िवशेष : अश्विनी शिंदे
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की छान गुलाबी वेष्टनात गुंडाळलेलं प्रेम... कॅण्डल लाईट डिनर...नाही म्हटलंच तर कपल डान्स... असं छान छान काहीसं रोमांटिक डोळ्यांसमोर येतं. म्हणूनच विचार करत होते लेखाचं शीर्षक कसं दिलखेच लिहावं. काहीतरी हटके... जमतंय का नीट, काही ठाऊक नाही. पण असो जाऊ दे मला सांगायचं आहे ते दिलखेचक शीर्षकापेक्षा पण महत्त्वाचं आहे. कारण जे सांगायचं आहे ते आजच्या पिढीच्या जगण्याबद्दल. आज नव्याने विवाहबद्ध झालेली तरुण पिढी आजच्या वर्क कल्चरमुळे, आजूबाजूच्या सामाजिक – सांस्कृतिक प्रदूषणामुळे हळूहळू नात्यातील उत्कटता, संवाद हरवू लागते. त्यातून सोशल मीडियावर सतत झळकणारे काही जोडप्यांचे एन्जॉय करणारे फोटो, व्हीडिओ पाहून अरे आपल्यातलं प्रेम संपलंय की काय असं काही जण वाटूनही घेऊ लागतात, जे तितकसं खरंही नसतं. पण हे कळण्यासाठी आवश्यकता असते ती संयमाची. दिखावू प्रेमापेक्षा नात्यातील समजूतदारपणा आणि प्रगल्भता कोणत्याही नात्याची वीण अधिक घट्ट करीत असते. आजच्या तरुण जोडप्यांच्या नात्यातील ही तगमग,ओढाताण लेखक मयूर सरकाळे यांनी ‘मर्सिया’ या नाटकातून नेमकेपणाने पकडली आहे.
प्रायोगिक रंगभूमीवरील हे नाटक मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलं आहे. मर्सिया हा पर्शियन शब्द, ज्याचा अर्थ आहे शोकगीत. नाटकाच्या सुरुवातीपासून नाटकाचा स्वर शोकगीताचा असला तरी त्यात दोघांच्या नात्याचं एक मंजुळ भावगीत दडलेलं आहे, हे संपूर्ण नाटक पाहिल्यावर जाणवतं. मर्सिया नाटकात आजच्या पिढीच्या जगण्यातील मोडतोडीची, संघर्षाची, विसंवादाची, उद्वेगाची गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा जाणवलं की लेखकाने अतिशय खुबीने नाटकात एक अंतःस्थ स्वर गुंफला आहे, जो तीव्रतेने दिसून येत नाही पण संपूर्ण नाटकभर जाणवत राहतो; तो स्वर म्हणजे आजच्या काळातील ‘तो’ आणि ‘ती’मधील मायेच्या ओलाव्याचा. रूढ अर्थाने त्या दोघांमधील नात्यात प्रेम आहे असं म्हणण्यापेक्षा त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल काळजी आहे, माया आहे, जी त्या दोघांना कठिणात कठीण परिस्थितीत एकमेकांशी बांधून ठेवते.
चित्रा खानोलकर आणि बबन वाघमारे या दोन पात्रांभोवती नाटकाचे कथानक गुंफण्यात आले आहे. कॉर्पोरेट जगतातील ताणतणाव, होणारा त्रास असह्य झाल्याने बबनने नोकरीवर त्याच्याच शैलीत सांगायचं, तर लाथ मारलेली आहे. बायको चित्रा मॉन्टेसरी शाळेत शिक्षिका आहे आणि तिच्या कमाईवर आपलं घर चालत आहे, याबद्दल त्याच्या मनात खदखद आहे. या सगळ्या परिस्थितीतून जाताना तो ‘anxiety’च्या त्रासाला सामोरा जात आहे. वारंवार येणारे नैराश्याचे झटके दोघांच्या संसारात तणाव निर्माण करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्यातील नात्याचा कसही लावत आहे. स्वतःचे व्यक्तिगत ताणतणाव, नोकरीच्या ठिकाणचा संघर्ष आणि बाहेरच्या जगात वावरताना सतावणारा कोलाहल, शहरीकरणाच्या रेट्यात हरवलेली शांतता अशा अनेकविध गोष्टींनी बबन उद्विग्न आहे. थोडक्यात बबन हे आजच्या रेटारेटीच्या काळाचं अपत्य आहे, ज्यात त्याने जगण्याची शांतता गमावली आहे. बाहेरच्या जगातील अशांतता त्याच्या आतपर्यंत कधी येऊन पोहोचली हे त्याचं त्यालाही कळलेलं नाही आहे. उद्ध्वस्ततेच्या वाटेवर त्याच्याजवळ एकच दिलासा आहे आणि तो म्हणजे त्याची बायको चित्रा. या दोघांमधील नातं असं गुडीगुडी प्रेमाचं नाही आहे. बबन सतत त्याच्या मनातील राग चित्रावर ओकताना दिसतो किंबहुना एका वळणावर दोघांमधला संवादाचा पूलच डळमळीत झाला आहे, असे वाटू लागते. ती सुट्टी घेऊन एक दिवस घरी राहणार म्हटल्यावर त्याला प्रश्न पडतो, याने काय साध्य होणार आहे, आपण काय बोलणार आहोत. एकमेकांना एकमेकांच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या संवादापलीकडच्या सहवासाची ओढ त्यांच्या नात्यात राहिलेली नाही, इतका शुष्कपणा त्या दोघांच्या नात्यात निर्माण झाला आहे असे संवादातून, घटनाप्रसंगातून जाणवत राहते. पण नाटकाची ताकद इथेच आहे. नात्यातील विसंवाद, शुष्कता, नवरा-बायकोतील हरवलेला रोमान्स ही नात्यातील नकारात्मकता एकीकडे आणि नात्यात अंतःस्थ असणारा मायेचा ओलावा जो वेळप्रसंगी तितक्याच सहजतेने सावरण्याचे हात देत राहतो, जो निर्माण करण्यात लेखक – दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. जगाशी नातं तोडून राहणाऱ्या बबनची समुपदेशिका होऊन ती त्याला मोकळं करू पाहते. आपल्या नवऱ्याची नसती उठाठेव करणाऱ्या मिस्टर आणि मिसेस पावणे यांच्यावर ती प्रचंड चिडते, आपल्या नवऱ्याला हिणावलेले तिला सहन होत नाही. मानसिक संतुलन ढासळलेल्या बबनचा चित्रा हा एकमेव आधार आहे, जो त्याला कित्येकदा नकोही आहे, इतका तो उद्विग्न आहे.
बबनला सगळ्या ट्रौमामधून बाहेर काढू पाहणाऱ्या चित्राची देखील मनातल्या मनात एक तगमग आहे, आई होण्याची. बबनच्याही नकळत ती वारंवार डॉक्टरांना भेटत आहे, सोनोग्राफी करत आहे, शाळेतील लहान मुलांमध्ये ती स्वतःचा जीव रमवत आहे. पण समाजाच्या कुत्सित दृष्टिकोनामुळे तिचा मानसिक तोल ढासळतो आणि ‘स्क्रीझोफेनिया’ होऊन आभासी जगात ती वावरू लागते. तिला येणारे खूळखुळ्यांचे आवाज, पोटात आणि पाळण्यात बाळाचा होणारा भास अशा एका आभासी दुनियेत ती राहू लागते. हे दृश्य पाहिल्यावर वाटते की चित्रा आणि बबन दोघेही मानसिक रुग्ण झाले आहेत आणि नाटकाचा शेवट शोकांत आहे. पण नाटकाच्या शेवटच्या दृश्यात कुलूप उघडून फोर्मल कपडे घातलेला, बॅग हातात असलेला नीटनेटका बबन घरात येतो आणि भासमय जगातील चित्राच्या डोक्यावरून हात फिरवत आपल्या मांडीवर तिचं डोक ठेवतो आणि हेही चित्र कधीतरी बदलेलं, चित्राच्या आजारावर काही ना काही औषध सापडेल अशी आशा व्यक्त करतो.
हे दृश्य डोळ्यांसमोर येताच क्षणी प्रेक्षक धाडकन जागा होतो. नाटकाच्या सुरुवातीपासून मानसिक संतुलन ढासळलेला, सतत वर्क कल्चरवर ताशेरे ओढणारा बबन पुन्हा कधी ऑफिसची पायरी चढेल असं वाटतही नसतं. पण चित्रासाठी तो धैर्याने उभा राहतो, ऑफिसला जाऊ लागतो आणि वाटतं प्रेम म्हणजे तरी अजून वेगळं काय आहे.... आपली व्यथा बाजूला सारून आपल्या जोडीदारासोबत ठामपणे उभं राहणं म्हणजेच तर प्रेम. मग ते रोजच्या वागण्यात, बोलण्यात सर्वच जोडप्यांच्या बाबतीत लक्षणीय पद्धतीने व्यक्त होत नसेलही पण अंतःस्थ प्रवाहाप्रमाणे पाझरत नात्याची ओल टिकवून ठेवत असेल. मर्सिया पाहिल्यावर जाणवतं की हे शोकगीत असल्याने यात उचंबळून येणारी आनंदाची लहर नाही आहे पण नातं टिकवून ठेवण्याची जिगीषा मात्र आहे, जी या शोकगीताला सुखान्तिकेकडे नेत नाही पण नैराश्य झटकून आशेचा किरण देऊन जाते. आजच्या पिढीचं प्रेम म्हणजे निव्वळ उथळ, वरवरचं, अविचारी अशी सरसकट टीका केली जाते. पण परिस्थिती वाटते तितकी वाईट नाही, आजच्या पिढीच प्रेम फारसं उत्स्फूर्त नसेल पण आश्वासक आहे हे प्रभावीपणे सांगणाऱ्या लेखक मयूर सरकाळे आणि दिग्दर्शक मंगेश सातपुते याचं विशेष अभिनंदन !
अभिनेता विकास पाटील आणि अभिनेत्री पूर्वा कौशिक या दोघांनीही अतिशय ताकदीने व ऊर्जेने मध्यवर्ती भूमिका वठवल्या आहेत. नाटकाचं पार्श्वसंगीत आशयाला अनुरूप असा परिमाण साधणार आहे. विशेषत्वाने खुळखुळ्याचा आवाज. एरव्ही लहान मूल असलेल्या घरात खुळखुळा वाजतो तेव्हा ते घर आनंदाने हसणारं वाटतं. पण या नाटकात चित्राची वेदना व्यक्त करण्यासाठी वाजणारा काहीसा कर्कश खुळखुळा तिचं दु:ख अजूनच गडद करतो. आशयाला अनुरूप नेपथ्यरचना, पार्श्वसंगीत, नाटकाचा ताण हलका करण्यासाठी आणि कुत्सित शेरे मारणाऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिस्टर आणि मिसेस पावणे यांची केलेली पात्रयोजना, नाटकाच्या आतल्या स्वराशी सायुज्य साधणारी प्रकाशयोजना यामुळे मर्सिया शोकगीत असलं तरी कुठेही रटाळ न होता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं.







