Saturday, July 4, 2026

कृष्णाईची निर्भीड लेक

कृष्णाईची निर्भीड लेक

राजरंग-राज चिंचणकर

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल 

 

कृष्णाईच्या लेकी' या झी मराठी वाहिनीवरील दमदार, तडफदार, निर्भीड लेक म्हणून गौरीला प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे ट्विंकल यादव होय. ट्विंकल यादव मूळची मुंबईची. तिचे शालेय शिक्षण आय. ई.एस. राजा शिवाजी विद्यालयातून झाले. तिचे पुढील कॉलेजचे शिक्षण गुरुनानक खालसा कॉलेजमधून झाले. शाळेत व कॉलेजमध्ये असताना तिने नृत्यात व समूहगायनामध्ये भाग घेतला होता. नाटकामध्ये मात्र तिने भाग घेतला नव्हता. पुढे अभिनयात करिअर करण्याचे देखील काही तिने निश्चित ठरविले नव्हते. चित्रकला, हस्तकला यामध्ये तिचा सहभाग असायचा. तिने लावणी देखील सादर केली होती. तिला गाणे आवडायचे. समूह गायनामध्ये देखील तिने भाग घेतला होता.

तिची आई नेहमी तिला सांगत असे की, तू अभिनयासाठी प्रयत्न कर. 'कृष्णाईच्या लेकी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेच्या ऑडिशनच्या दोन दिवस अगोदर तिने ठरविले की, मालिकेच्या ऑडिशनसाठी प्रयत्न करून पाहू या. त्यानंतर तिने प्रयत्न केला, त्यावेळी ती सांगलीला एका गावात होती, तेथूनच तिने व्हिडीओद्वारे ऑडिशन दिली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला ऑडिशनसाठी मुंबईला बोलावण्यात आले आणि तिची निवड ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेसाठी झाली. पुढील अठरा दिवसांत या मालिकेचे शूटिंग देखील सुरू झाले.

या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील असे विचारल्यावर ती म्हणाली, की या मालिकेमध्ये माझ्या व्यक्तिरेखेचे नाव गौरी आहे. तिच्याकडे आत्मविश्वास असतो. तिला मोठेपणी कलेक्टर व्हायचे असते. आईने त्या तिघींना वाढविण्यासाठी भरपूर कष्ट केलेले आहेत, याची जाणीव तिला आहे. आईच्या डोक्यावरील कष्टाचा हा भार तिला कमी करायचा आहे, त्यासाठी तिला कलेक्टर व्हायचं आहे. तिला आईबद्दल प्रचंड प्रेम आहे, आईसाठी ती काहीही करण्यास तयार असते. तितकाच द्वेष तिला वडिलांबद्दल आहे. कारण तीन मुली झाल्यानंतर वडील आईला सोडून जातात. आईला व तीन मुलींना रस्त्यावर सोडतात. ती तिच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.

या मालिकेच्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता ती म्हणाली, की या मालिकेचे दिग्दर्शक अनिकेत साने सरांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर आहे. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. सेटवरचं वातावरण सकाळपासून शेवटच्या सीनपर्यंत खूप पॉझिटिव्ह, शांत आणि शिस्तबद्ध असतं. कोणताही गोंधळ न करता प्रत्येक जण खूप मन लावून काम करतो, ही गोष्ट मला खूप आवडते. नवीन कलाकारांसाठी ही खूप मोठी गोष्ट असते आणि माझ्या पहिल्याच मालिकेचे दिग्दर्शक अनिकेत सर आहेत, ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. ते प्रत्येक गोष्ट खूप संयमाने आणि प्रेमाने समजावून सांगतात. एखादी गोष्ट पहिल्यांदा जमली नाही तरी ते कधीच ओरडत नाहीत, उलट शांतपणे मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळतं.

या मालिकेला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय असे विचारल्यावर ती म्हणाली, की या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत प्रत्येक कॅरेक्टर खूप सुंदर पद्धतीने साकारण्यात आलं आहे आणि प्रत्येक पात्राची एक वेगळी खासियत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडून घेता येतंय. मालिका भावनिक तर आहेच, पण त्याचसोबत ती प्रेक्षकांना हसवतेसुद्धा. वेगवेगळ्या भावनांचा सुंदर मिलाफ असल्यामुळे ही मालिका लोकांना खूप आवडतेय.

निवेदिता ताई सोबत काम करताना कोणता अनुभव आला असे विचारल्यावर ट्विंकल म्हणाली की, या क्षेत्रात ऑफकोर्स निवेदिता ताई माझ्या आदर्श आहेत. कारण इतकी वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केलं आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी खूप भाग्यवान आहे की, माझी पहिलीच सिरीयल त्यांच्यासोबत आहे. मी ठाण्यात एकटी राहते, आई माझ्यासोबत नसते. पण सेटवर आम्ही दिवसभर एकत्र असतो आणि तिथे मला निवेदिता ताईंमध्ये एक आईसारखी माया आणि एक गुरूसारखं मार्गदर्शन मिळतं. माझ्यासाठी ही खूप सुंदर आणि खास गोष्ट आहे.'कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका तिच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट आहे. या प्रवासाचा भाग होण्याची संधी मिळाली यासाठी ती स्वतःला खूप लकी आणि कृतज्ञ मानते. आई व मुलींच्या नात्यातील ऋणानुबंध सुंदररीत्या या मालिकेमध्ये गुंफण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा