वाहतुकीचा वेग मंदावला आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. शहरातील तिडके कॉलनी, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, पवननगर, त्रिमूर्ती चौक यांसह अनेक भाग जलमय झाले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची अक्षरशः तारेवरची कसरत झाली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रयागतीर्थ–तळवाडे मार्ग पाण्याखाली गेला, तर पहिणे–भिलमाळ मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेला. कसारा आणि कवेली घाटात दरडी कोसळल्या, तर कोटंबी घाटातील संरक्षण भिंत खचली. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव-सदो आणि उभाडे येथे घरांच्या भिंती कोसळल्या. अस्वली–जानोरी पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला. कळवण तालुक्यात चार घरांची पडझड झाली, तर चार विहिरींचे नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातील भावडबारी घाटही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.संकटाच्या या काळात अनेक जबाबदार नागरिकांनी समाजमाध्यमांवरून अधिकृत सूचना, हवामानाचे अपडेट्स आणि खबरदारीचे संदेश प्रसारित करून सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण घालून दिले. अशा सकारात्मक वापराचीच आज समाजाला गरज आहे. नैसर्गिक आपत्ती ही कुणाच्याही राजकारणाची, प्रसिद्धीची किंवा करमणुकीची संधी नसते; ती संवेदनशीलता, संयम आणि सामाजिक जबाबदारीची खरी परीक्षा असते.भविष्यात अशा गंभीर परिस्थितीत समाजमाध्यमांवर अधिक परिपक्व, जबाबदार आणि संवेदनशील भूमिका दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करावी लागेल. कारण संकटाच्या काळात केवळ प्रशासनच नव्हे, तर समाजाची सामूहिक मानसिकता आणि जबाबदार नागरिकत्वही तितकेच महत्त्वाचे असते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा