मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
मुंबई : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने त्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू करू. जर ते परत येणारच नसतील तर आम्ही ही याचिका का ऐकावी?, यातून काय साध्य होईल?, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली.
केंद्र सरकारच्यावतीनंही हीच भूमिका मांडत विजय मल्ल्याने भारतात परत येऊन चर्चा करावी, त्यांचा काय दावा आहे?, ते कुठलं कर्ज मान्य करतात, कुठलं नाही?, ते कधी आणि कसे पैसे परत करणार?, आम्ही त्यांचं म्हणणे ऐकून घेण्यास तयार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले.
विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात सांगितले. त्यावर, आर्थिक घोटाळा करून परदेशात पसार झालेल्यांनी तिथं बसून याचिका करू नये. आधी भारतात कधी येणार ते सांगा?, मग आम्ही त्यांची याचिका ऐकू, असे स्पष्ट करत समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती दिली जाणार नाही. तसेच तुमची याचिका फेटाळून लावत आम्ही तुम्हाला ही अखेरची संधी देत आहोत, असे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले.
भारतीय बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याला ब्रिटनहून भारतात परत आणण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्याने या कायदेशीर प्रक्रियेचा ब्रिटनमधील कोर्टात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी केंद्र सरकारतर्फे न्यायालयाकडे केली. १८ फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीत फरार मल्ल्या भारतात परत कधी येणार?याची माहिती त्यांच्या वकिलांना सादर करण्याचे निर्देश जारी केले.






