Saturday, December 27, 2025

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक

जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल

मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते. मात्र येत्या शनिवार–रविवारच्या ब्लॉकमुळे मुंबईकरांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी (दि. २७) रोजी तब्बल ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी (दि. २८) रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कांदिवली–बोरिवलीदरम्यान पायाभूत कामे सुरू असून यासाठी २० डिसेंबरपासून पुढील ३० दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारी २०२६ पर्यंत असणार आहे. या कालावधीत शुक्रवार, दि. २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अप व डाऊन मार्गिका बंद राहणार आहेत.

या ब्लॉकदरम्यान कांदिवली ते दहिसरदरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेवरील अप, डाऊन, जलद व धीम्या अशा सुमारे ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या १४ लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंतच चालवण्यात येतील. तसेच अंधेरीहून सुटणाऱ्या काही लोकल सेवा फक्त गोरेगावपर्यंतच धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे १,४०६ लोकल फेऱ्या चालतात. त्यापैकी ब्लॉक काळात सुमारे २० टक्के फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. नववर्षानिमित्त बाहेरगावी जाणारे प्रवासी आणि मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्यांनाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी ११.५ ते दुपारी ३.४५ या वेळेत जलद लोकल सेवांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाण्याहून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या सर्व स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर सीएसएमटी–चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेल तसेच वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या आणि त्या दिशेने येणाऱ्या अनेक लोकल सेवा रद्द राहतील. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्था व वेळापत्रक लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांसाठी दिलासा आणि पर्यायी व्यवस्था

  •  विशेष लोकल: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवल्या जातील.
  • प्रवासाची मुभा: हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्रशासनाचे आवाहन : पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी हे ब्लॉक अत्यंत आवश्यक आहेत. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा