Friday, January 23, 2026

बदलापूरमध्ये शाळेच्या बस चालकाकडून चिमुकलीवर अत्याचार

बदलापूरमध्ये शाळेच्या बस चालकाकडून चिमुकलीवर अत्याचार

बदलापूर : बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मिनी बस चालकाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्राप्त माहितीनुसार, बदलापूर पश्चिम भागात ही घटना घडली. संबंधित चिमुकलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापुरात अशाच स्वरूपाच्या घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

दरम्यान, बदलापूरच्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “खासगी शाळेच्या बस चालकाने केलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आरोपीवर तात्काळ कारवाई करण्यात आली असून पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी पोलीस योग्य ती कठोर पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.” या घटनेनंतर पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, शाळा वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment