सीमा मालाणी
मी व माझी मैत्रीण रोज फिरायला जात असू . बोलायला विषयांचा तोटा नव्हता. दोघीही पुस्तकवेड्या असल्यामुळे जुनं व ताजं वाचन, नाटक, सिनेमा, पेपरातल्या बातम्या, राजकारण, सामाजिक विषय इथपासून सासरच्या लोकांचे वाभाडे काढणे, गावातली धुणी धुणे, नवऱ्यांच्या कागळ्या करणे वगैरे अनेक विषयावर आम्ही चालता चालता बोलत असू. कधीतरी कारण परत्वे एखादा खाडा व्हायचा पण आम्हाला संध्याकाळचं आकाश, मोकळी हवा यांचाही लळा होता. एकदा अचानक यात खीळ पडली. मी पाच-सहा दिवस गेलेच नाही. फोनही नाही केला. काही नाही मग चिडून मैत्रिणीचा फोन आला "काय गं कुठे गायब झालीस? फोनही नाही केलास?" मी म्हटलं, “अगं बाई विसरलेच बघ सांगायला. माझ्याकडे सध्या ओली बाळंतीण आहे. शिवाय तिचं जुळं आहे. सवडच नाही मिळत तिची ठेप ठेवता ठेवता.” मैत्रीण जवळजवळ किंचाळलीच "काsssय? पाच-सहा दिवसांत तुझ्या मुलाचं लग्न होऊन सून बाळंतीण झाली आणि मला पत्ता नाही?".…..मी मध्येच तोडत तिला म्हणाले ,"अगं, ऐक, आमच्या गच्चीत एक सुंदर मांजरी तिच्या दोन छोट्या पिल्लांना घेऊन आलीये. तू लगेच ये बघायला." तिचं मांजर- प्रेम माझ्यापेक्षाही दांडगं होतं. ती म्हणाली ,“लगेच येते."
हो ना खरंच, आमच्या चहूबाजूंनी झाडांच्या कुंड्या असलेल्या गच्चीत एक मांजरी आपल्या दोन गोंडस पिल्लांना घेऊन आली होती. बाईसाहेब एका मोठ्या कुंडीच्या मागे मस्त पहुडल्या होत्या व दोन अगदी छोटी गोजिरवाणी पिल्लं तिच्या कुशीत होती. नवरा गच्चीत झाडांना पाणी द्यायला गेला व आनंदाने मला त्याने हाक मारली ,"अगं, लवकर वर ये, हे बघ काय भारी पाहुणे आलेत आपल्याकडे." मीही हातातलं काम टाकून वर गेले. खरंच खूपच सुंदर त्रिकूट होतं. आम्हां दोघांना एकदम प्रेमाचं भरतं आलं. पिल्लं खूपच छोटी होती. हे म्हणाले,"अगं, दूध आणतेस का ?" म्हटलं, "हो हो लगेच आणते. फ्रीज मधलं थंड दूध जरासं कोमट करून आणते."
एका चपट्या भांड्यात मी भरपूर दूध घेऊन वर गेले म्हंटलं ,"फार जवळ जाऊ नका ." काठीने भांडे हळूच तिच्या पुढ्यात सरकवलं पण मांजरीने त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ती पिल्लांना चाटण्यात मश्गूल होती. तिने साधं "म्यांऊ " पण केलं नाही. आम्ही मात्र तिच्याकडे बघत बसलो. अर्धा तास वाट बघितली पण मांजरीची विश्रांती काही संपेना. कंटाळून आम्ही खाली आलो. यांनी तिचे पिल्लांसहित फोटो काढून लगेच व्हॉट्सअप वर मुलांना पाठवले. नवरोबा व मुलं खूपच प्राणीप्रेमी, मी आपली बेताची प्राणीप्रेमी. मुलांनी लगेच आम्हाला व्हॉट्सअप वर खूप साऱ्या सूचना पाठवल्या. आणि वडिलांनी लगेच त्या फॉलो केल्या.
माळ्यावर चढून एक मोठं चपटं खोकं काढलं. त्याला समोरासमोर अशा दोन खिडक्या केल्या. आत मध्ये एक जुना मऊ मऊ उशीचा आभ्रा ठेवला. समोरचं खोक्याचं तोंड उघडं ठेवून ती बाळंतिणीची खोली सज्ज करून गच्चीवर नेऊन ठेवली. अशा ठिकाणी की जिथे तिला उन्हाचा त्रास होणार नाही. खिडक्यांमुळे हवा खेळती राहील व पिल्लांना घेऊन ती आत मध्ये छान झोपू शकेल. खोक्याची उघडी बाजू जमिनीला काटकोनात ठेवली. खोकं ठेवायला आम्ही जेव्हा वर गेलो तेव्हा तिने दूध गट्टम केलेले होते. ताटली स्वच्छ केली होती चाटून पुसून. आम्हालाही आनंद झाला. मी परत खाली जाऊन दूध घेऊन आले पण तिने परत आम्हाला "एटीट्यूड" दाखवला. अर्धा तास वाट पाहून व खोके व्यवस्थित तिला दिसेल अशा पद्धतीने ठेवून खाली आलो. ती सकाळी दहाच्या सुमारास यांना दिसली होती, तेव्हापासून आम्ही बऱ्याच वर खाली चकरा मारल्या. संध्याकाळी पाच साडेपाचला बाईसाहेब पिलांना घेऊन खोक्याच्या रूममध्ये स्थानापन्न झाल्या. पिल्लं तिचं दूध पीत होती व दुधाची ताटली परत साफ झाली होती. आपल्याकडेही काही ठिकाणी बाळंतिणीला सर्वांसमोर वाढत नाहीत आणि तीही आमच्यासमोर दूध पीत नव्हती. पांढरट सोनेरी रंगाची आई व अगदी तशीच पिल्ले. फारच सुंदर होती. आम्ही खाली आलो की दुधाची ताटली साफ असे. दोन-तीन दिवस गेल्यानंतर मांजरीही आम्हाला 'भली माणसं ' समजू लागली. गच्चीत ती फिरत असताना आम्ही तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो. तिच्या पिल्लांना मांडीत घेऊन कुरवाळू लागलो. पण ती एकदाही आमच्यावर फिस्कारली नाही की गुरगुरली नाही. पाच-सहा दिवसांनी पिल्लं बाळसं धरू लागली. भर दुपारी मांजरी पिल्लांना एकटं टाकून भटकून येऊ लागली. बाहेरून काही खाऊन आली असेल तर ती दुधाला तोंड लावत नसे. ती बाहेरून आली की तडक रूममध्ये जाऊन पिल्लांना पाजायची व मस्त डोळे मिटून ताणून द्यायची. आता पिल्लं खेळायला लागली. आईला ढुशा मारणे, एकमेकांच्या व आईच्या अंगावर उड्या मारणे, छोट्या खिडक्यांमधून डोकं बाहेर काढणे, घशातून नाजूक म्यांऊ म्यांऊ आवाज काढणे... आम्ही दोघे अगदी खुशीत होतो. मुलांना रोज अपडेट्स व फोटो पाठवत होतो. मला तर अगदी तिच्यासाठी बाळांतपणातले खारीक खोबऱ्याचे छोटे छोटे लाडू करावेसे वाटत होते, तिला व तिच्या बाळांना मालिशही करावेसे वाटत होते.
आता पिल्लं बाहेर येऊन खेळायला लागली. कुंड्यांच्या मागे जाऊन लपाछपी खेळणे, एकमेकांना बोचकारणे, झाडांच्या गळून गेलेल्या पानांशी खेळणे, हलत्या सावल्यांमध्ये वेड्यावाकड्या उड्या मारणे, आमच्याकडून लाड करून घेणे अशा अनेकप्रकारच्या त्यांच्या बालसुलभ लीला पाहून आम्हीही त्यांच्याशी मोठ्याने गप्पाही मारू लागलो. दोन्ही पिल्लं इतकी सारखी दिसायची की हे की ते असं कळायचंच नाही पण मग असं लक्षात आलं की एकाच्या शेपटीचं टोक पांढरं तर एकाचं सोनेरी आहे. मांजरी आता खूप खूप वेळ बाहेर राहू लागली. पिलांना पाजायला मात्र न विसरता यायची. पिल्लं जाम दंगेखोर होऊ लागली. छोट्या मातीच्या कुंड्या पाडून पायांनी माती सगळीकडे पसरून ठेवणे, झाडावरच्या मुंग्यांना, किड्यांना फटके मारणे, उन्हात स्वतःच्या सावलीशीच खेळणे, एखाद्या सुतळीशी खेळणे ...त्यांच्या हालचाली अगदी गोड असायच्या. आम्हीही कौतुकाने बघत राहायचो. एक छोटा टेबल टेनिसचा चेंडू आम्ही त्यांना खेळायला दिला होता. तास दोन तास कसे निघून जायचे कळायचे पण नाही. आम्हा दोघांची संध्याकाळ तर गच्चीवरच जाऊ लागली. मांजर फॅमिलीशी चांगलीच गट्टी जमली.
पण एक दिवस गच्चीवर गेलो तर एकच पिल्लू दिसत होत. मांजरी नेहमीप्रमाणे भटकायला गेलेली. दुसरे पिल्लू कुठे दिसेच ना. सर्व कुंड्यांमागे, खताच्या पोत्यामागे, संपूर्ण घरात, शेजारच्या गच्चीत... खूप शोधाशोध केली पण नाहीच कुठे दिसले. बरे, शेजारच्या गच्चीत ते उडी मारून जाण्याइतके मोठे तर नव्हतेच किंवा मांजरीनेच कुठे नेले असेल तर ती दोघांना घेऊन जाईल ना ? आम्ही अगदी कासावीस झालो, कारण दुसरे पिल्लू कावरेबावरे होऊन गेले होते. ते वेड्यासारखे इकडून तिकडे फिरत होते, ना दंगा ना खेळणं. केविलवाणे म्यांऊ म्यांऊ ओरडत होते. आम्ही त्याला मांडीवर घेऊन कुरवाळले पण ते मांडीवरही टिकेना. आम्हीही चिंतेत की असं कसं झालं ? मला तर मांजरीचाच राग आला. वाटलं, लेकरांना असं टाकून ही बया कुठे कुठे भटकते, लक्ष नको का ठेवायला ? उलट्या काळजाची वगैरे ...पण तेवढ्यात मांजरी आली. तीही त्या हरवलेल्या पिल्लाचा शोध घेऊ लागली. जोरजोरात म्यांऊ म्यांऊ करू लागली. दुसऱ्या पिल्लावर व आमच्यावर गुरगुरु लागली. पण आमच्या असे लक्षात आले की मांजरी आणि ते पिल्लू, गच्ची धुताना पाणी काढण्यासाठी जो पाइपाचा होल (खड्डा) असतो तिथे जाऊन म्यांव म्यांव करतात. मग आमची ट्यूब पेटली. पिल्लू खेळता खेळता त्या होलमध्ये पडले असावे. अरे देवा ...यांनी घाईघाईने जाऊन तिथून खाली पाहिले पण पिल्लू रस्त्यावर पडले नव्हते. कारण तो पाईप "झेड " या आकाराचा होता. म्हणजे ते पिल्लू खालच्या आडव्या पाईप मध्ये होते. म्हणूनच त्याचा क्षीण असा आवाज मांजरीला व त्याच्या भावंडाला बरोबर ऐकू येत होता व ती दोघे त्या होलपाशी जाऊन त्याला साद घालत होती.
आमच्या दोघांचा जीव भांड्यात पडला. पिल्लू जिवंत होते व ते काढता येण्यासारखे होते. पण संध्याकाळ झालेली, अंधारून आलेले. आता जे काही करायचे ते सकाळी सूर्यप्रकाशातच. मांजरीलाही खात्री झाली होती. पण तिला व आम्हाला ते पिल्लू दिसत नव्हते. सकाळी सकाळी आमच्या समोरच्या घरातल्या वहिनींचा फोन आला."अहो, पहाटेपासून समोरच्या पाईपाच्या तोंडाजवळ एक मांजरीचं पिल्लू ओरडतंय आणि सारखं खाली झुकून पाहतंय." आम्ही विचारलं ," तुम्हाला दिसतंय का ?" तर त्या "हो " म्हणाल्या. म्हटलं चला, पिल्लू सुरक्षित आहे पण भ्यालेलं आहे. शिवाय भूकही लागली असावी त्याला.
यांनी गल्लीत जाऊन ज्यांच्याकडे सर्वातउंच शिडी होती ती आणून चढायचा प्रयत्न केला. पण कुठलीच शिडी त्या पाईपाच्या तोंडाजवळ पोहोचेना. आता आम्ही खूपच अस्वस्थ झालो. म्हटलं, भुकेने पिल्लू मेलं तर ? लवकरात लवकर काहीतरी करायला हवं होतं. तिकडे ती मांजरी व ते दुसरे पिल्लू आमच्याहून जास्त अस्वस्थ होते. सारखं होलपाशी जाऊन म्यांऊ म्यांऊ करून धीर देणं चालू होतं.
माझ्या मनात एकदम एक आयडिया आली. एक हँडल असलेले बास्केट घेऊन त्याला दोरी बांधून पाईपाच्या तोंडाशी की जिथे अडकलेलं पिल्लू बसले होते तिथपर्यंत ते बास्केट सोडलं व दोरी एके ठिकाणी बांधून ठेवली, जेणेकरून पिल्लाने घाबरून उडी मारली तरी ते त्या बास्केटमध्ये पडेल, खाली जमिनीवर पडणार नाही. मग नवऱ्याने तातडीने आमच्या एका प्राणी मित्राला फोन केला. तो त्याच्या घरून लगेच मोटारसायकलवरून आला. त्याने वर जाऊन सर्व परिस्थिती पाहिली. मग आम्हाला म्हणाला," बास्केट लावलं हे फारच बरं केलं, आता काहीच काळजी करू नका. आपण फक्त अर्धा तांब्या पाणी त्या होलमध्ये सोडू. ते पिल्लू पटकन त्या बास्केटमध्ये उडी मारेल." आणि तसं करताच खरंच त्या पिल्लाने बास्केटमध्ये टुणकन उडी मारली. आम्ही अलगदपणे बास्केट वर ओढलं आणि पिल्लाला मांजरी समोर ठेवलं. मांजरीचे डोळे आनंदाने लकाकल्यासारखे वाटले. ती त्या पिल्लाला चाटू लागली, पिल्लूही ऊं ऊं करत तिच्या कुशीत शिरले. दुसरे पिल्लूही आईला बिलगले. दोन्ही पिल्ले आईचे दूध पिऊ लागली. आम्ही अनिमिष डोळ्यांनी तो हळवा प्रसंग पहात होतो. थोडा वेळ 'प्यारदुलार' झाल्यावर मांजरीने शेपटीने दोघांनाही फटकारल्यासारखे केले व त्यांच्यावर थोडी गुरगुरून त्यांना आगाऊपणा न करण्याबद्दल समज दिली. शेवटी श्यामची आईच ती. पिलांना घेऊन ती खोक्यात रूममध्ये गेली तेव्हा आम्ही खाली आलो. दुपारी नेहमीप्रमाणे मी दुधाचे भांडे घेऊन वर गेले तर मांजरी दोन्ही पिलांना घेऊन सुरक्षित स्थळी निघून गेली होती.






