आयपीएल रणसंग्राम - सुशील परब
इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना १७ मे रोजी नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जात आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत ५ व्या स्थानावर (११ सामन्यांत १२ गुण ) दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत ७ व्या स्थानावर (१२ सामन्यांत १० गुण) या दोन्ही संघांमध्ये याआधी १ मे २०२६ रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात दिल्लीने २२६ धावांचा यशस्वी पाठलाग करून त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला होता. आयपीएल २०२६ मध्ये केएल राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने १० डावांमध्ये ४९.४ च्या सरासरीने आणि १८१ च्या स्ट्राइक रेटने ४४५ धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. मात्र, डीसीसाठी समस्या ही आहे की त्यांचे इतर फलंदाज फॉर्म आणि सातत्य राखण्यासाठी झगडत आहेत. डीसीला निश्चितच त्याचा हा फॉर्म कायम राहावा असे वाटेल, पण इतर फलंदाजांनाही आपला फॉर्म परत मिळवावा लागेल. डेविड मिलर, स्ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, समीर रिझवी, साहिल पारेख यांनाही फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. मिचेल स्टार्क, माधव तिवारी, आकीब नबी, अक्षर पटेल असे गोलंदाज आहेत. अक्षर पटेल भारतीय संघातील गोलंदाज असून या हंगामात त्यांची कामगिरी चांगली राहिली नाही. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी चांगली होत आहे. वैभव सूर्यवंशी व यशस्वी जयस्वाल ही आघाडीची जोडी फॉर्मात आहे. वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष असेल. यशस्वी जयस्वाल, रियान पराग, धृव ज्युरेल, शिमरॉन हेटमायर, डोनावन फरेरा, शुभम दुबे, रवींद्र जडेजा यांच्यावर फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजी जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा, यशराज पंजा, रवींद्र जडेजा अशी गोलंदाजांची फळी आहे. जी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना रोखू शकते. पाहू या राजस्थान रॉयल्स पहिल्या पराभवाचा बदला घेते, की दिल्ली कॅपिटल्स बाजी मारते.