Friday, March 20, 2026

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारतात उत्पादन, गुंतवणूक, नवकल्पना आणि ऊर्जा क्षेत्राचा व्यापक विस्तार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत, “विकासासाठी विद्युतीकरण आणि शाश्वततेसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत,” असे नमूद केले.

इंडियन इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ मध्ये गुरुवारी केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी वाचून दाखवलेल्या लिखित संदेशात पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आपल्या ऊर्जा प्रवासातील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारत ऊर्जा क्षेत्रात मोठ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट संपूर्ण ऊर्जा परिसंस्थेला एका मंचावर आणून विचारांची देवाणघेवाण करणे आणि ऊर्जा विकासासाठी सामूहिक मार्ग निश्चित करणे आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात असून सर्वांसाठी विश्वासार्ह ऊर्जा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून २०३० पर्यंत ५०० गीगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक गैर-जीवाश्म इंधन क्षमता आधीच साध्य करण्यात आली आहे.

“एक सूर्य, एक जग, एक ग्रिड” यांसारख्या उपक्रमांद्वारे जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत मजबूत पुरवठा साखळी निर्माण करत विश्वासार्ह ऊर्जा भागीदार म्हणून उदयास येत आहे. बॅटरी उत्पादन, रोजगारनिर्मिती आणि सुधारित धोरणांमुळे गुंतवणुकीला चालना मिळत आहे.

तसेच, ‘शांती अधिनियम २०२५’मुळे अणुऊर्जा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत असून ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’मुळे वितरित ऊर्जा उत्पादन आणि शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा