Saturday, March 21, 2026

विदर्भ साहित्य संघाचा नवा अध्याय

विदर्भ साहित्य संघाचा नवा अध्याय

वार्तापत्र : विदर्भ

विदर्भातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित अशा विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. गिरीश गांधी यांची अध्यक्ष पदी निवड झाली असून त्यांच्या पॅनलने बहुमत मिळवले आहे. नव्या नेतृत्वासमोर संस्थेची सांस्कृतिक परंपरा पुनर्स्थापित करणे आणि पारदर्शक कारभार उभा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून विदर्भात गाजत असलेल्या विदर्भ साहित्य संघाची पंचवार्षिक निवडणूक अखेर पार पडली. या निवडणुकीने गेले काही दिवस संपूर्ण विदर्भाचे सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण पूर्णतः ढवळून टाकले होते. गेल्या शनिवारी पोस्टाने मतपत्रिका पाठवण्याचा अखेरचा दिवस होता. रविवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आणि सोमवारी रात्रीपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले आहेत.

अपेक्षेनुसार सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक मान्यवर नाव असलेले डॉ. गिरीश गांधी हे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तर कार्यकारिणीच्या २२ जागांवर गिरीश गांधींच्या पॅनलपैकी २१ उमेदवार विजयी झाले. विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वात जुनी साहित्यिक संघटना असून ती आता १०३ वर्षांची झालेली आहे. या संघटनेचे नेतृत्व आतापर्यंत अनेक मान्यवर सारस्वतांनी केलेले असून या संघटनेला त्यांनीच एक वाङमयीन चेहरा देखील दिलेला होता. त्यात प्राचार्य राम शेवाळकर, प्रा. सुरेश द्वादशीवार, डॉ. मधुकर आष्टीकर, डॉ. वि. भी. कोलते, कवी अनिल, कवी भवानीशंकर पंडित, कवयित्री कुसुमावती देशपांडे अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. मात्र गेल्या ३५ वर्षांपासून ही संस्था कायम वादाच्या भोवऱ्यातच सापडलेली आहे.

विदर्भ साहित्य संघाचे काम संपूर्ण विदर्भात अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले आहे. लहान लहान खेड्यांमध्ये देखील साहित्य संघाच्या शाखा सुरू झालेल्या आहेत. तिथे काही ना काही साहित्य कार्यक्रम कायम होतच असतात. त्यामुळे संपूर्ण विदर्भाची प्रातिनिधिक साहित्य संस्था म्हणून ही ओळखली जाते. त्यामुळेच ही निवडणूक संपूर्ण विदर्भात चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविकच आहे. या संस्थेचे काम बघून जुन्या मध्य प्रांत (सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार) सरकारने संस्थेला अगदी मोक्याच्या जागी एक भूखंड दिला होता. तिथे संस्थेने सुसज्ज अशी इमारत आणि एक भव्य असे रंगमंदिरही उभारले होते. मात्र १९९४-९५ मध्ये तत्कालीन कार्यकारिणीने ही इमारत जुनी झाल्याचे कारण देत आणि पुनर्विकासाचा प्रकल्प सदस्यांसमोर मांडत मंजुरी घेऊन पाडली आणि तिथे व्यावसायिक संकुल उभे केले. त्या संकुलाची इमारत आज तीस वर्षे झालीत, तरी पूर्ण झालेली नाही. म्हणजेच व्यावसायिक गाळे पूर्ण करून ते विकलेदेखील गेले, पण तिथे होणार असलेले रंगमंदिर आज तीस वर्षे झाली तरी पूर्ण झालेले नाही. त्यात गेली वीस वर्ष साहित्यिक नसलेल्या व्यक्तींकडे या संघटनेचे नेतृत्व राहिले आहे. त्यामुळे इथल्या साहित्यिक गतीविधी देखील थांबल्या आहेत. मधली वीस वर्षे इथे बिनविरोध निवडणुका होत होत्या. यावेळी प्रथमच चार पॅनल्स रिंगणात उतरले. त्यात दोन साहित्यिक तर दोन गैर साहित्यिक अध्यक्ष पदासाठी रिंगणात होते. त्यातील साहित्याशी काहीही संबंध नसलेले व्यावसायिक आणि राजकीय नेते डॉ. गिरीश गांधी हे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यावरून निवडणूक प्रक्रियेत तर बरेच वाद झाले, पण नंतरही आता बरेच वाद होणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे.

डॉ. गिरीश गांधी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे उमेदवार म्हणून ओळखले जातात. सुरुवातीच्या काळात गांधी हे शाळेत शिक्षक होते. तेव्हा नितीन गडकरी त्यांचे विद्यार्थी होते. परिणामी दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे भाजपचा या निवडणुकीत हस्तक्षेप आहे असा आरोप सुरुवातीपासून होत होता. गडकरींनी खुलासा करून देखील हा आरोप होण्याचे थांबले नव्हते. कारण असा हस्तक्षेप असल्याचे वेळोवेळी संकेत मिळत होतेच. या निवडणुकीत पोस्टाने मतदारांकडे मतपत्रिका पाठवायच्या आणि मतदारांनी त्या मतपत्रिका भरून साहित्य संघाकडे परत पाठवायच्या अशी पद्धत आहे. इथे सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी गावोगावी फिरून मतदारांकडून कोऱ्या मतपत्रिका गोळा केल्या आणि स्वतःच टिकमार्क करून मतपेटीत टाकल्या असा आरोप होत आहे. त्यातही अनेक मतपत्रिका या पोस्टातून परस्पर पळवल्या गेल्या. त्या मतदारांपर्यंत पोहोचल्याच नाहीत, तर आधीच कोणीतरी पळवून त्यावर टिक करून दुसऱ्याच व्यक्तीने मतपेटीत टाकल्या, असे प्रकारही उघडकीस आले आहेत. या सर्व कामात भाजपने स्वतःची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना यंत्रणा मोठ्या प्रमाणात वापरली. तसेच आर्थिक गैरव्यवहार देखील केले असा आरोप वारंवार केला जात आहे. मतदार यादीदेखील सदोष असल्याचे आढळून आले. अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही कायम आहेत, तर अनेक उमेदवारांचे आणि मतदारांचे वीस वर्षांपूर्वीचे जुने पत्ते तसेच आहेत. त्यात सुधारणा करण्याचे कष्टही साहित्य संघाच्या कार्यालयाने घेतलेले नाही. त्याचाच फायदा घेऊन या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. रविवारी निकाल लागल्यानंतर नियमानुसार आठवड्याभरात लवादासमोर दाद मागावी लागते आणि तरीही समाधान झाले नाही, तर न्यायालयात दाद मागता येते. इथे बहुतेक सर्व पराभूत उमेदवार न्यायालयात जाणारच हे चित्र स्पष्ट दिसते आहे.

गिरीश गांधी साहित्य संघाचे अध्यक्ष झाले तरी त्यांच्यासमोर आव्हाने बरीच राहणार आहेत. ज्या ठिकाणी साहित्य संघाचे जुने कार्यालय होते तिथे व्यावसायिक संकुल झाले आहे. त्या ठिकाणी नव्याने सांस्कृतिक संकुल उभे राहावे आणि १९९५ पूर्वी त्या परिसरात जे सांस्कृतिक वातावरण होते ते पुन्हा निर्माण व्हावे अशी अपेक्षा गिरीश गांधींचे चालू राजकीय गॉडफादर नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ती पूर्ण करण्याचे खरे आव्हान गांधींसमोर आहे. त्याशिवाय पंधरा वर्षांत साहित्य संघातील थांबलेल्या सांस्कृतिक गतीविधी पुन्हा सुरू करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. दुसरे म्हणजे तिथला प्रशासनिक गलथानपणा संपवून यापुढे लोकशाही पद्धतीने पारदर्शी निवडणुका कशा होतील ही व्यवस्था करण्याचे खरे आव्हान त्यांना पेलायचे आहे. म्हणजेच आज जसा गिरीश गांधींवर भाजपची आणि संघाची यंत्रणा वापरून आणि गैरप्रकार करून विजयी झाल्याचा आरोप मोठ्या आवाजात केला जात आहे तसा आरोप भविष्यात कोणीही करू शकणार नाही ही काळजी त्यांना घ्यायची आहे. विदर्भ साहित्य संघ ही मराठी भाषिकांची साहित्यिक संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे गिरीश गांधी सर्वांना प्रेमाने जवळ करून काम पुढे नेतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.

Comments
Add Comment