Friday, February 20, 2026

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रिकी पॉन्टिंग कडून घरचा आहेर

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रिकी पॉन्टिंग कडून घरचा आहेर

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. ग्लेन मॅकग्रापासून रिकी पॉन्टिंगपर्यंत सर्वांनी कांगारूंच्या कामगिरीवर टीका केली आहे. मॅकग्राने तर ऑस्ट्रेलियाने आपली चमक गमावली आहे असे म्हटले आहे, तर आयसीसी रिव्ह्यू कार्यक्रमात संघाच्या कामगिरीचा आढावा घेताना पॉन्टिंगने ऑस्ट्रेलिया संघाच्या भविष्याबद्दलही आपले विचार मांडले.

ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलताना पॉन्टिंग म्हणाला, "ही खरोखरच वाईट स्पर्धा होती, असं मी म्हणेन." तसेच रिकीने जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना झालेल्या दुखापती आणि सुरुवातीच्या काळात टिम डेव्हिडची अनुपस्थिती ही मोठी समस्या असल्याचे सांगितले. पुढे श्रीलंकेचे कौतुक करताना रिकी म्हणाला की, "घरच्या मैदानावर श्रीलंकेला हरवणे कठीण होते आणि त्यांचा धावांचा पाठलाग आश्चर्यकारक होता आणि त्यांना थांबवणे सोपे नव्हते. पण ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत अशा चुका करू शकत नाही."

पॉन्टिंग असेही म्हणाला की, माजी क्रिकेटपटू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सध्याच्या खेळाडूंवर कधीही नकारात्मक टीका करत नाहीत. पण त्यांना संघाने चांगली कामगिरी करावी असे वाटते, जे यावेळी झाले नाही. पण ऑस्ट्रेलियन संघ टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत नाही ही कल्पना त्यांनी फेटाळून लावली. "अ‍ॅशेसनंतर लगेच कामगिरी करण्यासाठी क्रिकेटपटूंवर दबाव असतो." काही क्रिकेटपटू बीबीएलमध्ये खेळायला गेले, काहींनी विश्रांती घेतली आणि विश्वचषकाची तयारी सुरू ठेवली. आणि विश्वचषक जिंकणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

Comments
Add Comment