Tuesday, November 18, 2025

ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मंजुरी

ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मंजुरी

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेने तयार केलेल्या मसुद्याच्या ठरावाला बहुमत मिळाल्यानंतर २० कलमी रोडमॅप आता लागू होणार आहे. वॉशिंग्टनच्या २०-कलमी चौकटीत गाझामध्ये युद्धबंदी, पुनर्बांधणी आणि प्रशासनासाठी पहिला व्यापक आंतरराष्ट्रीय रोडमॅप मांडण्यात आला आहे. या योजनेच्या घोषणेनंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदीचा करार होणार असून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसक युद्धाचा अंत निश्चित झाल्याचे चित्र आहे.

गेल्या महिन्यात इस्रायल आणि हमास यांनी या योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शवली होती. ज्यामध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवणे आणि ओलिसांची सुटका करणे समाविष्ट होते. सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानामुळे या ठरावाची ब्लूप्रिंट मान्यताप्राप्त आदेशात रूपांतरित झाली असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मंजुरीमुळे या योजनेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे संक्रमणकालीन प्राधिकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंजूर झालेल्या मसुद्यात इस्रायल आणि इजिप्त यांच्याशी समन्वय साधण्यासाठी दोन वर्षांच्या कार्यकाळासह आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल (ISF) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दलला गाझामधील सीमा सुरक्षित करणे, नागरिकांचे संरक्षण करणे, मानवतावादी मदत प्रयत्नांना पाठिंबा देणे, पॅलेस्टिनी पोलीस दलाची पुनर्रचना, प्रशिक्षण आणि तैनाती करण्यात मदत करणे आणि हमास आणि इतर अतिरेकी गटांकडून शस्त्रे कायमची काढून घेणे हे काम सोपवले आहे.

Comments
Add Comment