Thursday, June 25, 2026

Aarey Hospital : आरे रुग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर

Aarey Hospital : आरे रुग्णालय ताब्यात  घेण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर

- सुधार समितीने प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवला

- अपूर्ण असल्याने परीपूर्ण माहितीसाठीसह प्रस्ताव आणण्याची केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी )

आरे कॉलनीतील रुग्णालयाची (Aarey Hospital) इमारत ताब्यात घेण्याच्या प्रस्ताव सुधार समितीने फेर विचारासाठी प्रशासनाकडे पाठवून दिला. आरे प्रशासनाने जैसे थे परिस्थितीत या रुग्णालय इमारतीची जागा महापालिकेला 30 वर्षांकरिता भाडेतत्त्वावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही इमारत खंडर असून यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे. या खर्चात नवीन रुग्णालय बांधले जाईल या भूमिकेमुळे प्रशासनाने याबाबत सर्व बाबींचा विचार करत परत प्रस्ताव आणावा असे कारण देत हा प्रस्ताव प्रशासनाकडे सुधार समितीने फेरविचारासाठी पाठवून दिला.

गोरेगाव आरे दुग्ध वसाहतीच्या हद्दीत आरे न.भू.क्र. ३८, आरे रुग्णालयाची इमारत आहे. या इमारतीची एकूण क्षेत्रफळ हे १२५७.९० चौ.मीटर एवढे आहे. यात संलग्न शासकीय निवासस्थानांचे क्षेत्र ६७४.३० चौ.मीटर असे एकूण क्षेत्रफळ १९३२.२० चौ. मीटर एवढे क्षेत्र "जसे आहे तशा स्थितीस" घेण्यात येणार आहे. याबाबत आरे दुग्ध आणि महापालिका करार करून राज्य शासनाकडून ही जमिन ताब्यात घेण्यासाठी आता सुधार समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. (Aarey Hospital)

या रुग्णालयाची (Aarey Hospital) जागा ही "जसे आहे तशा स्थितीस" मुंबई महानगरपालिकेकडे ३० वर्ष कालावधीसाठी हस्तांतरीत करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार ही वास्तू महापालिकेला आरोग्य सुविधेसाठी उपलब्ध होत आहे,असे नमूद केले होते. याबाबतचा प्रस्ताव आला असता जितेंद्र वळवी यांनी विभागातील आदिवासी जनतेला वैद्यकीय उपचार मिळावा यासाठी या रुग्णालयाची इमारत ताब्यात घेऊन महापालिकेच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जावी अशी मागणी केली. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी, उबाठाचे सचिन पडवळ आदींनी हा प्रस्ताव मंजूर करुन याठिकाणी महापालिकेच्या वतीने आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली. तर कॉँग्रेसच्या मेहेर हैदर यांनी हे रुग्णालय ३० वर्षांकरता भाडेतत्वावर दिले जाणार असून यावर आपण खर्च करायचा आणि नंतर आरे ने ही जागा पुन्हा ताब्यात घेतली तर यावरील सर्व खर्च जाणार आहे अशी भूमिका मांडली. (Aarey Hospital)

त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या वतीने हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला जावा अशी मागणी केली. भाजपाचे संदीप पटेल आणि इतर सदस्यांनी ही मागणी केली. ही वास्तू जुनी असून यावर खर्च करायचा झाल्यास त्या खर्चात नवीन वस्तू उभी राहिल, असे सदस्यांनी मत व्यक्त केली . त्यामुळे प्रस्तावात सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात यावे अशी सूचना करत हा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष संध्या दोषी यांनी फेरविचारासाठी पाठवण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्व माहितीसह हा प्रस्ताव पुन्हा समिती पुढे प्रशासन आणल्यावर समितीच्या शंकाचे निरसन होऊन निरसन होते का हे पाहायचे आहे. (Aarey Hospital)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा