Saturday, April 11, 2026

राणादाचा ट्रॅप

राणादाचा ट्रॅप

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

झ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणाची भूमिका करून लोकप्रियतेचा कळस गाठलेला चॉकलेट बॉय व डॅशिंग अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी होय. त्याचा 'द ट्रॅप' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे.

दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात हार्दिकचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याने भाग घेतला होता. २००४ साली तो दहावीच्या परीक्षेतून उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने खालसा कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. वाणिज्य शाखेतून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. गणेशोत्सवामध्ये त्याच्या बिल्डिंगमध्ये संग्राम समेळ, नेहा लेले (गायक आदर्श शिंदेची पत्नी) यांच्यासोबत त्याने स्किटमध्ये भाग घेतला होता. तो तेव्हा अँटॉप हिलला राहायचा, तेंव्हा लहानपणी संग्राम तेथे येत असे.

त्याचाकडे तेव्हा नाटकाची पुस्तके होती. त्याच्यातील प्रसंग काढून त्यावर स्किट बसवली जायची. खालसा कॉलेजला त्यावेळी फॅशनचे वारे वाहू लागले होते. हार्दिकचा त्यावेळी व्यायामावर जोर होता. त्याचे मित्र त्याला सांगायचे मराठी मुलांनी फॅशनमध्ये भाग घेणे आवश्यक आहे.त्यामुळे त्याने फॅशन शोमध्ये भाग घेतला. त्या वेळेपासून त्याला या मनोरंजनाच्या क्षेत्राची आवड निर्माण झाली.

त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अनेक मालिकांमध्ये त्याने ज्युनिअर आर्टिस्टचे काम केले आहे. कन्यादान, दुर्वा, लक्ष्य, स्वप्नांच्या पलीकडले, राधा बावरी, अघोरी, क्राईम पेट्रोल, जय मल्हार या मालिकांमध्ये त्याने काम केले. त्याने ऑडिशन देणे सुरूच ठेवले होते. अशातच त्याला 'तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली. त्यातील त्याची राणाची भूमिका प्रचंड गाजली. ती मालिका त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली.

आज ही प्रेक्षक त्याला राणदा नावाने ओळखतात, यातच त्या भूमिकेचे महत्त्व आहे. ती लोकांनी दिलेली पदवी आहे व ते नाव राखून ठेवणे त्याचे कर्तव्य असल्याचे हार्दिकने सांगितले. त्यानंतर त्याने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे ही मालिका केली. महादेव, कलम ५२ हे चित्रपट त्याने केले. 'द ट्रॅप' हा नवीन चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये डॉक्टरच्या भूमिकेत हार्दिक दिसणार आहे. हा ट्रॅप आहे, हे जाळे आहे.

यामध्ये हार्दिक नायक आहे की सुजित जाधव असा प्रश्न प्रेक्षकांपुढे उभा राहतो. त्याच नाव खरे आहे की खोटे याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता राहते. जे चालले आहे ते खरे आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. मर्डर मिस्ट्री असा हा चित्रपट आहे. संजय खापरेची वेगळी भूमिका आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका केलेल्या आहेत, परंतु या चित्रपटातील त्यांची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वेगळी आहे. हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. एका वेगळ्या प्रकारचा हा चित्रपट आहे. सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे.

या चित्रपटामध्ये हार्दिक कॉर्पोरेट लूकमध्ये आहे. प्रत्येक जण दुसऱ्याच्या परिस्थितीचा फायदा घेत असतो. प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे, आपल्या परिस्थितीचा दुसऱ्याला फायदा घेऊ देऊ नका हा महत्वाचा संदेश या चित्रपटातून प्रेक्षकांना द्यायचा आहे. आपण जर सकारात्मक राहिलो तर आपल्या परिस्थितीचा कोणीही फायदा घेऊ शकत नाही. आपली परिस्थिती हलाखीची असली तर आपण त्यामध्ये वाहत जातो, त्यासाठी सतर्क असणे आवश्यक आहे. आपल्या परिस्थितीचा कोणी फायदा घेणार नाही आणि आपल्याला कोणी ट्रॅपमध्ये अडकवू शकत नाही.

महाराष्ट्रातून सर्वात जास्त चित्रपट पाहिल्याचे कलेक्शन जाते. आपण महाराष्ट्रीय माणसेच जास्त चित्रपट पाहतो. मराठी माणसाने मराठी चित्रपट जास्त पाहिले पाहिजे,त्याचा फायदा मराठी चित्रपट सृष्टीला होईल असे मत हार्दिकने मांडले. सध्या मराठीत वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट निर्माण होत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे देखील हार्दिकने नमूद केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल खापरे यांच्याविषयी काय सांगशील असे विचारले असता हार्दिक म्हणाला, “अमोलचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. या अगोदर सहकलाकार म्हणून आम्ही 'अरण्य' या चित्रपटात एकत्र काम केले होते.

त्याच वेळी त्यांनी मला सांगितले होते की मी एक चित्रपट निर्माण करणार आहे, त्यामध्ये तुला काम करायचे आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला की एक चित्रपट करीत असतानाच दुसऱ्या चित्रपटाची मला ऑफर आली. त्यांना मला या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दाखवायचे होते व तसा त्यांनी प्रयत्न देखील केला. मी त्यांच्या कसोटीस उतरलो असेल असे मला वाटते."

अमोल हा नवीन दिग्दर्शक आहे.ज्याप्रमाणे नवीन कलाकाराला सगळे जण सपोर्ट करतात, त्याप्रमाणे नवीन दिग्दर्शकाला कलाकारांनी सपोर्ट केला पाहिजे. या चित्रपटामध्ये मोहन जोशीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हर हर महादेव चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे भाग्य असल्याचे त्याने म्हटले आहे.

'द ट्रॅप' चित्रपटातील ट्रॅप एक असं जाळं की ज्यात एकदा अडकला की सुटणं अशक्य. इथे प्रत्येक पात्र काहीतरी लपवतयं. प्रत्येक चेहरा खरा आहे की मुखवटा हे ओळखणं कठीण जातं. प्रेक्षकांची उत्सुकता नक्की ताणली जाणार हे निश्चित आहे आणि शेवटी रहस्याचं जाळ उलगडेल.

Comments
Add Comment