Saturday, April 11, 2026

कलाकृती एक, कलाकार अनेक...

कलाकृती एक, कलाकार अनेक...

राजरंग : राज चिंचणकर

रंगभूमीवर सादर होणारा प्रत्येक प्रयोग हा ठरलेल्या पद्धतीनेच सादर होतो. संवाद, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत आणि कलाकारांच्या भूमिका प्रत्येक प्रयोगात त्याच पद्धतीने साकार होत असतात. साहजिकच, एखाद्या नाटकाचा प्रयोग अनुभवल्यानंतर 'रिपीट ऑडियन्स' म्हणून पुन्हा त्या नाटकाला गेल्यास पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. पण समजा, नाटक तेच असेल; मात्र त्यातल्या काही गोष्टी बदललेल्या असतील तर...? अशाच पद्धतीचे एक सूत्र एका नाटकाने अवलंबले आहे; मात्र त्याने नाटकाचा आशय आणि रंजकता याला अजिबात धक्का लागलेला नाही, हे विशेष...!

आता असा अजब प्रयोग साधलेली कलाकृती आहे, ती म्हणजे सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेले 'यदा कदाचित रिटर्न्स' हे नाटक...! आता सर्वच नाटकांप्रमाणे या नाटकाचा प्रयोगही ठरलेल्या पद्धतीनेच होत असला; तरी त्यात एक गोष्ट लक्षणीय आहे आणि ती म्हणजे या नाटकातले कलाकार मात्र काही प्रयोगागणिक बदलत असतात. संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात स्वतः संतोष पवार विविध प्रकारची ११ पात्रे रंगवत आहे.

मात्र त्याच्या व्यतिरिक्त या नाटकात युवा कलाकारांची जी भली मोठी फळी आहे; ती मात्र वेगवेगळ्या प्रयोगांना बदलत आली आहे. आता या नाटकाचे जवळपास पाचशे प्रयोग होत आले असताना, या नाटकात किती कलाकारांनी भूमिका साकारल्या याची गणतीच करता येत नाही.

नाटकातले कलाकार बदलत राहिले म्हणून या नाटकाच्या सादरीकरणावर कोणताही चुकीचा परिणाम होत नाही; हे या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अर्थात या सगळ्यावर संतोष पवारचा अंकुश असल्याने हे साध्य होत आले आहे. कलाकार बदलत असले तरी एकूणच नाट्याशयावर किंवा नाटकाच्या रंजकतेवर काहीही परिणाम होत नसल्याने नाटकाचा तोल किंचितही ढळत नाही.

ही किमया अर्थात संतोष पवारची असली तरी त्याचे श्रेय संबंधित तमाम युवा कलावंतांनाही द्यावे लागेल. अगदी थोडक्या अवधीत रिहर्सल करून त्या-त्या भूमिकेसाठी उभे राहायचे आणि त्यात काहीही उणीव ठेवायची नाही; हे या कलावंतांना कसे काय जमून येते, ही मोठी आश्चर्याची बाब आहे.

हे झाले या नाटकाच्या अंतरंगाच्या बाबतीत; पण नाट्यसृष्टीच्या दृष्टिकोनातून पाहायचे तर या सगळ्या प्रकारामुळे संतोष पवारने शेकडो युवा कलाकारांना नाटकाचा रंगमंच मिळवून दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या-त्या कलाकारांनी मिळालेल्या या संधीचा योग्य उपयोगही करून घेतला आहे. नवनवीन कलाकार यातून रंगभूमीवर आले आहेत आणि 'यदा कदाचित रिटर्न्स'ची हीच खास बात आहे.

Comments
Add Comment