निशा वर्तक
“स्त्री”हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर अनेक भावना उभ्या राहतात — माया, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा, काळजी आणि त्याचबरोबर थोडासा हट्ट, रुसवा-फुगवा आणि भावनांचा ओलावा. स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान मानवी अस्तित्व असले तरी त्यांच्या स्वभावातील काही वैशिष्ट्ये त्यांना वेगळेपण देतात. हे वेगळेपण श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणारे नसून जीवन अधिक रंगतदार आणि संतुलित करणारे आहे.
स्त्रियांच्या स्वभावातील सर्वात ठळक गुण म्हणजे भावनाशीलता. अनेकदा छोट्याशा प्रसंगानेही त्यांच्या डोळ्यात पाणी येते. एखाद्या मालिकेतील भावनिक प्रसंग, मुलाचे यश, जवळच्या व्यक्तीचे दुःख किंवा एखादी आठवण — या गोष्टी त्यांना सहज स्पर्श करून जातात. काहींना हे हळवेपण कमजोरी वाटते; पण प्रत्यक्षात हीच संवेदनशीलता त्यांना दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची ताकद देते. घरातील एखादा सदस्य निराश असेल तर त्याची अवस्था लगेच ओळखणारी व्यक्ती बहुतेक वेळा घरातील स्त्रीच असते.
स्त्रियांबद्दल विनोदाने म्हटले जाते की “त्यांच्या पोटात गुपित राहत नाही.” यामागेही एक मानसिक बाजू आहे. स्त्रिया संवादप्रिय असतात. त्या भावना व्यक्त करून हलक्या होतात. मैत्रिणींमध्ये गप्पा मारताना त्या मन मोकळे करतात. उदाहरणार्थ, एखाद्या गृहिणीला दिवसभराचा ताण असतो; संध्याकाळी शेजारणीशी दोन शब्द बोलल्यावर तिचा ताण कमी झालेला दिसतो. संवाद हा त्यांच्यासाठी मानसिक आधार असतो. मात्र कधी कधी याच स्वभावामुळे नकळत एखादी गोष्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि गैरसमज निर्माण होतात हा त्याचा तोटा म्हणावा लागेल.
नटणे-सजणे हा स्त्रियांच्या स्वभावाचा आणखी एक रंगतदार पैलू आहे. सण-समारंभ असो किंवा साधा दिवस नवीन साडी, दागिने, मेहेंदी किंवा छोटासा बिंदीचा स्पर्श त्यांना आनंद देतो. हे केवळ बाह्य सौंदर्याचे आकर्षण नसते; तर स्वतःला सुंदर वाटण्याची आणि जीवन साजरे करण्याची एक पद्धत असते. उदाहरणार्थ, दिवाळीत घरातील स्त्री स्वतः सजतेच, पण घरालाही सजवते. तिच्या या सौंदर्यदृष्टीमुळे वातावरणात उत्साह निर्माण होतो.
स्त्रिया स्वभावतः प्रेमळ आणि जपणूक करणाऱ्या असतात. आई, बहीण, पत्नी किंवा मैत्रीण - कोणतीही भूमिका असो, नात्यांमध्ये ऊब टिकवण्याचे काम त्या सहज करतात. घरातील प्रत्येकाच्या आवडी-निवडी लक्षात ठेवणे, आजारी पडल्यावर रात्रभर जागरण करणे किंवा छोट्या यशाचाही उत्सव साजरा करणे- या गोष्टी त्यांच्या प्रेमळ स्वभावाची साक्ष देतात. म्हणूनच अनेकदा घराला “घरपण” देण्याचे श्रेय स्त्रीला दिले जाते.
मात्र स्त्रीस्वभाव केवळ गुणांनीच बनलेला नाही; काही मानवी दोषही त्यात असतात. मत्सर आणि तुलना हा त्यातील एक पैलू आहे. समाजाने स्त्रियांना अनेकदा एकमेकींशी तुलना करण्याची सवय लावली - कोणाची साडी सुंदर, कोणाचे घर अधिक व्यवस्थित, कोणाचे मूल अधिक हुशार. या तुलनेतून नकळत स्पर्धा आणि मत्सर निर्माण होतो. उदाहरणार्थ, शेजारीण नवीन वस्तू घेते तेव्हा काही वेळा आनंदापेक्षा तुलना जास्त होते. ही भावना स्त्रियांपुरती मर्यादित नसली तरी सामाजिक वातावरणामुळे ती अधिक प्रकर्षाने दिसून येते.
तसेच कधी कधी रुसवा, राग किंवा मनातल्या भावना साठवून ठेवण्याची प्रवृत्तीही दिसते. एखादी गोष्ट मनाला लागली तर ती लगेच स्पष्ट न सांगता मनात ठेवली जाते आणि नंतर छोट्या कारणावरून भावनिक उद्रेक होतो. यामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण यामागेही भावनिक गुंतवणूकच कारणीभूत असते -जिथे अपेक्षा जास्त, तिथे दुखावले जाण्याची शक्यता अधिक असते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा हट्टीपणा. एखाद्या गोष्टीसाठी ती कधी कधी खूप हट्ट धरते जसे सीतेने कांचमृगासाठी केलेला हट्ट आणि त्यामुळेच घडलेले रामायण.
स्त्रियांची आणखी एक विशेषता म्हणजे अनेक भूमिका एकाच वेळी निभावण्याची क्षमता. सकाळी आई, दिवसा कर्मचारी, संध्याकाळी मुलांची मार्गदर्शक आणि रात्री कुटुंबाची काळजी घेणारी — या सर्व भूमिका त्या सहज सांभाळतात. उदाहरणार्थ, नोकरी करणारी स्त्री ऑफिसमधील ताण सांभाळून घरी आल्यावर मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देते आणि घरातील वातावरणही आनंदी ठेवते. ही बहुपदरी क्षमता त्यांच्या मानसिक ताकदीचे उदाहरण आहे.
आजच्या काळात स्त्री अधिक आत्मविश्वासाने स्वतःची ओळख घडवत आहे. तिच्यातील हळवेपणा, प्रेमळपणा, सजण्याची आवड किंवा संवादप्रियता — हे दोष नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रंग आहेत. त्याचवेळी मत्सर, राग किंवा भावनिक अतिरेक यांवर मात करण्याची जाणीवही वाढत आहे. खरं तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक हा स्पर्धेचा विषय नाही; तो परस्परपूरकतेचा आहे. स्त्रीच्या संवेदनशीलतेमुळे नात्यांना उब मिळते, तिच्या प्रेमामुळे कुटुंब टिकते आणि तिच्या सहनशक्तीमुळे संकटांवर मात करता येते. गुण-दोषांसह तिचे व्यक्तिमत्त्व पूर्ण होते आणि हाच मानवी स्वभावाचा खरा अर्थ आहे.







