माणूस जन्म म्हणजे पाण्याचा बुडबुडा. जन्म-मृत्यूच्या शृंखलेतून मानवाला जावेच लागते. आयुष्य जगताना रोज धावपळ, धडपड, राबराब राबणे, थांबा नाहीच आणि तो स्टॉप कधीतरी अचानक लागतो. एक दिवस असा येतो की सगळ्यांनाच जावे लागते. श्वास थांबतो, काम थांबतं आणि नावही. ते म्हणजे मरण. जीवन जगता जगता सतत आपण काही ना काही करत असतो. आजचा दिवस, आजची वेळ पुन्हा नाही. हा जन्म पुन्हा नाही म्हणून जबाबदाऱ्या, कर्तव्य, भूमिका यातून आपापले कार्य करीतच असतो. कोणत्या ना कोणत्या कामात स्वत:ला झोकून घेतो. एखाद्या वळणावर वळत असतो, परिस्थितीशी झगडत असतो. कधी ना कधी पावलोनपावले, मैलोनमैल प्रवास करीतच असतो. प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतो. सतत प्रयत्न. सातत्य, काबाडकष्ट यातून कधी-कधी उद्योगशील प्रवृत्तीने समस्येवर मातही करत असतो. माणसाचं मन खूप चंचल आहे. ते स्थिर नाही. आज हे, तर उद्या ते, परवा भलतेच असेच झाले आहे आणि हे संपलं की, आयुष्य काळ हा कोणासाठी थांबत नाही. कधीच थांबत नाही. प्रत्येकाचा अंत हा येणारच आहे, हे आपण लक्षात ठेवत नाही. आराम हा शब्द आपल्या डिक्शनरीत कधीच नसतो. आयुष्यभर धाव धाव धावतो, स्वतःसाठी जगत नाही. आपल्या कुटुंबासाठी जगत नाही. काही माणसं जन्माला येतात नि जातात. त्यांच्या आयुष्यात फार काही घडत नाही. पण काही माणसं अजरामर होऊन जातात. कधी एखादी गोष्ट आपल्या हातातून अचानक निसटून जाते, तेव्हा त्या माणसाचं मोल आणि महत्त्व कळत नसतं. किंमत कळत नसते, पण जेव्हा तो माणूस समोर नसतो तेव्हा मात्र आठवण काढूनही काहीच उपयोग नसतो. त्याचा प्रवास तिथेच थांबलेला असतो. ना आपली हाक त्यांना ऐकू जात, ना त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत. आपण त्याला काळानं घाला घातला असं म्हणतो किंवा नियतीने डाव साधला. म्हणजे त्या त्या क्षणाला जे घडते ते काही विपरीतच असते. जन्म झाला आहे मृत्यू हा येणारच. मृत्यू हे अंतिम सत्य, अटळ आहे. ते कोणाला चुकले नाही. हे सगळं माहीत असून सुद्धा मृत्यू कधी येणार हे मात्र माहीत नसतं. तो कशा प्रकारे येईल हे सुद्धा कोणालाच माहीत नसतं. याची शाश्वतीच नसते. कारण जीवन हे क्षणभंगुर आहे. कुठल्या थांब्यावर आपण थांबणार आहोत. हे कोणालाच ठाऊक नसते. हा नियतीचा घाला असतो. त्याचा विचार करता येणार नाही. म्हणून सुन्न करणारी घटना जेव्हा घडते तेव्हा तिथे कोणाचंच काही चालत नाही. मृत्यूचेही स्मरण असायला हवे. आज जेव्हा आपण पाहतो की खरी गरज आहे ती डोळे उघडण्याची. प्रत्येक गोष्ट आपल्याला क्षणोक्षणी जीवन जगायला लावत असते. आपल्याशी ती निगडित असते. कोण येतो, कोण जातो, कोणाचा जन्म होतो, तर कोणाचा मृत्यू होतो. जन्म-मृत्यू या मधील काळाला आयुष्य म्हणतात. ते आपण कशाप्रकारे जगतो, व्यतीत करतो हे आपल्या हातात आहे. यासाठी मृत्यूचेही स्मरण असावे लागते. काही जण त्यांच्या कार्याने अजरामर होतात. काहीजण ज्ञान, छंद, प्रतिभा, शब्द सूर कलांतून अजरामर राहतात. समाजसेवेतून कायम स्मरणात राहतात. माणुसकीतून अजरामर राहतात. त्यातून त्यांनी निर्मिलेल्या सर्जनशील, सृजनात्मक व्यक्तिमत्त्वातून कायमच स्ममरणात राहतात. जन्माला येऊन जीवन सार्थकी लागलं पाहिजे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या ऊक्तीप्रमाणे. जनसामान्यांची, रंजल्या गांजलेल्यांची, गोरगरिबांची, लेकरा-बाळांची, मानवतेची आणि निसर्गाची सेवा केली पाहिजे. आयुष्यभर खूप यातना आपण भोगल्या त्या विसरून आपण जेव्हा इतरांसाठी झिजतो यालाच तर जीवन म्हणतात. आपल्या यातना सोडून दुसऱ्यासाठी जगणं फार मोठं मन लागतं. हा जन्म पुन्हा नाही. मृत्यूचा काही नेम नाही. जीवन जगणे हाच नियम आहे. संतश्रेष्ठ बहिणाबाई म्हणतात, जगणं मरणं एका सासाचं अंतर. आला सास, गेला सास, जिवा तुझं रे तंतर... याला जीवन ऐसे नाव. आजचा दिवस उद्या नाही. हा मानवाचा जन्म पुन्हा नाही. जगून घे सोडून मीपणा, अहंकार गर्व , उणी-धुणी, भांडणं. अहंकार. फक्त माणसासारखा राहा माणसासाठी. क्षणार्धात आपल्या हाती काही उरत नाही. आपल्या हातात काहीच नसतं ही ओंजळ रिती असते. बरोबर जाताना कोणी काहीच घेऊन जात नाही. पण आहे तोवर माणसाने कसं जगलं पाहिजे? एका क्षणात सगळा खेळ खतम होतो. म्हणून माणसांनी सत्कार्यानी अजरामर होऊया. जायचं तर आहेच प्रत्येकाला, पण इतरांच्या हृदयात स्थान निर्माण करूयात. आणि आपले तत्त्व, मूल्य, कार्य, निष्ठा जपूयात. आनंद पेरूया. प्रकाश पेरूया. जगा आणि जगू द्या. कोणी काही केले तरी कायमचा अमर पट्टा घेऊन, अजरामर होऊन कोणी आलेला नाही. इथे प्रत्येकाची जायची वेळ नियतीने सटवीणे लिहिलेली एक वेळ असते. मृत्यू अटळ आहे. याचे स्मरण असू द्या. क्षणभरात ते संपत असतं. तोवर तरी एकमेकांना जपा. वेळ द्या. नीट वागा. एकमेकांचा आदर करा. सन्मान करा. आनंद द्या आणि आनंद घ्या. कारण हा जन्म पुन्हा नाही. हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा...






