सुरेश वांदिले
भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मुकाभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४०० कलावंतांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे. योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करावा लागतो. अर्जाचा नमुना संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या प्रत्येक कलावंतास दोन वर्षांसाठी दरमहा ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. याद्वारे त्याने आपल्या दैनंदिन गरजा, पुस्तक खरेदी, प्रवास खर्च, इतर साहित्य, प्रशिक्षण शुल्क आदी भागवावेत अशी अपेक्षा आहे.
शिष्यवृत्तीचे विषय
पुढील कलाप्रकारांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो -
(अ) सुगम शास्त्रीय संगीत - (१) ठुमरी, (२) दादरा, (३) टप्पा, (४) कव्वाली, (५) गझल, (६) कर्नाटकी शैलीवर आधारित सुगम संगीत, (८) रवींद्र संगीत, (९) नझरुल गिती, (१०) अतुलप्रसाद
(ब) लोककला - (१) लोकनृत्य, (२) लोकसंगीत, (३) लोकगीत, (४) लोकरंगमंच, (५) पारंपरिक आणि देशी कला, (६) कठपुतळी
(क) दृष्यकला- (१) शिल्पकला, (२) चित्रकला, (३) सर्जनशील छायाचित्रणकला, (५) मातीकला, (६) ग्राफिक्स.
(ड) रंगमंच - (१) दिग्दर्शन, (२) अभिनय. (इ) भारतीय शास्त्रीय नृत्य - (१) भरतनाट्यम, (२) कथ्थक, (३) कुचिपुडी, (४) कथकली, (५) मोहिनीअट्टम, (६) ओडिसी/नृत्य आणि संगीत, (७) मनिपुरी/नृत्य आणि संगीत, (८) थांगता, (९) छाऊ /नृत्य आणि संगीत, (१०) सत्रीया नृत्य, (११) गौदिया नृत्य.
(ई) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत- कंठ आणि वाद्य.
(फ) कर्नाटकी शास्त्रीय संगीत-कंठ आणि वाद्य
विस्तृत यादी :
(१) बाहुली नाट्य (Puppet Theatre)
(१) सावलीच्या बाहुल्या (Shadow Puppets) -रावणछाया – ओडिशा, चामड्याच्या बाहुल्या – महाराष्ट्र, थोल पावाकूथू – केरळ, थोलू बोम्मलाट्टम – तामिळनाडू, थोलू बोम्मलाट्टम – आंध्र प्रदेश, तोलागु गोम्बे अट्टा – कर्नाटक. (२) काठी किंवा दोरीच्या बाहुल्या (Rod/String Puppets)- पुतुलनाच – पश्चिम बंगाल, कठपुतली – राजस्थान, गोम्बेअट्टा – कर्नाटक, पावाकुथू – केरळ, बोम्मलाट्टम – तामिळनाडू, सखी- कुंधी – ओडिशा, काळसूत्री बाहुल्या – महाराष्ट्र, चादर-बदर – बिहार.
(३) हातमोज्यांच्या बाहुल्या (Glove Puppets)- गुलाबो-सिताबो – उत्तर प्रदेश, पावा कथकली – केरळ
(२) पारंपरिक रंगभूमी (Traditional Theatre)
(३) भक्ती संगीत (Devotional Music)- हरिकथा किंवा कथाकलाक्षेपम्, थेवरम्, तिरुपुगळ, कवडिचिंदू, महाराष्ट्रातील भजन आणि अभंग, विविध धार्मिक पंथांची गीते, संकीर्तन – मणिपूर, बाऊल – बंगाल, दिव्यप्रबंधम् आणि अरैयसेवई.
(४) लोकसंगीत (Folk Music)- सर्व प्रदेशांतील महिलांची गीते, मुलांची व मुलांनी गायलेली गीते, महाकाव्यांशी संबंधित गीते, विविध जातींची गीते, सर्व प्रदेशांतील मातृदेवीशी संबंधित गीते, विविध प्रकारच्या लावण्या – उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गवळण – महाराष्ट्र, कुरवांजी गीते – दक्षिण भारत, कलगी-तुरा – विविध प्रदेशांतील (नागेशी, हरदेशी – कर्नाटक), गोरवांची गीते (कलगी-तुरा),गोंधळ – कर्नाटक व महाराष्ट्र, बिंगी पाडा (अंतिके, पंतिके), तत्वगीते (एकतारी मेळा),किन्नरी जोगींची गीते, काणे-पाडा, गीगीपाडा, गुंडिका पाडा, जोकुमार गीते, डोंबुई दासांची गीते (बॅलड), निळा गाऱ्याची गीते, पंढरीची भजने, रिवायतची गीते (प्रश्नोत्तर) आणि मर्सिया कहाणी.
(५) लोक व आदिवासी वाद्यवृंद (Folk and Tribal Musical Instruments)- सामूहिक वादन : पंचमुख वाद्य, करडी, माजलू, वळगा, चिट्टी, मेला, छाकरी, अंजुमन इत्यादी
(६) इतर पारंपरिक कला प्रकार- पेना इसेई – मणिपूर, लोकसंगीत (जातीय संगीत),मांड – राजस्थान, राणामाल्येम – गोवा, देवधनी – आसाम, चंदायनी – मध्य प्रदेश, भांड जसन – काश्मीर, थेय्यमथुरा, तिबेटी चित्रकला व लाकूडकामाचा अभ्यास – तिबेटीयन वर्क्स अँड आर्काइव्हज, धर्मशाळा.