मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी
मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून या नालेसफाईच्या कामांवर आता महायुतीच्यावतीने महापौर आणि उपमहापौरांच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे. आता या नालेसफाईच्या कामांवर भाजपच्यावतीने विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष तसेच उपनगराचे पालकमंत्री यांच्यासमवेत पाहणीच्या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. आता प्रशासनासोबत नियोजित दौरे केले जाणार असले तर भविष्यात अचानकपणे पाहणी केली जाईल,असे महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील नालेसफाईच्या कामांची भाजपच्या मुंबई अध्यक्षांसमवेत पाहणी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, उपनगराचे पालकमंत्री ऍड आशिष शेलार, सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच सहायक आयुक्त आणि नगरसेवक हे शुक्रवारी सकाळी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मंगळवारपासून या नालेसफाईच्या पाहणीला अधिक व्यापकपणे सुरुवात केली जाणार आहे. स्थानिक नगरसेवक तसेच समिती अध्यक्ष हे आपल्या स्तरावर पाहणी करणारच आहे. परंतु आजवर नालेसफाईच्या कामांची आकडेवारी वाढवून फुगवून सांगितली जात होती, परंतु आता खरा आकडा आम्ही नालेसफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर जनतेसमोर आणू,असे सांगितले. तसेच नालेसफाईच्या कामांमध्ये एक मोठे रॅकेट काम करत असून विद्यमान जे नवीन कंत्राटदार आल्या आहेत, त्यांना गाळ टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड मिळू नये यासाठीही प्रयत्न केला गेला होता,असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौरांच्या दौऱ्यावर उपमहापौर नाराज, म्हणतात मला विचारातच नाही! : गेल्या दोन दिवसांत महापौरांनी नालेसफाईचे दौरे केले. मित्रपक्ष म्हणून आम्हाला, पक्षाला किंवा स्थानिक नगरसेवकांना याबाबत माहिती देण्यात आली नाही, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. उपनगरातील दौऱ्यासाठीदेखील निमंत्रण देण्यात आले नाही. उद्याच्या दौऱ्यासाठीही महापौरांकडून कोणतीही माहिती किंवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. निमंत्रणाबाबत मी कुठेही जात नाही असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान,मुंबईत पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाई कामांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी सफेद पूल नाका तसेच मिठी नदी परिसरातील गाळ काढणे आणि साफसफाईच्या कामांची तपासणी करण्यात आली. पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल, प्लास्टिक, टायर आणि इतर तरंगणारा कचरा आढळून आला. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा कचरा नाल्यात टाकणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर संजय घाडी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नालेसफाईसोबतच नागरिकांमध्येही जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौरांनी मानापमान नाटक पाहिले असेल : उपमहापौरांनी सध्या मानापमान नाटक पाहिले असेल असे मिश्किलपणे सांगताना महापौरांनी आमच्यामध्ये चांगला समन्वय असून मुंबईकरांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी चांगल्यात चांगली कामे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या पावसाळ्या मुंबईची तुंबई होवू नये, त्यांचा पावसाळ्यातील त्रास कमी व्हावा यासाठीच आम्ही नालेसफाईच्या कामांची पाहणी करत आहोत. मी, उपमहापौर हे स्वतंत्रपणे पाहणी करत असल्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून या सफाई कामांवर विशेष वचक राहिल असे वाटते.






