Thursday, May 28, 2026

भाजपची पडद्याआडून ‘बविआ’शी चर्चा

भाजपची पडद्याआडून ‘बविआ’शी चर्चा

ठाणे जिंकण्यासाठी घडामोडींना वेग; हितेंद्र ठाकुरांच्या ७१ नगरसेवकांचा ‘भाव’ वाढला मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण रंगात आले आहे. ठाण्याची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्याबाबत महायुतीत अनुकूलता असल्याचे संकेत मिळत असतानाच, आता भाजपने ही जागा स्वतःकडे खेचण्यासाठी पडद्याआड वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या या ‘प्रेशर टॅक्टिक्स’मुळे वसई-विरारमध्ये मजबूत पकड असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) ७१ नगरसेवकांचा ‘भाव’ चांगलाच वधारला आहे.

संख्याबळाचा विचार करता ठाणे विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. असे असतानाही, ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने आणि त्यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक हे या जागेचे प्रतिनिधित्व करत असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. या जागेसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी रवींद्र फाटक यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘बविआ’चे सर्वेसर्वा भाई ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फाटक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.परंतु, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता या जागेसाठी कमालीचा आग्रह धरला आहे. "जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी हीच योग्य वेळ आहे. एवढे नगरसेवक असूनही आता आमदार निवडून आणला नाही, तर कधी आणणार?" असा सूर भाजपमधून उमटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी ‘बविआ’चे माजी महापौर राजीव पाटील यांची गुप्त भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या भेटीत भाजपने ‘बविआ’कडे विधानपरिषद निवडणुकीत सहकार्याची विनंती केल्याचे समजते.

संख्याबळाचे गणित काय? गेल्या काही वर्षांत भाजपने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपली ताकद लक्षणीयरित्या वाढवली आहे. सध्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे तब्बल ४४४ मतदारांचे (नगरसेवक व लोकप्रतिनिधी) संख्याबळ आहे, तर शिवसेनेकडे ३४६ मते आहेत. त्यामुळे स्वबळावरही भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. परंतु, ‘बविआ’ची ७१ मते निर्णायक ठरणार आहेत. जर ही ७१ मते शिवसेनेच्या बाजूने वळाली आणि त्यांनी इतर छोट्या घटकांची जुळवाजुळव केली, तर शिवसेना भाजपला कडवे आव्हान देऊ शकते. त्यामुळेच सध्या ठाण्याच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी ‘बविआ’ केंद्रस्थानी आली असून, हितेंद्र ठाकूर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >