भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी
मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी बीसीसीआयला वैभव सूर्यवंशी या तरुण प्रतिभेला लवकरात लवकर वरिष्ठ संघात स्थान देण्याची जोरदार मागणी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या करिअरचे उदाहरण देत श्रीकांत यांनी सांगितले की, सचिनने अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते व वैभवलाही त्याच प्रकारे संधी देण्याची वेळ आली आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असली तरी श्रीकांत यांचे मत आहे की, निवडकर्ते आता तरी वैभवच्या कामगिरीकडे गांभीर्याने लक्ष देऊ शकतात व त्याला विश्वचषक संघात समाविष्ट करण्याचा विचार करू शकतात. ते म्हणाले, या तरुण खेळाडूला संधी देणे शक्य आहे. वैभव सूर्यवंशीने वयोगट क्रिकेट तसेच स्थानिक स्पर्धांमध्ये अतिशय जलद प्रगती केली आहे. त्याचे तंत्रज्ञान आणि धावांसाठी असलेली तळमळ इतरांपेक्षा वेगळे आहे, असे श्रीकांत यांचे निरीक्षण आहे. वैभवने वरिष्ठ खेळाडूंसमोरही क्षमता सिद्ध केली असून तो उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये सहज जुळवून घेऊ शकतो.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व करताना वैभवने इतिहास रचला. पहिल्याच लिस्ट ए सामन्यात त्याने फक्त ८४ चेंडूंमध्ये १९० धावा फटकावल्या आणि अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावले. तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. श्रीकांत यांना वैभवच्या सातत्यपूर्ण कामगिरीने विशेष प्रभावित केले आहे.
प्रतीक्षा न करता संधी देण्याची गरज : श्रीकांत पुढे म्हणाले, मी गेल्या वर्षीच सांगितले होते की त्याला टी-२० विश्वचषकासाठी संधी द्यावी. आता बराच उशीर झाला असेल, तरीही निवडकर्ते त्याला संघात घेऊ शकतात. या मुलामध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि त्याला लवकरात लवकर भारतीय संघात आणले पाहिजे. लोक त्याला आणखी वेळ द्या, आणखी खेळू द्या असे म्हणतात, पण सचिन तेंडुलकरनेही लहान वयातच पदार्पण केले होते, याकडे लक्ष वेधत श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, क्रिकेटमध्ये वैभवसाठीही असाच मार्ग अवलंबता येईल. प्रत्येक स्तरावर शतके करणाऱ्या या तरुणाला आता प्रतीक्षा न करता संधी देण्याची गरज आहे.






