कुंभारवाड्यासह सर्व कुटीर उद्योगांना पाच वर्षे असेल कर माफ
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला धारावीकरांना शब्द
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावी विकास प्रकल्प होणारच, धारावीकरांना घर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे निक्षून सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीतील इमारती या इतर गृहनिर्माण सोसायट्यांपेक्षा वेगळ्या असतील आणि धारावीचा विकास झाल्यानंतर येथील कुटीर उद्योगांना पुढील पाच वर्षे कोणत्याही प्रकारच्या कराची आकारणी केली जाणार नाही, त्यांचे सर्व टॅक्स माफ केले जाईल असा शब्दच राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी धारावीतील जनतेला दिला.
धारावीतील प्रभाग क्रमांक १८५चे उमेदवार रवी राजा यांच्यासह इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी धारावीत आले होते. यावेळी धारावीत त्यांचे जंगी स्वागत झाले. धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील प्रचार फेरीमध्ये सहभागी होत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना, या धारावीचा उल्लेख दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी करायचे. परंतु त्यांना आजवर जो विकास करता आलेला नाही तो विकास आम्ही करत आहोत,असे सांगितले. धारावीतील पात्र कुटुंबांना कुठेही बाहेर पाठवले जाणार नाही, तर त्यांचे पुनवर्सन धारावीतच केले जाणार असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभारवाडा तसेच चामडा बाजारांसह इतर जे कुटीर उद्योग करतात, त्यांचेही पुनवर्सन धारावीतच केले जाणार आहे. धारावीचा विकास केल्यानंतर कुंभारवाड्यासह इतर कुटीर उद्योगांना पुढील पाच वर्षे सर्व प्रकारचे कर माफ केला जाईल. त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. एवढेच नाही, तर अपात्र कुटुंबांनाही आम्ही घरे देणार असून त्यासाठी हा विशेष प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. अपात्र कुटुंबांना घर न दिल्यास ते कुठे तरी दुसरीकडे झोपडी बांधून राहतील. त्यांना पुन्हा झोपडीत न पाठवता त्यांनाही घरे दिली जाणार आहे,असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले
धारावी विकास प्रकल्प हा कोणत्याही विकासाला दिलेला नसून हा प्रकल्प सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा आहे. सरकार आणि एसआरए यात हिस्सेदार आहे. विकासकाला कोणताही स्कोपच ठेवलेला नाही. त्यामुळे धारावीतील जनतेला घर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि या प्रकल्पाचे भूमिपुजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल,असे आश्वास्त केले.
महापलिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार
सत्ताधाऱ्यांना मागील २५ वर्षांत धारावीचा विकास करता आलेला नाही. आपल्या जीवावर ते महापालिकेत निवडून गेले. परंतु २५ वर्षांत विकास करण्याऐवजी भ्रष्टाचार आणि घोटाळे केले. तब्बल ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी केला .रस्ते, नाले, कोविड, खिचडी, बॉडी बॅग, पीपीई किट, ऑक्सिजन प्लांट, कोविड सेंटर, पत्रा चाळ आदी घोटाळे करत त्यांनी भ्रष्टाचार केले. हे घोटाळे करतानाच त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वातही घोटाळा केला अशी टिका फडणवीस यांनी उबाठावर केली.






