Friday, May 29, 2026

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

मुंबई : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे तसेच धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणींच्या निराकरणासह राज्य सरकारला आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्यस्तरीय 'टास्क फोर्स' गठीत करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना विविध शैक्षणिक, प्रशासकीय व तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणींबाबत एकसमान धोरणात्मक मार्गदर्शनाची गरज निर्माण झाल्याने टास्क फोर्स तयार करण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांगध्ये नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी नियोजित वेळेत होत आहे का, याचा नियमित आढावा घेणे, चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमामधील चौथ्या वर्षाच्या पात्रता, प्रवेश प्रक्रिया, प्रवेश शुल्क इ. संदर्भात मार्गदर्शक तत्वे तयार करणे, पी. एच. डी. प्रवेशाबाबत नियम ठरविणे, राज्यभर 'एकसमान शैक्षणिक कॅलेंडर लागू करण्यासाठी पाठपुरावा करणे, अभ्यासक्रम अंमलबजावणीत विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी 'मदत कक्ष' किवा अन्य यंत्रणा उभी करणे आदी विषयांवर समिती काम करेल. ही समिती दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणार आहे. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >