Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

हुशारी

हुशारी

कथा : रमेश तांबे

शिक्षणाचा अधिकार या नियमाखाली शहरातल्या मोठमोठ्या इंटरनॅशनल शाळांमध्ये काही जागा गरीब विद्यार्थ्यांनादेखील मिळाल्या पाहिजेत, असा नवा सरकारी आदेश आला. अगदी त्याच योजनेखाली “कुमार विजय सोनवणे” या मुलाला “सूर्या इंटरनॅशनल” या प्रतिष्ठित शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात प्रवेश मिळाला. विजय हुशार होता, चुणचुणीत होता. पण गरीब होता. त्यामुळे वर्गातल्या इतर मुलांपेक्षा त्याचं राहणीमान साधं होतं. पण अभ्यासात विजय सरस होता. प्रश्न फक्त इंग्रजीचा होता.

इतर मुलांचे इंग्रजी उत्तम होतं. बहुसंख्य मुले मराठी भाषिकच होती. पण सगळ्यांच्या घरात इंग्रजी बोललं जायचं. त्यामुळे सगळी मुलं सराईतपणे इंग्रजी बोलत. उलट विजय गरीब कुटुंबातला. आई घरकाम, तर बाबा भाजी विकण्याचा व्यवसाय करत. त्यामुळे घरात शिक्षणाचं प्रमाण तसं कमीच. तरी स्वतःच्या हिमतीवर विजय अभ्यास करायचा. तोडकं मोडकं इंग्रजी बोलायचा. पण त्याची मराठी अतिशय चांगली होती. त्याचं मराठी लेखन अन् बोलणं मात्र खूपच उत्तम होतं. याच मराठीच्या जोरावर त्याने पाहुण्यांची वाहवा मिळवली.

एकदा काय झालं, “मराठी भाषा दिनानिमित्त” शाळेत मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कवी-लेखक चिंतामणराव पाटील यांना आमंत्रित केलं होतं. बरोबर १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. ग्रंथदिंडी, लेझीम, ढोल-ताशांच्या आवाजात मिरवणूक काढली गेली. त्यामुळे सगळे वातावरण अगदी मराठीमय, सात्त्विक आणि मंगलमय झाले होते. सर्वजण सभागृहात जमले. व्यासपीठावर मान्यवर लेखक, मुख्याध्यापक, शाळेचे विश्वस्त अशी दिग्गज मंडळी बसली होती. मग दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीत, प्रार्थना झाल्या. नंतर मराठी भाषा दिनानिमित्त सहा मुलांची भाषणे होती त्यात सहावा आपला विजय! खरे तर विजयला संधी देण्याच्या विरोधात होते मुख्याध्यापक. कारण अशा गरीब घरातल्या मुलांना वागण्या-बोलण्याची शिस्त नसते. उगाच शाळेचे नाव खराब होईल असे त्यांना वाटत होते. पण विजयच्या वर्गशिक्षकांनी खूपच आग्रह धरला म्हणून विजयचे नाव घेतले गेले. मग एक एक मुलगा मराठी भाषेबद्दल बोलू लागला. पण कुणालाही मराठी व्यवस्थित बोलता येत नव्हती. अनेकांचे उच्चार चुकीचे होते. बोलताना अनेकदा अडखळत बोलत होते. दोघांनी तर मराठी भाषेची महती सांगण्यासाठी इंग्रजीचाच आधार घेतला. अशा या तोडक्यामोडक्या मराठी भाषणांचे सगळ्यांना केवढं कौतुक वाटत होतं.

शेवटी “विजय सोनवणे” असे नाव पुकारले गेले. विजय मोठ्या आत्मविश्वासाने व्यासपीठावर गेला. जाताना व्यासपीठाला वाकून नमस्कार केला. ही गोष्ट पाहुण्यांच्या नजरेतून सुटली नाही. मग पुढे दहा मिनिटे विजय अस्खलित मराठीत बोलत होता. संत साहित्यापासून आजच्या आधुनिक मराठीपर्यंतचा त्याने आढावा घेतला. खणखणीत आणि सुस्पष्ट असा आवाज, विषयाची पूर्ण माहिती, भाषणात कवितांची रेलचेल, शेवटी आपणच जगवणार आपली भाषा असं म्हणून त्याने निरोप घेतला. पण टाळ्यांचा गजर झालाच नाही. कारण विजयचे एवढे शुद्ध मराठी अनेकांच्या पचनी पडलेच नाही. सारा शिक्षक वर्गदेखील अचंबित झाला होता. मग पाहुणे स्वतःच उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तेव्हा कुठे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. विजयचे वर्गशिक्षक मात्र रुमालाने आपले डोळे पुसत होते. अगदी तेव्हाच विजयने त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला.

मग पाहुणे बोलायला उठले. ते पहिली पाच मिनिटे विजयच्या भाषणाबद्दलच बोलले. विजयचे बोलणे, त्याचे उच्चार, त्याचा अभ्यास, त्याचा जोश या साऱ्या गुणांचे पाहुण्यांनी गुणगान केले. विजय सारखे विद्यार्थीच आपल्या मराठी भाषेला जिवंत ठेवतील असे म्हणून त्यांनी विजयला व्यासपीठावर बोलावले. आपल्याला दिलेली शाल त्याच्या पाठीवर पांघरली. पुष्पगुच्छ आणि स्वतःचे एक पुस्तक देऊन त्याचा सत्कार केला. सारी शाळा अवाक् होऊन विजयकडे बघत होती. तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती, ती म्हणजे गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. मुख्य म्हणजे ज्याला इंग्रजी येतं तोच हुशार असेदेखील नाही. अनेक क्षेत्र अशी आहेत जिथे आपण सर्वोत्तम बनू शकतो. असा नवा विचार घेऊन मुलं आपापल्या घरी गेली.

Comments
Add Comment