Monday, December 22, 2025

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकारला परिस्थिती नियंत्रणात ठेवणे जमत नसल्याचे चित्र आहे. जून २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये हिंसा सुरू झाली आणि निवडून आलेल्या पंतप्रधान शेख हसिना यांना स्व - संरक्षणासाठी देश सोडावा लागला. सध्या शेख हसिना भारतात सुरक्षित आहेत. पण त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर सत्तेत आलेल्या युनूस यांना देशात कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसल्याचे चित्र आहे.

भारताचा काही भाग तोडून बांगलादेशशी जोडण्याची भाषा करणाऱ्या शरीफ उस्मान हादीची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. हादीवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. बांगलादेशमध्ये काही दिवस उपचार झाले तरी हादीच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर त्याला सिंगापूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मोहम्मद मोतालेब शिकदार या ४२ वर्षांच्या युवा नेत्याची हत्या झाली. मोहम्मद मोतालेब शिकदारवर अज्ञातांनी गोळीबार केला.

काही दिवसांपूर्वी ठार झालेला शरीफ उस्मान हादी बांगलादेशच्या नॅशनल सिटिझन्स पार्टीचा प्रमुख युवा नेता होता. तर आता ठार झालेला मोहम्मद मोतालेब शिकदार हा नॅशनल सिटिझन्स पार्टीशी संलग्न कामगार संघटनेचा वरिष्ठ नेता होता.

बांगलादेशची पोलीस यंत्रणा शरीफ उस्मान हादी आणि मोहम्मद मोतालेब शिकदार या दोन्ही यवा नेत्यांच्या हत्येचा तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. यामुळे हादी आणि शिकदारचे समर्थक नाराज आहेत.

भारताचा हत्येशी संबंध नाही

हादीच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा संशय बांगलादेशमध्येच काही जण व्यक्त करत होते. पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत पत्रक काढून हादीच्या हत्येचा निषेध केला आणि भारताचा या हत्येशी संबंध नसल्याचे जाहीर केले. अद्याप बांगलादेश पोलिसांनी हादीच्या हत्येप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.

Comments
Add Comment