येत्या गुरुवारी ४ डिसेंबरला पाण्याचा वापर करा जरा जपून
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जलवितरण सुधारणा कामांतर्गत आर दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व) परिसरात जलवाहिनी जोडणी तसेच जुनी जलवाहिनी खंडित करणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून शुक्रवारी ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत, एकूण १८ तासांच्या कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे. परिणामी, आर दक्षिण विभागातील ठाकूर गाव, समता नगर, चिखलवाडी व जानूपाडा परिसराचा पाणीपुरवठा गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे.
कांदिवली (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसमवेत ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणी करण्याचे कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच, कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार परिसरातील ९०० मिलीमीटर व्यासाची जुनी जलवाहिनी खंडित करण्याची कार्यवाहीही नियोजित आहे. ही दोन्ही कामे गुरुवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून ते शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत, म्हणजे एकूण १८ तासांच्या कालावधीत हाती घेतली जाणार आहेत.
आर दक्षिण विभागातील ठाकूर गाव, समता नगर, चिखलवाडी, जानू पाडा परिसरास दररोज सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५ या कालावधीत पाणीपुरवठा केला जातो. नियोजित जलवाहिनी जोडणी तथा खंडित कामामुळे ठाकूर गाव, समता नगर, चिखलवाडी, जानू पाडा परिसराचा पाणीपुरवठा गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व संबंधित नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी काटकसरीने वापरावे आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.






