प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ
हल्ली तसंही रात्री उशिरापर्यंत कोणाला झोप येत नाही. त्यातही वृद्ध असतील तर झोप जवळपासच फिरकत नाही अशी परिस्थिती आहे. एके दिवशी साधारण ऐंशीच्या आसपासचे वय असलेल्या एक वृद्ध महिला आपल्या पलंगावर झोपलेल्या होत्या जिथून त्यांना खिडकीबाहेरचे दृश्य दिसत होते. त्यांचे पती आढ्याकडे नजर लावून झोप येण्याची वाट पाहत होते. त्यांचेही वय पंच्याऐंशीच्या आसपासचे होते. त्या वृद्ध महिला आपल्या पतीला म्हणाल्या, “ऐकलंत का हो, मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि वाटलं की गॅरेजचे लाईट चालू आहे. गॅरेजचे लाईट बंद कराल का?”
वृद्ध गृहस्थ खूपच थकलेले होते तरीही ते कसेतरी उठले आणि त्यांनी खिडकीतून बाहेर बघितले तेव्हा त्यांना जे दृश्य दिसले त्यांनी ते हादरून गेले. त्यांनी आपल्या पत्नीला हळू आवाजात सांगितले की पाच-सहा चोर गॅरेजचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांच्याकडे जवळच्या पोलीस स्टेशनमधून काही पोलीस त्यांची माहिती घेण्यासाठी येत असत. आल्यावर कसे आहात, काही गरज आहे का वगैरे विचारून त्यांची सही घेऊन त्यांच्याबरोबर फोटो काढून जायचे. काही लागले तर त्वरित पोलीस स्टेशनला फोन करा असेही सांगायला विसरायचे नाहीत. पोलिसांनी दिलेले कार्ड त्यांनी समोरच ठेवलेले होते. ताबडतोब त्या जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला. माझे वय पंच्याऐंशी आहे. कृपया पत्ता लिहून घ्या. आम्ही दोघंच म्हातारी माणसं घरात आहोत. सध्या पाच-सहा चोर आमच्या गॅरेजचा दरवाजा तोडत आहेत. लवकरात लवकर आमच्या मदतीला या.” पोलिसाने सगळे ऐकून घेतले आणि म्हणाले,
“तुमचा पत्ता, फोन नंबर आणि समस्या लिहून घेतली आहे. सध्या आमच्याकडे कोणीही माणूस रिकामा नाही. जेव्हा वेळ होईल तेव्हा आम्ही नक्की तुमच्या मदतीला येतो.” तेव्हा त्याला पाठवतो.” हे ऐकून वृद्ध दाम्पत्य घाबरले कारण गॅरेजचे कुलूप तोडल्यानंतर ते कदाचित मध्यरात्रीपर्यंत घरातही येऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या वृद्ध दांपत्याने आपसात चर्चा केली आणि परत पोलीस ठाण्यात फोन केला. वैतागून तिकडून आवाज आला, “ एकदा सांगून कळत नाही का परत परत फोन करताय?”
वृद्ध गृहस्थ म्हणाले, महत्त्वाचं सांगायला फोन केला आहे, की आता तुम्ही कोणालाही पाठवू नका कारण मी त्या चार चोरांना गोळ्या घालून मारून टाकलं आहे. हे ऐकून पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. पाच मिनिटांतच चार-पाच पोलीस, एक डॉक्टर आणि दोन अॅम्ब्युलन्स त्या वृद्ध दांपत्यांच्या घरी पोहोचले. आधी ते गॅरेजकडे धावले आणि त्यामुळे सर्व चोर पकडले गेले. नंतर पोलीस अधिकाऱ्याने त्या वृद्ध दांपत्यांचे दार ठोठावले. त्यांनी दार उघडताच त्या वृद्धाचा हात अधिकाऱ्याने घट्ट धरून ठेवला. जणू काही तो पळूनच जाणार होता आणि त्याला विचारले, “तू ज्या चोरांना मारले आहेस ते कुठे दिसले नाहीत?” तो वृद्ध गृहस्थ शांतपणे म्हणाला, “आणि तुम्हीही म्हणालात ना की तुमच्याकडे एकही पोलीस तुमच्या मदतीसाठी उपलब्ध नाही... मग आता कसे पोहोचलात?”
आता ही वरची कथा तुम्हाला कदाचित एखादी ‘विनोदी कथा’ वाटू शकते; परंतु माणसे खोटे का बोलतात? खोटे बोलल्याने कधी कधी कसा फायदा होतो हे आपण या कथेतून निश्चितपणे पाहू शकता! अलीकडे आपण पाहतो की, कोणालाच कोणासाठी वेळ नसतो. अशा वेळेस गरज पडली तर आपल्याला पोलीस, डॉक्टर, अॅम्ब्युलन्स इ. सेवा उपलब्ध असल्याची बतावणी केली जाते; परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्यापर्यंत अशा सुविधा पोहोचतच नाहीत. मग कधी एखादी घटना बढा चढाकर सांगून किंवा खोटेही सांगून आपल्याला मदत मिळवावी लागते. वेळ कोणावरही सांगून येत नाही आणि जेव्हा वेळ येते तेव्हा काय करायचे हे सुचत नाही. कमीत कमी वरील कथेतील वृद्धाने उत्तम असे डोके चालवून आपली वाईट परिस्थितीतून सुटका करून घेतली.
ही जरी वृद्धांची कथा असेल तरीसुद्धा तरुण माणसंसुद्धा अशा परिस्थितीत नेमकं काय करू शकतात म्हणा? आपल्याला ‘सावध राहा’ म्हटले जाते. सावध राहायचे म्हणजे काय करायचे हे मात्र कळत नाही. आपल्या शेजारीपाजारी राहणारी माणसेसुद्धा आपल्यासारख्याच परिस्थितीतून जात असतात त्यामुळे त्यांची आपल्याला मदत होण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशा वेळेस काय करायचे?
आणखी एक छोटेसे उदाहरण देते - एके दिवशी रात्री ३ वाजता मला पाण्याचा आवाज आला. उठून बघते तर आपल्या बाथरूममधला एक पाइप अचानक फुटला होता आणि पाणी जोरात वाहत अख्खे घर पाण्यात बुडले होते. पाण्याच्या पाइपचे तोंड मला काही केल्या बंद करता येईना आणि मी घरात एकटीच होते. अशा वेळेस माझ्या मोबाईलमधून मी सोसायटीच्या सिक्युरिटीला फोन केला तर तो येताना सहा सिक्युरिटी गार्ड घेऊन आला आणि काही मिनिटांच्या आत त्याने पाइपचे तोंड बंद केले. त्यानंतरचा फाफटपसारा मी तुम्हाला सांगत नाही; परंतु घरात आपल्याला ठळक अक्षरात दिसतील अशा रीतीने डॉक्टर, अॅम्ब्युलन्स, पोलीस, गॅस मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, डे अॅण्ड नाईट मेडिकल स्टोअर, घराजवळ राहणाऱ्या कामवाल्या, शेजारपाजारी राहणारी माणसे, नातेवाईक, सोसायटीचा सिक्युरिटी इ. फोन नंबर लिहून ठेवायला हवेत. घाबरल्याने विस्मरण होते त्यामुळे जर हे सगळे फोन नंबर डोळ्यांसमोर असतील तर कमीत कमी आपण फोन करून त्यांना कोणत्याही गोष्टीची मदत मागू शकतो!






