Friday, May 29, 2026

चार राज्यांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

चार राज्यांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

पंजाबवरही विशेष लक्ष नवी दिल्ली  : भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह चार राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करत संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी वीरेंद्र सचदेवा यांची जागा घेतली आहे. हरियाणामध्ये अर्चना गुप्ता यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल ४३ वर्षांनंतर हरियाणात एखाद्या महिलेची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अर्चना गुप्ता या व्यवसायाने डॉक्टर आहेत.

पंजाबमध्ये सरदार केवल सिंह ढिल्लों यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढिल्लों हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजप संघटना मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. या बदलांमधून भाजप आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये शीख नेतृत्वाला संधी देत भाजपने राज्यातील राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रीत केल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे

Comments
Add Comment