इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया यांनी घराजवळच असलेल्या कनेक्शनचा वापर करून ईव्हीचे चार्जिंग सुरू ठेवले होते. चार्जिंग सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. ईव्हीने पेट घेतला. आग वेगाने पसरली आणि थोड्याच वेळात पुगालिया यांच्या घरालाही आगीनं वेढले. घरातल्यांना सावरण्याची संधी मिळण्याआधीच आग घरात असलेल्या सिलेंडरच्या साठ्यापर्यंत पोहोचली. घरात दहा सिलेंडर ठेवले होते. हे सर्व सिलेंडर फुटल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
घरात एकूण दहा जण होते. यापैकी सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनोज पुगालिया यांनी रात्री झोपताना कनेक्शनचा वापर करून ईव्हीचे चार्जिंग सुरू ठेवले होते. हे चार्जिंग सुरू असताना पहाटे ४ च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आग वेगाने पसरली आणि घरातला सिलेंडरचा साठा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला. दुर्घटनेत पुगालिया यांच्या घराचा काही भाग कोसळला.
पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पुगालिया यांचा पॉलिमरचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त त्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने साठवून ठेवली होती. कारची आग, गॅस सिलेंडरचे स्फोट आणि रसायने या तिन्ही घटकांमुळे घरात आगडोंब उडाला. घरात झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
घराला इलेक्ट्रॉनिक डिजिटल लॉक बसवण्यात आलं होतं. आगीमुळे घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हे डिजीटल लॉक उघडलं नाही. परिणामी, कुटुंबातील सदस्य आतच अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांना घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तोडावे लागले. तोपर्यंत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.






